प्राचीन ईजिप्शियन आकाशदेवता. प्रारंभी नाईल नदीच्या खोऱ्यातील भटक्या जमातीतील लोकांकडून हिचे पूजन केले गेले. ईजिप्तच्या निम्न प्रदेशातील रहिवासी आकाशगंगेला नटचे स्वर्गीय रूप मानीत असत. विविध रंजक व सुंदर मिथ्यकथा या लोकप्रिय देवतेभोवती गुंफलेल्या आढळतात. तिचे वैयक्तिक जीवन तसेच ऋतमय विश्वप्रणाली या दोन्ही क्षेत्रांशी त्या कथा निगडित आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मिलापाची प्रतिबिंबे त्यांमधून प्रत्ययास येतात. या मिथकांचा पद्धतशीर विचार दोन विभागांत करता येईल.

१) नटच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित :

  • विश्वोत्पत्तिमिथकानुसार आतुम ऊर्फ सूर्यदेव रा याने स्वयंप्रेरणेने स्त्रीशक्तीच्या साहाय्याशिवाय शू व तेफ्नूट यांना निर्माण केले. हे आदिम जोडपे होय. त्यांची दोन अपत्ये म्हणजेच पृथ्वीदेव गेब व आकाशदेवता नट. मानवांना राहण्यासाठी जागा देण्याच्या हेतूने आतुमने प्रगाढ मिठीत असलेल्या गेब-नट या उत्कट प्रेमिकांना परस्परांपासून दूर केले. त्यानंतर हे महत्त्वाचे कार्य त्याने शूवर सोपविले. परिणामी शू हा नेहमी गेब व नट यांना विभक्त करताना दिसतो. तत्पूर्वी नट ग्रहताऱ्यांना जन्म देते.
  • आपल्या नकळत तसेच परवानगीशिवाय ज्यांनी विवाह केला त्या गेब-नट यांच्यावर रागावलेल्या रा याने शाप दिला की, नटला वर्षाच्या कोणत्याही महिन्यात मुलाला जन्म देता येणार नाही. थॉथ या देवाला तिची दया आली. त्याने चंद्राला एका खेळात हरवून आधी ठरल्यानुसार अतिरिक्त पाच दिवस मिळविले. दिनदर्शिकेत नसलेल्या या पाच दिवसांपैकी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ओसायरिस, होरस, सेथ, इसिस, नेफ्थिस या पाच मुलांना नटने जन्म दिला.
  • मर्त्य जगाला विटलेल्या राने स्वतःला स्वर्गलोकी उचलून नेण्याची नटला विनंती केली. त्याला पाठीवर घेऊन नट जसजशी वर उंचावू लागली, तसतशी तिला भोवळ येऊ लागली. त्या वेळी चार देवांनी तिचे पाय स्थिर केले. पिता शूने तिच्या पोटाला आधार दिला, ज्यायोगे ते ताणलेल्या छप्पराप्रमाणे झाले. त्याच्यावर राने तारे बसविले.

२) विश्वोत्पत्ती, विश्वस्थिती, ऋत या संकल्पनांशी निगडित :

  • नटशी जोडलेली एक लोकप्रसिद्ध कथा दिवसरात्रीच्या अव्याहत चक्राशी संबंधित आहे. यानुसार नट दररोज संध्याकाळी सूर्याला (रा या रूपात) गिळंकृत करते. पुढील दिवशी सकाळी परत जन्म देते. चिरंतन जन्मदात्री या तिच्या भूमिकेमुळे नटचा संबंध मृतात्म्यांच्या पुनरुज्जीवनाशीदेखील जोडला जातो. अशा प्रकारे मर्त्यलोकापल्याड असलेल्या विश्वात तिला मैत्रीपूर्ण स्थान आहे.
  • नट व गेब दिवसा परस्परांपासून विलग असतात. संध्यासमयी नट गेबला भेटण्यासाठी आकाशातून खाली उतरते. परिणामी अंधार पसरतो.

नट देवतेचे वर्णन : कृष्णवर्णीय किंवा गडद निळ्या वर्णाची नट कमानीप्रमाणे पृथ्वीवर वाकलेली दिसते. तिचे जमिनीवर टेकलेले हात व पाय चार मुख्यदिशांचे निदर्शक आहेत. तिच्या शरीरावर जडलेल्या सोनेरी तारका हे तिच्या मुलांचे प्रतीकात्मक चित्रण होय. जलकुंभ घेऊन बसलेली स्त्री या रूपातही ती काही ठिकाणी आढळते. जलकुंभ हे गर्भाशयाचे प्रतीक मानले गेले आहे. शवपेटिकेच्या झाकणाच्या आतील बाजूस तिची प्रतिमा दिसते. मृतात्म्यांवरील संरक्षक आकाश ही तिची भूमिका या रुढीमागे असू शकेल.

अंतरिक्षदेवतांची मंदिरे नसण्याच्या प्रथेनुसार नटचीदेखील मंदिरे नाहीत. मात्र तिच्या सन्मानार्थ वर्षाच्या सर्व कालखंडांमध्ये साजरे केले जाणारे काही उत्सव आढळतात.

संदर्भ :

  • Armour, Robert A. Gods and Myths of Ancient Egypt, Cairo, 1986.
  • Cotterell, Arthur, The Illustrated Encyclopedia of Myths & Legends, London, 1989.
  • Geddess and Grosset, Classical Mythology, London, 1995.
  • https://www.ancient-egypt-online.com/nut.html
  • https://egyptianmuseum.org/deities-nut

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे