गिलिगन, कॅरल : (२८ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ, नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टिकोण’ या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले. आज गिलिगन या अत्यंत प्रभावशाली स्त्रीवादी विचारवंत मानल्या जातात. १९९७ मध्ये ‘लिंगभेद अभ्यास’ या विषयाच्या हार्व्हर्ड विद्यापीठातील त्या पहिल्या प्राध्यापिका ठरल्या.
गिलिगन यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी स्वार्थमोर महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली (१९५८). १९६१ मध्ये रॅडक्लिफ महाविद्यालयातून त्यांनी ‘वैद्यकीय मानसशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. करण्यासाठी गिलीगन यांनी ‘सामाजिक मानसशास्त्र’ या विषयाची निवड केली. या पदवीकरता त्यांनी ‘रिस्पॉन्सेस टू टेम्प्टेशन: ॲनॅलिसिस ऑफ मोटीव्हज्’ (प्रलोभनांना दिले जाणारे प्रतिसाद: उद्देशांचे विश्लेषण) हा प्रबंध सादर केला. हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. (१९६४) ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठात दोन वर्षे अध्यापनाचा अनुभव घेतला आणि १९६७ मध्ये पुन्हा त्या हार्व्हर्ड विद्यापीठामध्ये परतल्या.
तेथे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन (१९०२ ̶ ९४) आणि लॉरेन्स कोलबर्ग (१९२७ ̶ ८७) या दोन प्राध्यापकांसोबत त्यांनी अध्यापनास प्रारंभ केला. या दरम्यान त्या कोलबर्ग यांच्या संशोधन सहायक म्हणूनही कार्यरत होत्या. गिलिगन यांच्यावर कोलबर्ग यांचा सखोल प्रभाव असला, तरी त्यांच्या विचारांशी मात्र त्या पूर्णपणे सहमत नव्हत्या. गिलीगन यांच्या इन अ डिफरंट व्हॉईस (१९८२) या पुस्तकाद्वारे त्यांची मानसशास्त्र आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली. हे पुस्तक मुख्यत्वे दोन कारणांसाठी गाजले. एक म्हणजे या पुस्तकाद्वारे गिलिगन यांनी कोलबर्गच्या नैतिकतेच्या सिद्धांताच्या उपयोजनाविषयी शंका उपस्थित केली आणि दुसरे म्हणजे या पुस्तकातून स्त्रीवादी समीक्षेला नवा आयाम मिळाला.
स्त्रियांचा आवाज आणि अनुभव मानसशास्त्राकडून दुर्लक्षित झाला आहे, असे गिलिगन यांचे स्पष्ट म्हणणे होते. त्यांच्या मते स्त्री–पुरुषांमध्ये गुणात्मक फरक आहेच; पण या फरकावरून त्यांच्यावर विशिष्ट मूल्यात्मक मते लादता येऊ शकत नाहीत. गिलिगन यांचा हा विशिष्ट दृष्टिकोण ‘भिन्नत्वाधिष्ठित स्त्रीवाद’ (डिफरन्स फेमिनिझम) म्हणून ओळखला जातो. त्यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आलेले स्त्रियांच्या नैतिक विकासाविषयीचे आणि निर्णयक्षमतेविषयीचे निष्कर्ष त्यांनी आपल्या पुस्तकात ठळकपणे नोंदवले आहेत. गिलिगन यांना त्यांच्या संशोधनासाठी शिक्षणक्षेत्रातील ‘ग्रॉमेयर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते (१९९२). तसेच टाईम नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या १९९६ या वर्षातील २५ अत्यंत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश होता.
कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताची कॅरल गिलिगनने केलेली समीक्षा : हार्व्हर्डमध्ये कोलबर्ग आणि गिलिगन एकत्रच कार्यरत होते; परंतु तरुणांची नैतिक पातळी ठरवण्यासाठी कोलबर्ग जी पद्धत वापरत होते ती गिलिगन यांना मान्य नव्हती. नैतिक पातळी मोजण्यासाठी कोलबर्ग त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर काल्पनिक नैतिक द्वंद्वे ठेवत आणि त्यांच्याकडून गणिती स्वरूपातील उत्तरांची (योग्य/अयोग्य) अपेक्षा करीत; तथापि अशा काल्पनिक द्वंद्वांना प्रतिसाद देताना तरुणांना विशेष अडचण येत नसे, तरुणी मात्र अवघडून जात. मग त्या नैतिक द्वंद्वातील पात्रांबद्दल म्हणजेच त्यांचा इतिहास, नातेसंबंध इ. बद्दल अधिक माहिती विचारत. ‘योग्य’ वा ‘अयोग्य’ उत्तर देण्यापेक्षा स्त्रिया ती नैतिक समस्या सोडवण्यावर भर देत असत. यावरून कोलबर्ग यांनी असा निष्कर्ष काढला की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा नैतिकदृष्ट्या अपरिपक्व असतात. मात्र गिलिगन यांच्या मते, हे स्त्रियांच्या नैतिक अपरिपक्वतेचे लक्षण नसून त्यांचा नैतिक दृष्टिकोण पुरुषांपेक्षा भिन्न असल्याचे लक्षण आहे.
कोलबर्ग यांच्या सहा पायऱ्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताविषयीच गिलिगन यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणतात, कोलबर्ग यांचा सिद्धांत आपण वैश्विक, अचूक, आणि अंतिम मानू शकतो का? तसेच कोलबर्गच्या सिद्धांतानुसार स्त्रिया तिसरी पायरी देखील क्वचितच ओलांडताना दिसतात, असे का? या उलट पुरुष सहजपणे पाचव्या पायरीपर्यंत पोहोचतात, असे का? याचा अर्थ स्त्रिया पुरुषांपेक्षा नैतिक दृष्ट्या अपरिपक्व असतात असा नसून कोलबर्गची नैतिक विकास मोजण्याची पद्धतच चुकीची आहे.
गिलिगन यांचे निगेचे नीतिशास्त्र (Ethics of Care) : कोलबर्ग यांच्या मूळ सिद्धांतानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया नैतिक कारणमीमांसेत दुय्यम ठरत. सदर सिद्धांताच्या संदर्भात विचार करताना गिलिगन यांना अजून एक अडचण लक्षात आली आणि ती म्हणजे कोलबर्ग यांचा हा सहा पायऱ्यांचा सिद्धांत केवळ श्वेतवर्णीय पुरुषांच्या संशोधनावर आधारित होता (निदान सिद्धांत विकसित होण्याच्या काळात तरी). त्यामुळे या सिद्धांताच्या परिपूर्णतेविषयीच गिलिगन यांच्या मनात शंका उपस्थित झाली. या पार्श्वभूमीवर गिलिगन यांनी ‘गर्भपात करावा की नाही’, अशा नैतिक द्वंद्वात अडकलेल्या स्त्रियांवर संशोधन सुरू केले. या संशोधनाचे निष्कर्ष स्पष्टपणे सूचित करतात की, स्त्रिया या नैतिक कारणमीमांसेत पुरुषांपेक्षा अजिबात दुय्यम नाहीत. फक्त नैतिक कारणमीमांसेसाठी स्त्रिया जी पद्धत वापरतात ती मात्र पुरुषांपेक्षा वेगळी असते. त्यामुळेच स्त्रियांच्या नैतिक विकासाची पातळी ठरवताना कोलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत वापरणे योग्य नसून त्यासाठी ‘निगेचे नीतिशास्त्र’ हा अभिनव सिद्धांत वापरणे योग्य ठरेल असे त्यांचे म्हणणे होते. निगेचे नीतिशास्त्र हे स्त्रियांना इतरांविषयी वाटणाऱ्या निगेवर, आस्थेवर आधारलेले आहे. गिलिगन असे मानतात की, हे ‘निगेचे नीतिशास्त्र’ केवळ संशोधनात सहभागी झालेल्या तरुणींपुरते मर्यादित नसून ते इतर स्त्रियांमध्येही खात्रीने आढळून येते.
गिलिगन यांनी संशोधनाद्वारे नैतिक विकासाचे त्रिस्तरीय नमुनारूप विकसित केले. ते खालीलप्रमाणे :
१. नैतिकता – स्वकेंद्री दृष्टिकोण : गर्भपाताचा विचार करणाऱ्या ज्या २९ महिलांवर गिलिगन यांनी संशोधन केले त्यापैकी काही स्त्रियांसाठी नैतिकतेचा अर्थ हा आत्मकेंद्रितता आणि केवळ स्वतःचा विचार करणं हा होता. अशा स्त्रिया गिलिगन यांच्या नैतिक विकासाच्या नमुनारूपात पहिल्या पायरीवर आहेत. या स्त्रियांचा विचार ‘मला मूल हवे की नको’ यावर केंद्रित झालेला होता. गर्भपात करण्यासाठी त्यांच्याजवळ स्वतःची निश्चित अशी कारणे होती.
२. नैतिकता – स्वार्थत्याग : गिलिगन यांच्या मते, पहिल्या स्तरावरील स्त्रियांच्या विचारात आढळणाऱ्या स्वार्थाची जागा या द्वितीय स्तरावर पोहचलेल्या स्त्रियांमध्ये ‘स्वार्थत्यागाने’ घेतलेली असते. या स्तरावर पोहचलेल्या स्त्रिया इतरांची काळजी करण्याच्या आपल्या क्षमतेच्या आधारावर स्वतःची नैतिक पातळी ठरवतात. या स्त्रिया आपल्यापेक्षा इतरांचा विचार अधिक करतात आणि (पहिल्या स्तराच्या विरोधी), ज्याद्वारे कोणीही दुखावले जाणार नाही, अशा उपायांच्या शोधात त्या असतात. त्यासाठी प्रसंगी परिस्थितीचा बळी होणेही त्यांना मान्य असते. स्वतःचे मत काय?, स्वतःला काय वाटते? यापेक्षा आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना सुखी, आनंदी ठेवणे हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. या पातळीवर पोहचलेल्या स्त्रियांनी कुणालातरी आनंदी करण्यासाठी गर्भपाताचा पर्याय निवडला होता.
३. नैतिकता – परिणामांची जबाबदारी स्वीकारणे : गिलिगन यांच्या मते या तिसऱ्या पायरीवर पोचण्याचा निकष म्हणजे आपल्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आणि तयारी. म्हणूनच हे करू शकणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नमुनारूपात सर्वोच्च स्तरावर आहेत. या स्तरावर पोहचलेल्या स्त्रियांना गर्भपात करणे वा न करणे यापैकी कोणताही पर्याय निवडला, तरी आपणास दुःखाला सामोरे जावेच लागेल याची अपरिहार्यता लक्षात आली होती. त्यामुळेच आपला निर्णय व त्याचे परिणाम यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी गर्भपाताचा पर्याय निवडला होता.
अशाप्रकारे नैतिक विकासासंदर्भातील निकष हे आत्मकेंद्रिततेकडून इतरांविषयीच्या आस्थेकडे जातात. म्हणूनच स्त्रियांच्या नैतिक विकासाचा विचार करताना या निर्णयामागील स्त्रियांचे उद्देश आणि निर्णयाचे परिणाम स्वीकारण्याची त्यांची तयारी यांना महत्त्व दिले गेले पाहिजे असे गिलिगन नमूद करतात.
गिलिगन यांनी पुढे मुले कोणते खेळ खेळतात, यावर जेनेट लिव्हर या समाजशास्त्रज्ञासह संशोधन केले. या संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षांचीही जोड गिलिगन यांनी आपल्या नैतिक विकासाच्या सिद्धांताला दिली. लिव्हर यांना आढळून आले की, मुलांना जटिल आणि क्लिष्ट नियम असलेले खेळ खेळायला आवडतात. उलट मुली तुलनेने कमी अवघड नियम असलेले, कमी वेळाचे खेळ खेळणे पसंत करतात. खेळताना इतरांसाठी नियम शिथिल करण्यासही त्या तयार असतात. गिलिगन यांच्या मते, मुला-मुलींमधला हाच फरक त्यांच्या प्रौढावस्थेतही संक्रमित होत असतो. नातेसंबंध टिकवण्याच्या दृष्टीने स्त्रिया प्रसंगी नियम बदलू पाहतात, तर पुरुष नियमांशी बांधील राहून त्यासाठी प्रसंगी नातेसंबंधाला कमी लेखतात. स्त्री–पुरुषांच्या व्यक्तित्वातला हा फरकच त्यांचा नैतिक दृष्टिकोण घडवत असतो. साधारपणे पुरुष नैतिक परिपक्वता ‘न्याया’त पाहतात, तर स्त्रिया ‘आस्थे’त आणि ‘जबाबदारी’त पाहतात. गिलिगन यांच्या मते, स्त्रियांमध्ये असलेली मातृत्वभावना, तसेच सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंध जोपासण्याची लहानपणापासून मिळालेली शिकवण यांमुळेच स्त्रियांची जडणघडणच पुरुषांपेक्षा वेगळ्या मुशीत झालेली असते. यामुळेच स्त्री – पुरुषांच्या नैतिक दृष्टिकोणातच मूलभूत फरक आढळतो. परिणामी स्त्रियांचे नैतिक निर्णय, नैतिक विचार खूप वेगळे ठरतात. तिचा आवाज, तिचे मतंच वेगळे आहे. म्हणूनच गिलिगन त्याला स्त्रियांचा आवाज (स्त्रियांचे मत) असे न संबोधता ‘भिन्न आवाज’, ‘भिन्न मत’ असे संबोधतात.
मूल्यमापन : आपल्या सिद्धांताद्वारे गिलिगन स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैतिक फरकांबद्दल अतिशय प्रभावीपणे प्रकाश पडतात; परंतु त्यांच्या या ‘स्त्रियांच्या विभिन्न आवाजाच्या’ गृहितकामुळे त्यांना बऱ्याच टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यांच्या सिद्धांतावर केली गेलेली सगळ्यात मोठी टीका अशी की हा त्यांचा सिद्धांत समाजात प्रचलित असलेल्या स्त्री-पुरुषांसंदर्भातील गैरसमजूतींनाच दुजोराच देतो. पुरुष संवेदनशील नसतात, तर स्त्रिया संवेदनशील असतात, पुरुष डोक्यानी विचार करतात, तर स्त्रिया भावनांना प्राधान्य देतात; या आणि अशा अनेक गैरसमजूतींना गिलिगन यांचा सिद्धांत एकप्रकारे खतपाणीच घालतो.
नीतिशास्त्र कधीच वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळे मानक सुचवत नाही. उलटपक्षी सार्वत्रिक आणि सर्वाँना लागू होणारे नैतिक मानक देण्याकडे नीतिशास्त्राचा कल असतो. त्यामुळे गिलिगन यांच्या निगेच्या नीतिशास्त्रातून समोर येणारा दुहेरी मानक ̶ काहींसाठी न्याय आणि काहींसाठी निगा ̶ हाच मुळी प्रश्न निर्माण करणारा ठरतो.
गिलिगन यांचा ‘निगेचे नीतिशास्त्र’ हा सिद्धांत गर्भपाताविषयी निर्णय घेणाऱ्या फक्त २९ महिलांच्याच अभ्यासावर आधारित आहे आणि ह्या २९ महिलांचे मत म्हणजे संपूर्ण स्त्रीजातीचे मत असेलच असे नाही, अशी रास्त टीका अनेक समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्यावर केली आहे. ह्या टीकेला उत्तर देताना गिलिगन आपल्याला आठवण करून देतात की, फ्रॉइड, पिआजे आणि कोलबर्ग ह्यांसारख्या नावाजलेल्या मानसशास्त्रज्ञांचे अनेक सिद्धांत हे सुद्धा अशाच संशोधनावर आधारित होते. जरी निगेचे नीतिशास्त्र वरवर पाहता अगदी कमी नमुन्यावर आधारित असले, तरीही त्यातून स्त्रियांच्या स्वकल्पनेविषयी मिळणारी माहिती अमूल्य आहे असे मत त्या मांडतात.
गिलिगन यांच्यानंतरही काही संशोधकांना कोलबर्ग यांचे नमुनारूप वापरून केलेल्या संशोधनात स्त्रिया आणि पुरुष नैतिक विकासाच्या एकाच पायरीवर असल्याचे आढळून आले. त्यामुळे गिलिगन यांचा सिद्धांत कितपत वैध आहे, अशी शंका अनेक अभ्यासकांच्या मनात निर्माण झाली. असे असले तरीही गिलिगन यांचे अनेक वाचक आणि अभ्यासक ̶ फक्त स्त्रियाच नव्हे, तर पुरुषदेखील ̶ त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवरून गिलिगन यांचा निगेचा सिद्धांत वैध मानतात आणि त्या त्यांच्या निगेच्या नीतिशास्त्रातून पुरुषांना पूर्णपणे बेदखल करत नाहीत, ह्याबद्दल त्यांचे कौतुकही करतात. अनेक अभ्यासकांच्या मते, गिलिगन यांच्या सिद्धांताची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे नैतिक विकासाच्या तिसऱ्या पायरीवर स्त्रियांचा आणि पुरुषांचा आवाज म्हणजेच न्यायाचा आणि निगेचा आवाज एकमेकात मिसळून त्यातून एकच आवाज निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळेच त्यांचा हा सिद्धांत खऱ्या अर्थाने फक्त स्त्रियांच्या नैतिक विकासापर्यंत मर्यादित न राहता लिंगभेदांच्या पलीकडे जाऊन एक वैश्विक सिद्धांत बनतो.
संदर्भ :
- Fieser, James; Lillegard, Norman, Philosophical Questions, Oxford, 2005.
- Gilligan , Carol, In a Different Voice, Cambridge, 1982.
- Griffin, Em; Ledbetter, Andrew; Sparks, Glenn, A First Look at Communication Theory, Colombus, 1991.
- Lever, Janet, “Sex differences in the Games Children Play”, Social Problems, Vol.23, 1976.
समीक्षक – लता छत्रे
छान