‘हाऊस ऑफ होरस’ या देवताकुलातील एक प्रमुख प्राचीन ईजिप्शियन देवता. ग्रीकमधील हाथोरची व्युत्पत्ती ‘हाथर’ अशा नावानेही आढळते. आकाशस्थ देवता, होरस देवता आणि सूर्यदेव राची आई किंवा पत्नी अशा विविध भूमिकांमध्ये ही देवता दिसते. राच्या मिथकांमध्ये त्याच्या डोळ्याच्या भूमिकेत काम करणार्या अनेक देवींपैकी हाथोर ही एक होती. या देवतेने राचे अनेक शत्रूंपासून संरक्षण केले. ही देवता संगीत, नृत्य, आनंद, प्रेम, लैंगिकता आणि मातृत्व या भावनांचे प्रतिनिधित्व करते. तिचा संबंध अनेक पुरुष देवतांची पत्नी आणि आई म्हणून येतो.
हाथोरची प्रतिमा बहुतेकवेळेस गाईच्या रूपात साकारली गेली आहे. गाय या रूपात तिच्या मातृत्वाचे सूचन होते. या देवतेची प्रचलित असणारी सामान्य रूपे म्हणजे गाय, सूर्यप्रभा असणारी, केस मोकळे असलेली स्त्री; परंतु काही ठिकाणी तिची प्रतिमा सिंहीण, नागीण किंवा सायकोम वृक्ष म्हणून साकारलेली आहे.
जुन्या राज्यकर्त्यांनी या देवतेला संरक्षण आणि अधिक महत्त्व दिल्यामुळे ती ईजिप्तच्या सर्वांत महत्त्वाच्या देवतांपैकी एक झाली. इतर देवतांपेक्षा हाथोरची जास्त मंदिरे निर्माण झाली. तिचे सर्वांत प्रमुख मंदिर अप्पर ईजिप्तमधील डेंडेरा येथे होते. ईजिप्शियन लोकांनी तिला न्यूबिया आणि कनान यांसारख्या परदेशी देवतांशी जोडले. संततीची इच्छा असणाऱ्या स्त्रिया या देवतेची पूजा करीत असत.
मूळ : इ.स.पू. ३१००च्या काळात गाईचे शिंग आणि कान असलेली स्त्री हाथोरचे प्रतिनिधित्व करणारी दिसून येते. प्रेडिनेस्टिक ईजिप्तमधील कलाकृतींमध्ये गुरांच्या प्रतिमा वारंवार दिसतात. ‘मातृत्व’ आणि ‘पौष्टिक अन्नपदार्थ’ यांचे प्रतीक म्हणून प्राचीन ईजिप्तसह अनेक संस्कृतींमध्ये गाईंचा आदर केला जातो; कारण त्या आपल्या वासराची काळजी घेतात आणि मानवाला दूध देतात. ही सुरुवातीच्या काळातील उदाहरणे असून चौथ्या राजवंशापर्यंत (इ.स.पू. २६१३–२४९४ ) पर्यंत हाथोरचा उल्लेख स्पष्टपणे आलेला नाही. चौथ्या राजवटीत ही देवता अधिक लोकप्रिय झाली. याच काळात बॅट ही देवता आणि हाथोर या देवतांचे एकत्रीकरण झाले. कालांतराने हाथोर या देवतेचे रासोबत आलेले उल्लेख ईजिप्शियन कथांमध्ये दिसतात. ही देवता राची पौराणिक पत्नी झाली, फेअरोची ती दिव्य आई बनली.
भूमिका : हाथोर देवता विविध भूमिकांमध्ये दिसू लागली. ईजिप्शियन शास्त्रज्ञ रॉबिन गिलम यांच्या मते सामान्य लोकांद्वारे उपासना करण्यात येणाऱ्या स्थानिक देवता हाथोरमध्ये समाविष्ट झाल्या. ती ईजिप्शियन देवतांच्या गुणांचे वैविध्य दर्शविते. ही देवता ईजिप्शियन स्त्रीत्वाचे उदाहरण आहे.
हाथोरला ‘आकाशस्थ सौंदर्यवती’ आणि ‘तारकांची राणी’ असे म्हटले जाते. ती प्रत्येक पहाटे सूर्यास जन्म देते, असे म्हटले जाते. ती एक सौरदेवता आहे. होरस आणि रा यांसारख्या सूर्यदेवतांच्या मंडळातील ती एक सदस्य आहे. तिला ‘गोल्डन वन’ म्हणून संबोधले जाते. राष्ट्राच्या डोळ्याची भूमिका साकारणार्या अनेक देवतांपैकी ती एक होती. राच्या मस्तकाभोवती सूर्यचक्र (प्रभावळ) असते. तसेच सूर्यचक्र हिच्या मस्तकाभोवती असते. राची माता, पत्नी आणि मुलगी अशा विविध भूमिका ही देवता पार पाडते, असे विविध ईजिप्शियन कथांमध्ये सांगितलेले आहे. राच्या डोळ्यांनी त्याचे शत्रूंपासून संरक्षण केले.
इ.स.पू. १४व्या शतकातील नेबामुनच्या दगडी शिल्पामध्ये हाथोरची नृत्य करतानाची प्रतिमा आहे. ईजिप्शियन धर्मामध्ये मानवी संवेदनांचा आनंद साजरा करण्यात येत असे. ईजिप्शियन धर्मसंकल्पनेनुसार असे मानले जाते की, मानवी संवेदना, आनंद या मानवतेला मिळालेल्या देणग्या आहेत. ईजिप्शियन लोक त्यांच्या धार्मिक सणांमध्ये खात-पित, नृत्य करत. फुले व धूपांनी वातावरण ते प्रसन्न करीत. हाथोरची अनेक आयुधे संगीत, नृत्य यांच्याशी संबंध सांगतात. ‘डिस्ट्रॉक्शन ऑफ मॅनकाइंड’च्या कथेत राचा डोळा वाइन/बिअर घेतल्यामुळे शांत झाला. संगीत, नृत्य आणि बिअर यांसारख्या संस्कृतीमुळे हाथोर देवता शांत झाली.
हाथोर देवता स्त्रीशक्ती, आनंद, सृजनशीलता दर्शविते. ईजिप्शियन सृष्टिनिर्मितीच्या मिथकांमध्ये तिने स्वतःच जगाची निर्मिती करण्यास मदत केल्याचे संदर्भ आढळतात. ती पुष्कळ नर देवतांची सोबती होती. त्यांपैकी फक्त रा हा देव सर्वांत प्रमुख देवता आहे.
हाथोरची लैंगिक बाजू काही छोट्या कथांमध्ये दिसून येते. ‘द टेल ऑफ द हर्ड्समन’ या कथेत एक मेंढपाळ दलदलीच्या ठिकाणी केसाळ प्राण्यांप्रमाणे दिसणाऱ्या देवीचा सामना करतो. दुसर्या दिवशी तो या घटनेचे वर्णन करताना त्या देवीचा उल्लेख ‘नग्न आणि मोहक बाई’ म्हणून करतो. या कथेचा अभ्यास करणारे बहुतेक ईजिप्शोलॉजिस्ट ही स्त्री हाथोर किंवा तिच्यासारखी अन्य देवी असल्याचे समजतात. ती वन्य, धोकादायक किंवा कामुक असू शकते. थॉमस स्नायडर या मजकुराचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की, देवीबरोबरच्या चकमकीदरम्यान मेंढपाळांनी तिला शांत करण्यासाठी ‘काहीतरी’ केले आहे. ‘द कॉन्टेन्डींग्स ऑफ होरस अँड सेथ’ अशा कथांमध्ये हाथोर देवतेच्या कामुकतेचे, तिच्या सुंदर केसांचे वर्णन येते. ईजिप्शियन वाङ्मयात अशा मिथक गोष्टी आहेत, ज्यात कोणत्याही ग्रंथात स्पष्टपणे वर्णित केलेल्या नाहीत. हाथोरच्या या पैलूंचा विचार करून तिला ‘प्रेमाची देवता’ असे संबोधले जाते. पपायरस चेस्टर बिट्टीच्या प्रेमकथांमध्ये हाथोरकडे प्रेमसाफल्ल्यासाठी प्रार्थना केलेली दिसून येते.
हाथोर देवता विविध बालदेवतांची आई मानली जात असे. तिला बर्याचदा होरसची आई आणि साथीदार म्हणून मानले गेल्याचे दिसून येते. ओसायरिसच्या पुराणकथेनुसार होरस आणि हाथोर यांच्यातील संबंध जुना आहे. सेथने हल्ला केल्यावर हाथोरने होरसचा हरवलेला डोळा परत मिळविल्याचे म्हटले जाते. हाथोरला मातृत्वासह परिचारिका म्हटले आहे. ‘द कॉन्टेन्डींग्स ऑफ होरस अँड सेथ’मध्ये हाथोर देवतेने केलेल्या उपचारांचे वर्णन आले आहे.
प्रतिमा : हाथोरला बहुतेकवेळा गाईने शिंगांच्या मधोमध सूर्यचक्र लावलेले दर्शविले जाते. गाईचे डोके असलेली ती स्त्री म्हणूनही दिसते. तिचे सर्वांत सामान्य रूप म्हणजे शिंगे आणि सूर्यचक्र असणारी स्त्री. काही वेळेस तिला गाईचे कान असलेलेही दिसून येतात. बहुतांशी चित्रांमध्ये लाल किंवा नीलमणी म्यानचा पोशाख किंवा दोन्ही रंगांचा मध्य साधणारा तिचा पोशाख असतो. ‘सेव्हन हॅथर्स’मध्ये सात गाईंच्या समूह रूपात तिला चित्रित केले गेले. गाईव्यतिरिक्त अन्य काही प्राण्यांनीही तिचे प्रतिनिधित्व केले. तिला ‘युरियस’ या ईजिप्शियन सर्पदेवतेच्या रूपात जेव्हा चित्रित केले गेले, तेव्हा तिच्या वर्णातील क्रूर आणि संरक्षणात्मक पैलू प्रस्तुत केला गेला. तिला सिंहिणीच्या रूपात वर्णित केलेले आहे. तेव्हाही तिच्यातील क्रूरपणा, नेतृत्व या गुणांचे प्रतिनिधित्व करण्यात आले. याउलट ‘घरगुती मांजर’ रूपातही हाथोर दिसते. नेत्रदेवीच्या शांत स्वरूपाचेही ती प्रतिनिधित्व करते. सायकोम वृक्षाच्या रूपातही तिचे रूप दर्शविलेली आहे. पपायरस वृक्षाचे देठ तिच्या हातात दिसतात. त्याचप्रमाणे आरसे हेसुद्धा या देवीचे प्रतीक आहेत.
हाथोर ही ईजिप्शियन देवतांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध पैलू असणारी देवता आहे.
संदर्भ :
- Assmann, Jan; Lorton, David, Trans. Death and Salvation in Ancient Egypt, New York, 2005.
- Bleeker, C. J. Hathor and Thoth : Two Key Figures of the Ancient Egyptian Religion, Netherlands, 1973.
- Meeks, Dimitri; Favard-Meeks, Christine; Goshgarian, G. M. Trans. Daily Life of the Egyptian Gods, New York, 1990.
- Pinch, Geraldine, Egyptian Mythology : A Guide to the Gods, Goddesses, and Traditions of Ancient Egypt, Oxford, 2004.
समीक्षण : शकुंतला गावडे