बंदिछावण्यांचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक भाग आहे. एका अथवा अनेक माणसांना एकाच ठिकाणी बंदिवासात ठेवणे म्हणजेच डांबून ठेवणे. यामुळे माणसांच्या हालचालींवर मर्यादा येते. विरोधी मताचे लेखक, कलावंत, वैज्ञानिक आणि विचारवंतांपासून सत्तेला असणारा धोका कमी करण्यासाठी बंदीछावण्या उभारल्या जात.

पोलंड येथील आऊसवित्झ बंदिछावणीचे दृश्य (२००४).

आधुनिक जगाच्या इतिहासात विविध कारणांनी खूप लोकांना छावण्यांमध्ये डांबून ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषतः पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांच्या काळात शत्रूराष्ट्रांच्या नागरिकांना अडकवून ठेवण्यासाठी आणि पकडलेल्या युद्धकैद्यांना बंदिस्त करून ठेवण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, इटली, चीन व जपानसह अनेक राष्ट्रांमध्ये बंदिछावण्या उभारल्या होत्या. याखेरीज आपल्याच देशातील विरोधी नागरिकांना अथवा राजकीय कैद्यांना अडकवून ठेवण्यासाठीही स्पेन, सोव्हिएत महासंघ आणि कंबोडियात बंदिछावण्या बनवण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त वंशद्वेशामधून ज्यू लोकांचा नायनाट करण्यासाठी नाझी जर्मनीने त्यांनी पादाक्रांत केलेल्या देशांमध्ये अनेक बंदिछावण्या तयार केल्या होत्या.

नाझी जर्मनीने पोलंडमध्ये प्रामुख्याने सहा मोठ्या बंदिछावण्या तयार केल्या होत्या (१९४१-४४). आऊसवित्झ-बिर्केना व चेल्मनो (पश्चिम पोलंड) आणि ट्रेब्लिन्का, सोबिबोर, मेदनेक आणि बेल्झेक (पूर्व पोलंड) या बंदिछावण्यांमध्ये यूरोपातील लक्षावधी ज्यू आणि नाझींच्या दृष्टीने ’जगण्यास लायक नसलेले’ लोक बंदिस्त होते आणि लक्षावधींचा संहार करण्यात आला. या सर्व बंदिछावण्यांचे आता काळ्या वारसास्थळांमध्ये रूपांतर झाले आहे. या आणि पोलंडमधील इतर बंदिछावण्यांचा काही प्रमाणात पुरातत्त्वीय अभ्यास झालेला आहे. ही जनसंहाराची केंद्रे असल्याने अशा संशोधनांचा समावेश जनसंहाराचे पुरातत्त्व (Genocide Archaeology) यातही केला जातो.

कंबोडियातील टुओल स्लेंग छळछावणी.

बंदिछावण्यांचा पुरातत्त्व दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची कल्पना तुलनेने नवी आहे आणि या अभ्यासाला अनेक मर्यादा आहेत. बंदिछावण्यांमध्ये लक्षावधींच्या संख्येने माणसांची दफने केली असल्याने अशा सामूहिक दफनांच्या अभ्यासासाठी न्यायसाहाय्यक मानवशास्त्रीय (Forensic Anthropology) पद्धतींचा वापर केला जातो. बंदिछावण्यांचा अभ्यास करताना कैद्यांच्या आठवणी आणि सैनिकांच्या मुलाखतींमधून मिळालेली माहिती व उपलब्ध नोंदी उपयोगी पडतात. तसेच छावण्यांमध्ये असणार्‍या विविध इमारती व बराकींचे भग्न अवशेष, मोडतोड झालेली वाहने व यंत्रसामग्री, काटेरी तारांची कुंपणे, छळ करण्यासाठी वापरलेली निरनिराळी उपकरणे व शस्त्रे, कैद्यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू (बूट, कपडे आणि पेट्या) आणि हत्या करून टाकलेल्या खड्ड्यांमध्ये सांगाड्यांबरोबर मिळालेल्या बंदुकीच्या गोळ्या अशा नाना प्रकारच्या भौतिक पुराव्यांचा अर्थ लावला जातो. यांमधून बंदिछावण्यांची रचना, तेथील प्रशासकीय व व्यवस्थापन यंत्रणा, कैद्यांचे दैनंदिन जीवन आणि त्यांच्या संहाराच्या पद्धती यांची माहिती मिळते. बंदिछावण्यांमध्ये सर्व ठिकाणी तेव्हा वापरात असलेल्या इमारती व कैद्यांच्या बराकी उपलब्ध नाहीत. कारण दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस माघार घेताना नाझींनी त्या जाणीवपूर्वक नष्ट केल्या होत्या. तथापि पोलंडमधील आऊसवित्झ-बिर्केना व मेदनेक आणि जर्मनीतील उत्तर बेर्गेन-बेल्सेन या बंदिछावण्यांमधील बहुतेक इमारती व कुंपणे अद्याप टिकून आहेत. अशा इमारतींचे ड्रोन वापरून हवाई सर्वेक्षण, संगणकांवर आधारीत प्रारूपे आणि लिडार म्हणजे लाइट डिटेक्शन अँड रेंजींग या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले नकाशे इत्यादी वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग होतो. विशेषतः लिडारमुळे झाडझाडोर्‍यांच्या खाली असणारे अवशेषही दिसू शकतात.

बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासात भूरसायनविज्ञान उपयोगी पडते, हे उत्तर पोलंडमधील स्टुथोफ या नाझी जर्मन बंदिछावणीच्या संशोधनातून दिसून आले. या छावणीत १९३९ ते १९४५ दरम्यान ६५००० कैदी ठार केल्याने आणि अत्यंत वाईट परिस्थितीमुळे मरण पावले होते. त्यांचे सामूहिक दफन होत असे, त्या ठिकाणी फॉस्फरस तर छावणीच्या इतर काही भागांमध्ये अर्सेनिक, पारा, शिसे, जस्त आणि क्रोमियम प्रचंड प्रमाणात होते.

स्वतंत्रपणे बंदिछावण्यांचा पुरातत्त्व दृष्टीकोनातून अभ्यास करण्याचे महत्त्व कॅनडामधील एका उदाहरणाने स्पष्ट होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश कोलंबियात मोरिसे या ठिकाणी ऑस्ट्रिया, जर्मनी व हंगेरी या शत्रूराष्ट्रांमधील स्थलांतरित लोकांसाठीची बंदिछावणी होती. दुसर्‍या महायुद्धानंतर बंदिछावणी या शब्दाला चिकटलेला नकारात्मक अर्थ टाळण्यासाठी सरकारने बरीचशी कागदपत्रे नष्ट करून ती स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला. तथापि पुरातत्त्वीय सर्वेक्षणाच्या विविध आधुनिक तंत्रांचा वापर आणि दफनांच्या अभ्यासांतून मोरिसे बंदिछावणीतील जीवनाचे वास्तव समोर आले.

विसाव्या शतकातील बंदिछावण्यांमध्ये झालेल्या सामूहिक हत्यांच्या कडवट आठवणी, ते सगळे भोगलेल्या देशामध्ये अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे असे संशोधन करताना पुरातत्त्वज्ञांना अनेक निर्बंधांचा सामना करावा लागतो व निष्कर्ष प्रसिद्ध करताना विशेष संवेदनशीलता बाळगावी लागते. याखेरीज असे काही घडलेच नाही, असा दावा करणारे अनेक गट (विशेषतः ज्यूविरोधी नवनाझी आणि नवे फॅसिस्ट गट) अस्तित्वात आहेत. त्यांच्या ज्यू लोकांच्या संहाराला नाकारण्याच्या (Holocaust Denial) भूमिकेमध्ये पुरातत्त्वीय पद्धतींवर आक्षेप घेणे हा महत्त्वाचा भाग असतो. या कारणासाठी बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वातील संशोधन अधिक जबाबदारीने व अनेकदा निष्कर्ष न्यायालयात सिद्ध होऊ शकतील अशा प्रकारे केले जाते.

स्पेनमध्ये जनरल  फ्रॅन्सिस्को फ्रँको (१८९२—१९७५) याची फॅसिस्ट विचारसरणीची हुकूमशाही राजवट होती (१९३६—१९७५). त्याच्या राजवटीत १९३६-४७ या दरम्यान १८८ बंदिछावण्या उभारण्यात आल्या होत्या आणि त्यात सरकारला विरोध करणारे पाच लाख नागरिक व इतर यूरोपीय लोक डांबून ठेवले होते.  या बंदिछावण्यांच्या अभ्यासातून तेथील कैदी कसे राहत होते आणि त्यांचा कसा छळ केला जात होता, हे पुरातत्त्वीय पुराव्यांमधून दिसून आले आहे.

कंबोडियात १९७५-७९ या चार वर्षांमध्ये कंबोडियात ख्मेर रूज (Khmer Rouge) या नावाने ओळखल्या जाणार्‍या साम्यवादी सरकारची सत्ता होती. पोल पॉट (१९२५—१९९८) या हुकूमशहाच्या नेतृत्वाखालील या सरकारने देशाचे नाव बदलून ’डेमोक्रॅटिक काम्पुचिया’ असे केले होते. या काळात संपूर्ण देशच एक तुरुंग बनला होता. सरकारला विरोध करणारे एकूण ऐंशी लाख लोक अनेक छळछावण्यांमध्ये कैदेत होते. अनन्वित छळ व सरळसरळ गोळ्या घातल्याने एकूण सतरा लाख लोक मरण पावले होते. राजधानी प्नॅामपेन्ह पासून पंधरा किमी. अंतरावर असलेल्या चुओंग इक येथे ठार मारण्यासाठीची खास छावणी होती. पोल पॉट सरकारच्या पाडावानंतर तेथे १२९ सामूहिक दफने मिळाली. त्यांतील ८६ दफनांच्या पुरातत्त्वीय उत्खननात किमान ९९०० लोकांचे सांगाडे मिळाले होते. या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर बहुतेक लोक आत्यंतिक कुपोषण, पाशवी मारहाण आणि डोकी फोडल्याने मेले असल्याचे दिसले. त्यात पाच वर्षांपासून ते पन्नाशी ओलांडलेल्यांचा समावेश होता.

संदर्भ :

  • Beaulieu, Sarah Eve, Remembering the Forgotten Archaeology at the Morrissey WWI Internment Camp, M.A. Thesis, Simon Fraser University, 2015.
  • Fleischman, Julie M. ‘Working with the Remains in Cambodia : Skeletal Analysis and Human Rights after Atrocity’, Genocide Studies and Prevention,10,(2),: 121-130, 2016.
  • Gilead, Isaac; Haimi, Yoram & Mazurek, Wojciech, ‘Excavating Nazi Extermination Centres’, Present Pasts, 1: 10-39, 2009.
  • Kiernan, Ben, Ed. Samuel, Totten, ‘The Cambodian Genocide, 1975-1979’, Century of Genocide, Routledge, 1997.
  • Shermer, Michael & Grobman, Alex, Denying history : who says the Holocaust never happened and why do they say it?, Berkeley, 2000.
  • Sturdy Colls, Caroline, Holocaust Archaeologies Approaches and Future Directions, 2015.

समीक्षक : सुषमा देव