इटलीमधील व्हीस्यूव्हिअस (Vesuvius) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांमध्ये मिळालेल्या या खनिजाचा उल्लेख सर्वप्रथम १८१३ मध्ये आलेला आढळतो. रत्नपारखी व रत्नसंग्राहक सर अब्राहम ह्यूम यांच्यावरून ह्यूमाइट हे नाव पडले असून हे एक दुर्मिळ रत्न म्हणून याचे महत्व आहे. स्फटिक संरचना व रा. सं. यांबाबतीत निकटचे संबंध असणाऱ्या मॅग्नेशियम निओसिलिकेट खनिजांच्या समजातीय, पण ज्यामध्ये पाण्याचा अंश असतो अशा मालेचे (series) ह्यूमाइट हे नाव आहे.

ह्यूमाइट

याचे सर्वसाधारण रासायनिक सूत्र Mg2n+1 (SiO4)n (F,OH)2  हे असून या मालेतील ज्ञात खनिजे व त्यांच्या रासायनिक सूत्रातील n चे मूल्य व वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे : नॉर्बर्गाइट (n=1), काँड्रॉडाइट (n=2), ह्यूमाइट (n=3) आणि क्लिनोह्यूमाइट (n=4). ही स्तरित सिलिकेट खनिजे संरचनेच्या दृष्टीने फॉर्स्टेराइट ऑलिव्हीन (Mg2SiO4) व ब्रूसाइट [Mg(OH)2] यांच्याशी निगडित आहेत. पिवळा ते उदी रंगांच्या, मध्यम कठिनतेच्या या खनिजांमध्ये रचनेतील स्तरांच्या अनुक्रमानुसार भौतिकीय गुणधर्म व स्फटिकीभवन यांतील भिन्नता निर्माण होते. एकाच राशीत एकत्रितपणे ही खनिजे क्वचितच आढळतात. परंतु ह्यूमाइट स्फटिकांत क्वचित क्लिनोह्यूमाइटचे स्फटिक घुसलेले आढळतात.

ह्यूमाइटाचे स्फटिक समचतुर्भुजी, पाटन अस्पष्ट; रंग पांढरा, पिवळा, गडद नारिंगी वा तपकिरी; चमक काचेसारखी वा रेझिनासारखी; भंजन खडबडीत ते उपशंखाभ असू शकते. कस रंगहीन; कठिनता ६–६.५; वि.गु.३.१–३.२. यात टिटॅनियम, ॲल्युमिनियम, मँगॅनीज वा कॅल्शियम अल्प प्रमाणात असू शकते. ही खनिजे अलगपणे ओळखणे अतिशय अवघड आहे आणि ती वेगळी ओळखण्यासाठी क्ष-किरण विवर्तन, इलेक्ट्रॉन दूरदर्शक किंवा प्रकाशकीय तंत्रे वापरावी लागतात.

ही खनिजे मर्यादित क्षेत्रांत आढळतात. अम्ल वा अल्कली पातालिक खडकांलगतच्या किंवा संस्पर्शी रूपांतरित खडकांलगतच्या (स्कार्नलगतच्या) लोह धातुक (कच्च्या रूपातील धातू) निक्षेपांजवळच्या रूपांतरीत चुनखडक व डोलोमाइट खडकांत ही खनिजे आढळतात. न्यूयॉर्क व आँटॅरिओ राज्यांतील ग्रेनव्हिल-एज संगमरवर, व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीतून बाहेर टाकलेले संगमरवर व मध्य स्वीडनमधील संगमरवर हे या खनिजांचे नमुनेदार स्रोत आहेत. तसेच ताजिकिस्तानमधील पामीर पर्वतरांगेतील संगमरवरातही ह्यूमाइट आढळते.

  समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर