वंशसंघर्षाचे पुरातत्त्व ही संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेची उपशाखा आहे. जमिनीवरील मालकी हक्कांसाठी, नैसर्गिक साधनांच्या उपभोगासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी लोकसमूह, वांशिक गट अथवा विविध वंशांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होतात. प्रागैतिहासिक काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत निरनिराळ्या वंशांमध्ये अथवा वांशिक गटांमध्ये जे संघर्ष झाले, त्यांच्याकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून बघणे, हा या उपशाखेचा मुख्य उद्देश आहे.

श्योनेक-किलिआनस्टाडेन येथील सामूहिक दफन.

पुरातत्त्वीय पुराव्यांवरून असे दिसते की, शेतीची आणि स्थिर जीवनाची सुरुवात होण्याच्या आधीपासून हिंसक चकमकी व लढायांना सुरुवात झाली आणि स्थिर जीवनाचा प्रारंभ झाल्यानंतर नैसर्गिक साधनसामग्रीसाठी टोळ्यांमधील संघर्षांचे प्रमाण वाढले. शिकारी व भटके जीवन जगणार्‍या टोळ्यांमधील संघर्षांचे पुरातत्त्वीय पुरावे शैलचित्रे, मानवी सांगाड्यांमध्ये अडकलेली दुरून फेकली जाणारी अस्त्रे (उदा., बाणांची टोके) आणि सामूहिक हत्या झाली असल्याचे दर्शवणारी दफने या स्वरूपांत आढळतात. जर्मनीमधील श्योनेक-किलिआनस्टाडेन या नवाश्मयुगीन (इ. स. पू. ५२०७ — ४८४९) स्थळावरील एकवीस जणांच्या एकत्रित दफनाच्या अभ्यासातून असे दिसले की, टोळीसंघर्षात ठार केलेल्यांची विटंबना केलेली शरीरे एका खड्ड्यात फेकून दिलेली होती. यात प्रौढ स्त्रिया व मुलांचाही समावेश होता. हे टोळीसंघर्षातून सामूहिक हत्या झाल्याचे उदाहरण आहे. अशाच प्रकारचे टोळीसंघर्षाचे नवाश्मयुगीन पुरावे (अंदाजे इ. स. पू. ५०००) जर्मनीतील तालहाईम आणि ऑस्स्ट्रियातील शेल्टझ या पुरास्थळांवर मिळाले आहेत.

मोहें-जो-दडो येथील सांगाडे.

उत्तर अमेरिकेत इ. स. पू. ५००० ते ऐतिहासिक काळ एवढ्या प्रदीर्घ काळात टोळ्यांमधील संघर्षांचे पुरातत्त्वीय पुरावे मिळाले आहेत. लांबून फेकलेल्या बाणांनी अथवा भाल्यांमुळे हाडांवर पडलेली छिद्रे, हाडांवर झालेल्या धारदार अथवा बोथट वजनदार शस्त्रांच्या खुणा, हातपाय अथवा इतर अवयव तोडल्याच्या खुणा आणि विजयचिन्ह म्हणून नेण्यासाठी डोक्याची कातडी सोलली गेल्याच्या खुणा असे या पुराव्यांचे स्वरूप आहे. इतर कोणत्यातरी कारणाने झालेले मृत्यू आणि टोळ्यांमधील संघर्षांतून घडलेल्या हत्या यांमध्ये फरक करण्यासाठी असे पुरावे उपयोगी पडतात. तसेच काही ठिकाणी चकमकींनंतर शत्रूच्या टोळ्यांची घरे, धान्य कोठारे, पूजेची स्थाने व संपूर्ण वसाहत उद्ध्वस्त करून जाळल्याचे पुरातत्त्वीय अभ्यासातून दिसून येते. अमेरिकेच्या विस्कॉनसिन राज्यातील अझटलान (Aztalan) या दहाव्या-बाराव्या शतकातील मिसिसिपियन संस्कृतीच्या गावावर ओनेओटा (Oneota) इंडियन टोळ्यांनी हल्ला करून ते संपूर्ण गाव जाळून भस्मसात केले होते. तेथील जळीत घरांच्या सूक्ष्म पुरातत्त्वीय अभ्यासातून या घटनेबद्दल भरपूर नवीन माहिती प्राप्त झाली आहे.

पाकिस्तानातील मोहें-जो-दडो या पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननात एचआर या नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात एकाच घरात १४ सांगाडे आढळले. तसेच रस्ते व घरांमधील मोकळ्या जागा अशा इतर सार्वजनिक भागांमध्ये व्यवस्थित दफन न केलेल्या अवस्थेत अनेक सांगाडे मिळाले होते. आक्रमक आर्य टोळ्या आणि सिंधू संस्कृतीचे लोक यांच्यामधील हा वांशिक संघर्षाचा पुरावा आहे, असे प्रतिपादन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर मॉर्टिमर व्हीलर यांनी केले आणि ‘मोहें-जो-दडो हत्याकांड’ (Mohenjo-daro Massacare) या नावाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार आक्रमक आर्य टोळ्यांनी सार्वत्रिक हत्या करून सिंधू संस्कृतीचा निकाल लावला. परंतु जे सांगाडे सापडले आहेत, ते एकाच काळातील नाहीत. तसेच सशस्त्र चकमकींमध्ये होणार्‍या जखमांच्या खुणा सांगाड्यांवर नाहीत असे दिसते. या मृतांच्या कवट्यांच्या सांख्यिकी अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तथाकथित हत्याकांडातील बळी आणि मध्य आशियातील तथाकथित आक्रमक पशुपालक व भटके आर्य यांच्यात कोणतेही साम्य नाही. अशा विविध पुरातत्त्वीय पुराव्यांवरून हा सिद्धांत खरा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संदर्भ :

  • Dye, David H. War paths, peace paths : an archaeology of cooperation and conflict in native eastern North America, Plymouth, U. K, 2009.
  • Fernández-Götz, Manuel & Roymans, Nico, Conflict Archaeology :  Materialities of Collective Violence from Prehistory to Late Antiquity, Routledge, 2017.
  • Guilaine, Jean & Zammit, Jean, The Origins of War : Violence in Prehistory, Oxford, 2005.
  • Wheeler, R. E. M. ‘Sociological aspects of the Harappa Civilization’,  Ancient India, 3: 74-78, 1947.

                                                                                                                                                                             समीक्षक : सुषमा देव