भारतीय इतिहासाच्या मध्यकाळातील एक शैव संप्रदाय. मध्यकाळात अफगाणिस्तानापासून ते बांगलादेश आणि तिबेट-नेपाळपासून ते दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत व्यापलेला एक प्रमुख संप्रदाय. या संप्रदायाची उत्पत्ती, उत्त्पती-स्थान, नामाभिधान, प्रवर्तक, सिद्धांत, उपासनापद्धती यांविषयी विद्वानांमध्ये बरीच मत-मतांतरे आढळून येतात. काही विद्वान मत्स्येंद्रनाथांना (मच्छिंद्रनाथ), तर काही गोरक्षनाथांना (गोरखनाथ) या संप्रदायाचा प्रवर्तक मानतात. असे असले तरी आज गोरक्षनाथांकडे या संप्रदायाचा एक कुशल संघटक म्हणून पाहिले जाते.
‘नाथ’ शब्द ‘स्वामी’, ‘परमेश्वर’, ‘संरक्षक’, ‘आश्रयदाता’ या अर्थाने घेतला जातो. शिवाचे एक नाव म्हणूनही हा शब्द वापरला जातो. नाथ संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये शिवाला वारंवार ‘आदिनाथ’ या नावाने संबोधले गेले आहे. १३ व्या शतकातील लीळाचरित्रात या संप्रदायाला ‘नाथ पंथ’ असे संबोधले गेले आहे, तर १४ व्या शतकातील विसोबा खेचर लिखित षट्स्थल या मराठी ग्रंथात या संप्रदायाला ‘आदिनाथ संप्रदाय’ हे नामाभिधान वापरले गेले आहे. सिद्धमत, सिद्धमार्ग, योगमार्ग, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, गोरख संप्रदाय, कानफाटे इत्यादी नावांनीही नाथ संप्रदायाचे उल्लेख विशेषतः उत्तर मध्ययुगीन ग्रंथांत मिळतात.
नाथ संप्रदायाचा उदय साधारणतः दहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान झाला असावा, असे मानले जाते. आजमितीला मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचा काळ ठरविण्यास ऐतिहासिक व पुरातत्त्वीय साधनांचा अवलंब केला गेला आहे. त्यांची १२ व्या शतकातील प्रारंभिक मूर्ती व शिल्पे प्राप्त झाल्याने नाथ संप्रदायाची उत्पत्तीही निश्चितपणे १२ व्या शतकापूर्वीच झाली असल्याचे सिद्ध होते. या संप्रदायाच्या उदयभूमीविषयीही विद्वानांची निरनिराळी मते आहेत. पूर्वीचा बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, नेपाळ, दक्षिण भारत या प्रदेशांपैकी कुठेतरी या संप्रदायाचा उगम झाला असावा, असे मानण्यात येते. रा. चिं. ढेरे, डेविड व्हाईट, जेम्स मॅलिंसन यांच्या मतानुसार नाथ संप्रदायाचा उद्गम दक्षिण भारतात झाला असावा.
नाथ संप्रदायाचा उदय हा सर्वसाधारणपणे पूर्वाश्रमीच्या पाशुपत, कापालिक, कालामुख, योगिनी कौल मार्ग व चौऱ्याऐंशी सिद्धांच्या परंपरेतून झाला असावा, असे मानण्यात येते. नाथ संप्रदायातील प्रमुख नाथांचा संबंध या संप्रदायांशी आलेला दिसून येतो. तसेच तंत्रविद्येचा पगडाही या संप्रदायावर आहे. नंतरच्या काळात अनेक शैव-शाक्त संप्रदाय हे नाथ संप्रदायात विलीन झाल्याचे सांगितले जाते. भारतीय इतिहासाच्या मध्यकाळात या संप्रदायाचा प्रभाव समकालीन इतर संप्रदायांवरही पडलेला दिसून येतो.
नाथ संप्रदायात नवनाथांना विशेष महत्त्व आहे. नवनाथांच्या अनेक सूची पहावयास मिळतात. प्रदेशभिन्नत्वे या सूचींमध्ये थोडी-फार नामभिन्नता आढळून येते. साधारणतः आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ व जालंधरनाथ या प्रमुख नाथांची नावे बऱ्याच सूचींमध्ये दिसून येतात. तसेच या नाथांची नावे चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचीमध्येही आढळून येतात. याव्यतिरिक्त नाथ संप्रदायात चर्पटीनाथ, नागनाथ, मीननाथ, गोपीचंद, मैनावती, भर्तृहरी, मुक्ताई, रतननाथ, धर्मनाथ, मस्तनाथ इत्यादी नाथ योगी व योगिनी प्रसिद्ध आहेत.
नाथ परंपरेनुसार या संप्रदायाच्या १२ प्रमुख उपशाखा मानल्या जातात. यांमध्ये सत्यनाथी, धर्मनाथी, रामपंथ, नाटेश्वरी, कन्हड, कपिलानी, बैरागपंथ, माननाथी, आईपंथ, पागलपंथ, ध्वजपंथ व गंगानाथी या उपशाखांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त वटेश्वर, चोलिका, कामळे, चिंचणी, रावळ व इंचगिरी या अन्य उपशाखांची नावेही विभिन्न ग्रंथ व शिलालेखांतून आढळून येतात.
नाथ संप्रदायातील नाथ-योगींचा पेहराव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. यांमध्ये कर्णकुंडले, शृंगी, किंगरी (सारंगीसारखे एक वाद्य), यज्ञोपवीत (जानवे), पवित्री, कौपीन (लंगोट), हालमटंगा (मेखला), धंधारी चक्र, रुद्राक्ष, अधारी (एक आसन पीठ), कंथा (भगव्या रंगाची गोधडी), गुदरी, लगुड किंवा दंडा, खप्पर (खापरी), अंगाला भस्म, कपाळावर त्रिपुंड, जटा, केयूर (दंडातील कडे), वलय, नुपूर, कंठहार, त्रिशूळ, बाघंबर, झोळी, योगपट्ट, कमंडलू, डमरू, सुमिरनी (रुद्राक्षमाला), खडावा, छत्र व पगडी इत्यादींचा समावेश होतो. या पेहरावांपैकी काहींचे अंकन १३ व्या शतकातील लेणी व मंदिरांवरील नाथ योगींच्या शिल्पांवर आढळून येते. लीळाचरित्र तसेच इब्न-बतूता, मलिक मुहंमद जायसी, कबीर, मीरा, सूरदास यांच्या ग्रंथांत नाथ योगींच्या वेषांची वर्णने आलेली आहेत.
नाथ संप्रदायाशी काही जाती ह्या सुरुवातीपासूनच निगडित आहेत. त्यामध्ये जोगी, तंती, जुलाहे, गडरीये, दर्जी, गोरखा, डवरी, रावळ इत्यादींचा समावेश होतो. या जाती या संप्रदायाची साधना करतात. त्यांना ‘गृहस्थ योगी’ म्हटले जाते. गुरु-शिष्य परंपरा या संप्रदायात प्रामुख्याने आढळून येते. एकमेकांना भेटताना ‘आदेश’ म्हणण्याची प्रथा प्रचलित आहे.
नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक धार्मिक व पुरातत्त्वीय स्थळे भारतीय उपखंडात पसरलेली आहेत. काही स्थळे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. यांमध्ये हरद्वार, उज्जैन, प्रयागराज, वाराणसी, काठमांडू, हिंगलाज, ज्वालामुखी, गोरखपूर, कदरी, श्रीशैलम, रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे-काजी, दभोई (गुजरात), सोनारी, त्रिंबकेश्वर, अंजनेरी, नाशिक, मढी, तोरणमाळ इत्यादी स्थळे सुप्रसिद्ध आहेत.
नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. यामध्ये कौलज्ञाननिर्णय, मत्स्येंद्रसंहिता, सिद्धसिद्धांतपद्धती, गोरक्षशतक, अमरौघशासनम, महार्थमंजिरी, गोरक्षसंहिता इत्यादी ग्रंथ या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. सिद्धसिद्धांतपद्धती या ग्रंथानुसार आदिनाथ वा ‘शक्तीयुक्त शिव’ हेच अंतिम सत्य आहे. तसेच शक्तीने युक्त असा शिवच पिंड-ब्रह्मांडाचा आधार आहे. पिंड-ब्रह्मांडाच्या अंतर्यामी वास करणाऱ्या शिवाशी समरसता स्थापित करणे हेच नाथ योगीचे परम लक्ष्य असते. म. न. देशपांडे यांच्या मते, नाथ संप्रदायातील तत्त्वज्ञान सांख्य तत्त्वज्ञानावर आधारित आहे. ज्यामध्ये पिंड आणि ब्रह्मांड यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा समन्वय समाधीच्या माध्यमातून योगी अनुभवत असतो. साधक कुंडलिनी जागृत करून षटचक्रांच्या माध्यमातून मस्तिष्कात शिव-शक्तीचे मीलन घडवून आणतो. हा संगम घडवून आणण्यासाठी शरीरशुद्धी महत्त्वाची असते. त्यासाठी हठयोगाची साधना नाथ-योगी करतात. सुरुवातीच्या काळात हठयोगाबरोबरच रसविद्या आणि तंत्रविद्या (विशेषतः कौल-तंत्र) नाथ संप्रदायात मोठ्या प्रमाणात प्रचलित होत्या.
नाथ संप्रदायात त्रिपुरासुंदरी, बालसुंदरी, काळभैरव, महाकाली यांची उपासना प्रचलित आहे. याशिवाय चामुंडा, दुर्गा, अंबा, रेणुका, महिषासुरमर्दिनी, भैरवी, शाकिनी, डाकिनी, दत्त इत्यादी देवी-देवतांना पूजले जाते.
मध्ययुगीन भारतीय इतिहासाच्या धार्मिक क्षेत्रात नाथ संप्रदायाचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. या संप्रदायाचा प्रभाव समाजाच्या सर्व घटकांवर पडलेला दिसून येतो. हिंदू धर्माबरोबरच, बौद्ध, जैन, मुस्लिम व इतर पंथांबरोबर समन्वय स्थापन करण्याचा प्रयत्न या संप्रदायाने केला आहे.
संदर्भ :
- Sarde, Vijay, ‘Archaeological Investigations of the Natha Sampradaya in Maharashtra (C.12th to 15th century CE)’, unpublished thesis submitted to the Deccan College, Pune, 2019.
- White, D. G., The Alchemical Body (Siddha tradition in Medieval India), Chicago, 1996.
- कोलते, वि. भि. संपा., लीळाचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७८.
- ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
- द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.
समीक्षक : अभिजित दांडेकर