एक विषारी साप. स्क्वॅमाटा गणाच्या व्हायपरिडी कुलातील एकिस प्रजातीच्या विषारी सापांना सामान्यपणे फुरसे म्हणतात. मध्य-पूर्वेच्या आणि मध्य आशियाच्या भागात, विशेषकरून भारतीय उपखंडात हा साप आढळतो. जगभर त्यांच्या आठ जाती असून भारतात आढळणाऱ्या फुरशाचे शास्त्रीय नाव एकिस कॅरिनेटस आहे. भारतीय उपखंडात त्यांच्या पाच जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये कोकण पट्ट्यात त्यांची संख्या जास्त आहे. नाग, नागराज, मण्यार, घोणस, इ. विषारी सापांच्या तुलनेत फुरसे आकाराने सर्वांत लहान आहे.
फुरशाच्या शरीराची लांबी ३८–८० सेंमी. असते. रंग तपकिरी व फिकट पिवळसर असून तपकिरी भागांवर पांढरे ठिपके असतात. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक पांढरी नागमोडी रेषा असते. डोके तिकोनी व मानेहून वेगळे दिसत असून त्यावर बाणासारखी चंदेरी खूण असते. मुस्कट आखूड आणि गोलाकार असते. डोक्यावरच्या पहिल्या तीन खवल्यांमध्ये नाकपुड्या असतात. उर्वरित भागावर लहान खवले असतात. शरीराच्या मध्यभागावर २५–३९ खवल्यांच्या रांगा असतात. प्रत्येक खवल्यावर मध्यभागी आडे (कील) असून ते दंतुर असतात. वेटोळे घालताना आणि उघडताना खवले परस्परांवर घासले गेल्यामुळे करवतीने लाकूड कापल्यासारखा आवाज होतो. पोटावरील खवल्यांची संख्या १४३–१८९ असून हे खवले रुंद असतात. शेपूट लहान असून अधर बाजूचे खवले पूर्ण असतात.
फुरसे निशाचर असले तरी संधिप्रकाशात आणि क्वचित प्रसंगी दिवसाही सक्रिय असते. दिवसा ते बिळात, सरपणाच्या ढिगात, गोवऱ्यात व दगडाखाली लपून बसते. वाळूत फक्त डोके वर ठेवून ते शरीर पुरून घेते. पावसाळ्यात फुरसे झाडावर चढून बसते. फुरसे चावल्याच्या अनेक घटना त्याला न ओळखता आल्यामुळेच घडतात. इतरांना घाबरविण्यासाठी ते शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांवर घासून विशिष्ट प्रकारचा आवाज निर्माण करतात. जमिनीवरून जाताना ते चपळतेने हालचाली करतात. लहान उंदीर, सरडे, बेडूक, गोम व पैसा यांसारखे प्राणी त्यांचे भक्ष्य असून काही वेळा ते मोठे कीटकही खातात. फुरसे अंडजरायुज आहे. गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. मादी एप्रिल-ऑगस्ट महिन्यांच्या कालावधीत ३–१५ पिलांना जन्म देते.
मनुष्याचा धोका जाणवताच फुरसे हल्ला करते. स्वसंरक्षण करताना ते ‘8’ अशा आकारात शरीराचे वेटोळे करून मध्यभागी डोके स्थिर ठेवते आणि स्प्रिंग सरळ झाल्याप्रमाणे चपळतेने दंश करते. त्याच्या विषग्रंथीमध्ये सु. १८ मिग्रॅ. विष असते. एका वेळी ते १२ मिग्रॅ. विष टोचू शकते. मनुष्यासाठी विषाची प्राणघातक मात्रा ५ मिग्रॅ. असते. दंश झाल्यानंतर काही मिनिटांत तीव्र वेदना होतात आणि सूज येते. फुरसे चावल्यास रक्तस्राव होतो व रक्त गोठण्यामध्ये दोष निर्माण होतो. तसेच मोठ्या आतड्यातून रक्त जाते आणि रक्ताच्या उलट्या व गुळण्या होतात. मूत्रातून रक्त जाऊ लागल्याने शरीरातील द्रव मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात. अतिरक्तस्रावामुळे मनुष्य मृत्यू पावतो. फुरसे चावल्यानंतर काही तास ते सहा दिवसांपर्यंत बहुतेक रुग्णांमध्ये मूत्रविसर्जन कमी होते. काही रुग्णांमध्ये ते जवळजवळ थांबते. रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्यामुळे वृक्काचे (मूत्रपिंडाचे) कार्य थांबते. त्यामुळे रुग्णाचे अपोहन करावे लागते. रक्तदाब वाढतो. ५०% रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांतील रक्तपेशींचे विघटन होते. फुरसे चावल्यामुळे मृत्यू आला नाही, तरी दंश केलेल्या ठिकाणी जखमा सडत जाऊन हातापायांसारखे अवयव निकामी होतात. कालांतराने या जखमा चिघळत जाऊन मृत्यू ओढवतो.
फुरशाच्या दंशावर आठपेक्षा अधिक प्रतिसर्पविषे उपलब्ध आहेत. फुरशाचा दंश झाल्यानंतर काही तासांत प्रतिसर्पविष टोचल्यास आणि शिरेतून लवणद्राव दिल्यास दंशबाधित व्यक्ती वाचण्याची शक्यता वाढते. भारतातील ग्रामीण रुग्णालयांत सर्पदंशावरील औषधे उपलब्ध झाल्यामुळे फुरसे चावून मृत्यू येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
फुरशाच्या विषापासून काही औषधे तयार करतात. उदा., एकिस्टॅटीन हे रक्त न गोठू देणारे औषध फुरशाच्या विषाच्या भुकटीपासून तयार करतात.