होरस या नावाच्या दोन प्राचीन ईजिप्शियन देवता आहेत. त्यांपैकी ‘होरस द एल्डर’ म्हणजे थोरला होरस अर्थात हरओरिस. हा ओसायरिस, इसिस, सेत(थ), नेफ्थिस वगैरेंचा भाऊ होय. त्याच्याकडे दिवसाचे आकाश आणि सूर्याचा अधिकार दिलेला होता. नंतरच्या काळात धाकट्या होरसमध्ये त्याचे विलीनीकरण झाल्याचे दिसून येते.

बहिरी ससाण्याच्या रूपातील होरस

‘होरस द यंगर’ म्हणजे धाकटा होरस. हा इसिस आणि ओसायरिसचा पुत्र असून प्राचीन ईजिप्तमधील आकाशदेवता होय. ओसायरिस खालोखाल महत्त्वाचा असा हा देव होर, हेर, हर किंवा हेरू या नावांनीही ओळखला जात असे. त्याच्या नावाचा अर्थ ‘दूर असणारा’ असा होतो.

होरसच्या कार्यांनुसार त्याची वेगवेगळी रूपे मानली गेलेली आहेत. होरपाखेरेद अर्थात बाळ होरस, होरसीसिस अर्थात इसिसपुत्र होरस, होरमखिस अर्थात अंतरिक्षस्थ सूर्यरूप होरस, हरमाऊ अर्थात वरच्या आणि खालच्या ईजिप्तचे एकीकरण करणारा होरस ही त्यांपैकी महत्त्वाची रूपे आहेत.

सूर्याची सोनेरी तबकडी धारण केलेला बहिरी ससाण्याचे मुख असणारा होरस मानवी शरीरावर बहिरी ससाण्याचे मुख असणारी त्याची मूर्ती असते. काही वेळा खुद्द बहिरी ससाण्याच्या रूपातही होरस दाखवला जातो. तसेच पंखधारी तबकडीरूप सूर्य हेही त्याचेच रूप आहे. हा तबकडीरूप सूर्य त्याच्या मुकुटावरही दाखवलेला असतो. होरसचा उजवा डोळा सूर्य, तर डावा डोळा चंद्र आहे. त्यांद्वारे तो जगावर लक्ष ठेवू शकतो. त्याचे दुरंगी तपकिरी पंख चांदण्या आहेत.

होरुसचा डोळा‒‘वेडजेट’.

त्याचा काका सेथने फसवणूक करून ओसायरिसचा खून केल्याने होरस आणि सेथ यांच्यात वैर निर्माण झाले. ओसायरिसच्या मृत्यूनंतर इसिसने सेथच्या नजरेपासून दूर वाळवंटी भागात त्याला विंचू, साप, जंगली प्राणी वगैरेंपासून सुरक्षित वाढवले आणि सेथशी झुंज घेण्यास सज्ज बनवले. दीर्घकाळ चाललेल्या युद्धांत सेथला हरवून होरस ईजिप्तचा राजा झाला. त्यामुळे त्याला युद्धदेवही समजले जाते. तसेच त्याला न्यायाचा आणि व्यवस्थेचा रक्षकही समजले जाते.

प्राचीन ईजिप्तमध्ये राजाला जिवंतपणी होरस, तर मरणोत्तर ओसायरिस समजले जात असे. बहुतेक राजे होरसचे एखादे नाव स्वतःचे बिरुद म्हणून लावत असत. राजसत्तेशी असा थेट संबंध असल्याने होरसचा पंथ इ.स.पू. तीन हजार ते अगदी सनोत्तर चारशे वर्षांपर्यंत पूर्ण ईजिप्तभर अतिशय लोकप्रिय होता.

ओसायरिसबरोबर होरसचे चार मुलगे

सेथसोबत झालेल्या युद्धात जखमी झालेला होरसचा चंद्ररूप डावा डोळा थोथ देवतेने बरा केला. हा बरा झालेला डोळा ईजिप्शियन चित्रलिपीतील ‘वेडजेट’ किंवा ‘उडजेट’ नामक अतिशय महत्त्वाचे चिन्ह असून ते संरक्षण, राजसत्ता, आणि आयुरारोग्यदर्शक आहे. आजही डॉक्टरांच्या औषधयोजनेच्या कागदावर सुरुवातीला लिहिली जाणारी आर् एक्स् (Rx) ही चिन्हे ह्या वेडजेटवरूनच आलेली आहेत.

त्याचे ताईत लाल आणि निळ्या मूल्यवान दगडांत बनवले जात. होरसचा डोळा ह्या दोन ताईतांच्या रूपात मरणोत्तर जीवनात साहाय्यभूत होत असे. आपल्या इम्सेती, हॅपी वगैरे चार मुलांमार्फत होरसचा मरणोत्तर जीवनाशीही संबंध होता. हे चारही देव ममीच्या विविध अवयवांचे रक्षक आहेत.

गोरूपी मातृदेवता हाथोर आणि वृश्चिकरूपी सुफलनाची देवता सरकेत ह्या होरसच्या पत्न्या मानल्या गेल्या आहेत. एका मतानुसार होरसचा जखमी डोळाही हाथोरनेच बरा केला. तर सरकेत मरणोत्तरकार्यांत त्याला साहाय्य करते.

संदर्भ :

  • Bunson, Margaret, Encyclopaedia of Ancient Egypt, New York, 2012.
  • Remler, Pat, Egyptian Mythology A to Z, New York, 2010.

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे