आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे काही नवीन व अपारंपरिक दृष्टीकोन आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा दृष्टीकोन म्हणजे स्त्रीवाद, हा होय. स्त्रियांच्या शोषणाला विरोध करण्यासाठी तसेच त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, लैंगिक हक्क मिळवून देण्यासाठी स्त्रीवादी चळवळ उभी राहिली. या चळवळीला सामान्यतः तीन लाटांमध्ये विभागले जाते. या चळवळीचा प्रभाव सामाजिकशास्त्राच्या विविध शाखांच्या अभ्यासकांवरदेखील झालेला आढळून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात हा प्रभाव दोन टप्प्यांमध्ये दिसून येतो.
https://www.youtube.com/watch?v=ajAWGztPUiU
१९६०च्या दशकामध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी जागतिक शांततेविषयी विचार मांडले. दोन महायुद्धांच्या काळात अनेक स्त्रीवादी संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांवर झाला. ‘सुरक्षा’ या संकल्पनेची व्याप्ती वाढली. ‘मानवी हक्कांची सुरक्षा’ या संज्ञेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतर शाखांप्रमाणे स्त्रीवादामध्येदेखील झाला. १९८०च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात स्त्रीवादी दृष्टीकोनाला महत्त्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रीवाद्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिले. वैश्विक समजल्या जाणाऱ्या अनेक संज्ञा पुरुषी मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत, असे त्यांचे मत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञावर टीका केली. त्यांनी ‘युद्ध’, ‘सुरक्षा’ व ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ या संबंधीच्या ज्ञानाच्या संरचनेमध्ये लिंगभावविषयक मुद्द्यांचा समावेश नाही, असा युक्तिवाद केला.
शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनेक संकल्पनांचा पुनर्विचार केला गेला. या दरम्यान स्त्रीवादी साहित्यात तसेच स्त्रीवाद्यांनी आयोजित केलेल्या परिषदांमध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी लिंगभावाच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. या संदर्भात सिंथिया एनलो, जे. अॅन टिकनर व व्ही. स्पाईक पीटरसन यांचे लेखन उल्लेखनीय आहे.
जगातील बहुतांश देशांचे राष्ट्रप्रमुख पुरुष आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील अनेक घडामोडींवर पुरुषी प्रभाव दिसून येतो. स्त्रियांची भूमिका बऱ्याचदा अराज्य घटकांमार्फत असते. या घटकांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय संघटना, बिगर–शासकीय/अशासकीय संघटना, स्वयंसेवी संघटना इत्यादींचा समावेश केला जातो. या संघटना आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव पाडत असतात. उदा., ‘Coalition Against Trafficking of Women’ ही अशासकीय संघटना निर्वासित स्त्रियांचे प्रश्न, युद्धाला बळी पडलेल्या स्त्रियांचे प्रश्न, तस्करी संबंधीचे प्रश्न इत्यादी विषयांवर प्रकाश टाकत असते.
स्त्रीवादी विश्लेषकांच्या मते, ही भूमिका अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. तसेच ‘युद्ध’ व ‘सुरक्षा’ या विषयांच्या निर्णयांचा स्त्रियांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
स्त्रीवाद हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा प्रवाह आहे. या प्रवाहाचा देशादेशांमधील प्रत्यक्ष संबंधांवर मोठा परिणाम झाला आहे, असे म्हणता येणार नाही किंवा नवी अभ्यासाची नवी प्रतिमाने निर्माण झाली आहे, असेही नाही. परंतु या दृष्टीकोनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांकडे पाहण्याच्या नेहमीच्या मार्गांपेक्षा वेगळा असा विचार मात्र निश्चितपणे मांडला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीवादी प्रवाहाची गृहीतके : १) राज्यसंस्था आणि बाजारपेठ ही दोन्ही क्षेत्रे पुरुषी दृष्टीकोनावर आधारभूत असतात. परिणामतः या व्यवस्था पुरुषांसाठी अधिक लाभदायक असतात.
२) राजकीय व आर्थिक व्यवस्था पुरुषांनी अंकित केल्यामुळे त्यात महिलांचे भरीव योगदान असूनही त्यांना कमी महत्त्वाचे स्थान मिळते.
३) स्त्री व पुरुष यांच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांचा अभ्यास न केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रात अनेक त्रुटी निर्माण होतात.
स्त्रीवादी विचारधारेचे विविध प्रवाह आहेत. हे प्रवाह वेगवेगळ्या सिद्धांतांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंधातील लिंगभेदाचे/स्त्री-पुरुष विषमतेचे वर्णन करतात. स्त्रीवादातील प्रमुख प्रवाहांमध्ये उदारमतवादी, अलगतावदी, मार्क्सवादी/समाजवादी, उत्तर-आधुनिक व उत्तर-वसाहतवादी या विचारप्रवाहांचा समावेश केला जातो. हे विचारप्रवाह खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहेत :
उदारमतवादी स्त्रीवाद : उदारमतवादी स्त्रीवाद्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला आहे. त्यांना कुठल्याही स्वरूपातील भेदभाव अमान्य आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, हा युक्तिवाद त्यांना मान्य नाही. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या निर्णयप्रक्रियेत, संघटनांमध्ये, तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. या क्षेत्रांत स्त्रियांची भूमिका मर्यादित आहे, अशी टीका उदारमतवादी स्त्रीवाद्यांनी केली आहे. लष्करातदेखील स्त्रियांना परिचारिका, टंकलेखिका, वैद्यकीय सेवा इत्यादी पारंपरिक भूमिका दिल्या जातात. परंतु युद्धाचा परिणाम पुरुषांइतकाच स्त्रियांवरही होत असतो. युद्धकाळात स्त्रिया केवळ मृत्युमुखीच पडत नाहीत, तर त्या लैंगिक हिंसाचारालादेखील बळी पडतात. अनेक देशांमध्ये स्त्रियांची प्रतिमा समाजाची ‘प्रतिष्ठा’ किंवा ‘अब्रू’ अशी असल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार करणे म्हणजे शत्रू राष्ट्राचा किंवा शत्रू गटाचा सूड घेणे, असे समजले जाते. युद्धकाळात शत्रूपक्षातील स्त्रियांना आपल्या सैनिकांच्या मनोरंजनासाठी वापरण्याच्या अनेक घटना दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या आढळतात.
आंतरराष्ट्रीय राजकारणात ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर, भारताच्या इंदिरा गांधी, इझ्राएलच्या गोल्डा मेईर, म्यानमारच्या नोबेल विजेत्या नेत्या आँग सान स्यू क्यी या स्त्रीनेत्या त्यांच्या खंबीर नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्त्रियांच्या भूमिकेवर असणारी राजकीय व सामाजिक बंधने नष्ट करून या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढावा, असे उदारमतवादी स्त्रीवाद्यांचे मत आहे.
अलगतावादी स्त्रीवाद : अलगतावादी स्त्रीवाद्यांनी स्त्री-पुरुषांमधील फरक अधोरेखित केला आहे. त्यांच्या मते, हा फरक फक्त जैविक नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक देखील आहे. त्याच बरोबर स्त्रियांचे सामाजीकरणही विशिष्ट पद्धतीने केले जाते. स्त्रीने नेहमी मवाळ, सौम्य, शांतताप्रिय व आज्ञाधारक असावे तिने इतरांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा केली जाते. जी अलगतावादी स्त्रीवाद्यांना मान्य नाही.
अलगतावादी स्त्रीवाद्यांच्या मते, ‘युद्ध’ व ‘संघर्ष’ या पुरुषी संकल्पना आहेत. स्त्रियांमध्ये युद्ध व संघर्ष टाळण्याची क्षमता असते, असा युक्तिवाद हे स्त्रीवादी करतात. त्यांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला स्त्रीवादी तत्त्वांचा आधार दिला, तर संघर्षाऐवजी सहकार्याला प्राधान्य मिळेल. इतिहासात असा प्रयत्न काही स्त्रीयांनी केलेला दिसून येतो. उदा., पहिल्या महायुद्धादरम्यान १९१५ साली जेन अॅडम्स व इतर स्त्रियांनी ‘द हेग’ येथे स्त्रियांची पहिली शांतता परिषद भरवून महायुद्धामुळे होत असलेल्या हानीवर टीका केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक प्रसंगांमध्ये स्त्रियांनी संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य केले आहे. आफ्रिकेतील लिबिया येथे फेब्रुवारी २०११ मध्ये यादवी युद्ध झाले. तिथे बराच काळ अस्थैर्य होते. तेव्हा लिबियामध्ये स्त्रियांच्या संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आण्विक शस्त्रीकरणाला विरोध करणे, लष्करी कारवायांना विरोध करणे, असे अनेक प्रयत्न स्त्रियांच्या संघटनांनी केलेले दिसून येतात.
मार्क्सवादी/समाजवादी स्त्रीवाद : मार्क्सवादी/समाजवादी प्रवाहातील स्त्रीवादी चळवळी संपूर्ण व्यवस्थेला वर्गसंघर्षाच्या परिप्रेक्ष्यातून पाहतात. त्यांच्या मते, राष्ट्र-राज्य ही मुळात एक भांडवलशाही संकल्पना आहे. स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग असून पुरुषसत्ताक पद्धतीत त्यांना नेहमी भेदभाव व शोषण यांचा सामना करावा लागतो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिघदेखील त्यास अपवाद नाही. याचबरोबर हा प्रवाह भांडवलशाहीवर व त्यातून निर्माण होणाऱ्या असमान सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांवरही टीका करतो. तसेच पुरुषप्रधानता व भांडवलशाही यांमुळे स्त्रियांचे जे दुहेरी शोषण होते त्यास वाचा फोडतो.
भांडवलशाहीतून पितृसत्ताकतेचा उगम होतो. अशा व्यवस्थेत स्त्रियांना आपोआप दुय्यम स्थान मिळते. भांडवलशाहीमुळे पुरुष आणि स्त्रियांची समाजातील जबाबदारी किंवा भूमिका ठरते असे मार्क्सवादी-स्त्रीवादाचे समर्थक मानतात. काम करणे आणि अर्थार्जन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे ही जबाबदारी पुरुषांची, तर पुरुष काम करून कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळत असताना स्त्रियांनी घरातील कामकाज पाहणे ही स्त्रियांची भूमिका भांडवलशाही अर्थव्यवस्था निश्चित करते. यालाच अनुक्रमे ‘सार्वजनिक अवकाश’ आणि ‘खाजगी अवकाश’ म्हणतात. घराचे ‘खाजगी अवकाश’ व कामाच्या ठिकाणचे ते ‘सार्वजनिक अवकाश’ अशा विभाजनामुळे अनेकदा स्त्रियांच्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळू शकत नाही. स्त्रियांना उत्पादन प्रक्रियेत स्थान नसल्याने व उत्पादनाचे हक्क आणि साधने पुरुषांच्या हाती एकवटल्याने स्त्रिया या खाजगी अवकाशात अडकून राहतात आणि त्या आर्थिक निर्णयांच्या बाबतीत कायमच पुरुषांवर अवलंबून राहतात. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढते.
उत्तर आधुनिक आणि उत्तर वासाहतिक स्त्रीवाद : उत्तर आधुनिकतावाद जगात घडलेल्या सगळ्या घटनांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. स्वातंत्र्य, आधुनिकतावाद या मूल्यांची जोपासना करताना अथवा औद्योगिक क्रांतीच्या काळात कसे वेगवेगळ्या कारणांसाठी समाजातल्या दुबळ्या घटकांकडे दुर्लक्ष झाले याकडे ते लक्ष वेधतात. ‘वैश्विक सत्य’ म्हणून प्रस्थापित झालेल्या गोष्टींना प्रत्यक्षात अनेक कंगोरे असू शकतात, हा महत्त्वाचा मुद्दा उत्तर आधुनिक स्त्रीवादी उपस्थित करतात. त्यामुळे ‘लिंगभाव’ या संकल्पनेचाही पुनर्विचार व्हायला हवा, असे ते मानतात. त्यांच्या मते, लिंगभाव फक्त अस्मितेशी निगडित अथवा सामाजिक घटकांवर अवलंबून असतो, असे नाही. ती एक प्रक्रिया आहे, जी वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परीघही त्याच प्रक्रियेमार्फत पुरुषी झालेला आहे. हा परीघ पुरुषास घडवतो आणि पुरुष या परिघाला आकार देतात, ज्यात आपोआपच स्त्रियांच्या दृष्टीकोनाकडे कानाडोळा केला जातो. हे सगळे अगदी यशस्वी रीत्या रुजवले जाते व नैसर्गिक मानले जाते. त्यामुळे आपला आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोनदेखील त्याच अनुषंगाने तयार होतो.
उत्तर आधुनिक आणि उत्तर वासाहतिक स्त्रीवादी प्रवाह वसाहतवादानंतर निर्माण झालेल्या वेगवेगळ्या घटितांचा अभ्यास करतो. जसे, वसाहतवादी राज्यकर्त्यांनी केलेली पूर्वेकडील देशांची व तिथल्या लोकांची वर्णने, त्यानुसार घडलेली सत्ताकेंद्रे व त्यांनी लादलेल्या संकल्पना इत्यादी. त्यांच्या मते, वसाहतवादाच्या काळात निर्माण झालेल्या लिंगभावविषयक संकल्पनांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. पूर्वेकडील समाजांना व त्यांच्या चालीरीतींना व दृष्टीकोनांना मागास समजणे अयोग्य आहे. या सोबतच हा प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्त्रियांशी निगडित प्रश्नांना सोडवण्याचे उपाय कोणते असावेत याबाबतचे अगदी वेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. मुख्यतः स्त्री-प्रश्नांकडे पाहण्याचा वरवरचा दृष्टीकोन अथवा स्त्रियांना व्यवस्थेचा ‘बळी’ समजून त्यावर उपाय योजण्याला त्यांचा विरोध आहे. बरीचशी धोरणे ही मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी आणि एखादा विशिष्ट राजकीय हेतू साधण्यासाठीच ठरवली जातात, असे ते मानतात. स्त्रियांचे प्रश्न जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे; म्हणूनच स्त्री-प्रश्नांचे सरसकटीकरण होऊ शकत नाही, असा विचार उत्तर आधुनिक स्त्रीवाद मांडतो. त्यामुळे लिंगभाव निगडित प्रश्नांवरचे उपाय हे सर्वसमावेशक व खऱ्याखुऱ्या समस्या जाणून घेऊन योजलेले असावेत, अशी मागणी ते करतात. याचा विचार संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघाटनांनीही गांभीर्याने करायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.
स्त्रीवादाचे प्रवाह पुरुषांसाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्यवस्थेवर टीका करतात. सत्ता गाजवण्याचे कार्य पारंपरिक रीत्या पुरुषांचे आहे, असे मानले जाते. किंबहुना, सत्ताधारी हा पुरुषच असतो, असेही अनेकदा गृहीत धरले जाते. स्त्रीवादी विचारसरणी मात्र अगदी वेगळ्या रीतीने सत्तेचे पृथक्करण करतात व सर्वसमावेशक सत्ताकारणाचा विचार करतात. आंतरराष्ट्रीय संबंधांत आवश्यक असणाऱ्या युद्ध, शांतता, सामंजस्य करार, राजनय इत्यादी अनेक संकल्पनांचा पुनर्विचार करून आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या प्रस्थापित गृहितकांना आव्हान देतात. त्यामुळेच स्त्रीवादी दृष्टीकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा महत्त्वाचा दृष्टीकोन आहे.
संदर्भ :
- Baylis, John; Owens, Patricia; Smith, Steve, Ed. The Globalization of World Politics : An Introduction to International Relations, Oxford University Press, 2017.
- Hooper, Charlotte, Manly States : Masculinities, International Relations, and Gender Politics, Columbia University Press, 2012.
- Youngs, Gillian, “Feminist International Relations : A Contradiction in Terms? Or : Why Women and Gender are Essential to Understanding the World ‘We’ Iive in.” International Affairs 80.1 (2004): 75
समीक्षक : उत्तरा सहस्रबुद्धे