एक प्रसिद्ध रससिद्ध व नाथ-योगी. चर्पटीनाथांना चर्पटी, चर्पटीपाद, चर्पट्री, चर्यादिपा या इतर नावांनीही ओळखले जाते. मीनचेतनात यांना ‘कर्पटीनाथ’ म्हटले गेले आहे. रज्जबदासाने आपल्या सरबंगी ग्रंथात चर्पटीनाथांना चारिणीगर्भोत्पन्न मानले आहे. लोककथांनुसार त्यांचा जन्म गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने झाला होता.

चर्पटीनाथांचे एक चित्र.

चर्पटीनाथांचे नाव ‘चंबा’ राज्याच्या मध्ययुगीन वंशावळीमध्ये उल्लेखिले गेल्याने, सुमारे दहाव्या शतकात स्थापन झालेल्या या राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान अधोरेखित होते; तथापि ही वंशावळ मूळतः १६-१७ व्या शतकात लिहिली गेली होती. चंबाच्या राज प्रासादासमोरच्या मंदिरात एक चर्पट मंदिर आहे. चंबाच्या साहिल्ल-देवाचा गुरू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. प्राणसंगली  या ग्रंथात दिलेल्या चर्पटी-नानक संवादानुसार ते रसविद्येतील एक प्रसिद्ध सिद्ध समजले जातात.

चर्पटीनाथांचा सर्वप्रथम विश्वसनीय संदर्भ तेराव्या शतकातील तिबेटी सिद्धांच्या सूचित मिळतो. महापंडित राहुल सांकृत्यायन संकलित सूची (११-१३ वे शतक), तत्त्वसार (१३-१४ वे शतक), वर्णरत्नाकर (१४ वे शतक), हठप्रदीपिका (१५ वे शतक) व शिवदिन-मठ-संग्रह या सिद्धांच्या सूचित त्यांचा समावेश आहे. गुरुग्रंथसाहिब (इ.स. १६०४) यात त्यांच्या विषयीच्या कथा आलेल्या आहेत. चर्पटीनाथांशी संबंधित काही ग्रंथ व स्फुट रचना उपलब्ध आहेत. यामध्ये चतुर्भूतभावाभिवासनक्रमनाम, आर्यावलोकितेश्वरस्य, चर्पटीरचितस्तोत्र आणि सर्वसिद्धिकरनाम  या ग्रंथांचा नामनिर्देश करता येईल. योगप्रवाहात काही पदे यांच्या नावावर समाविष्ट झालेली आहेत. कल्याणी मलिक यांनी चरपटजी की सबदीचे संकलन केलेले आहे. या व्यतिरिक्त पश्चिम पंजाबी व राजस्थानी सारख्या काही प्रादेशिक भाषांत त्यांची पदे उपलब्ध आहेत. वरील सर्व संदर्भांवरून ते तेराव्या शतकापूर्वी निश्चित होऊन गेल्याचे समजते.

चर्पटशतकम  नावाची एक संस्कृत रचनाही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याशी संबंधित काही हस्तलिखितांतून ते योगींच्या बाह्य वेशभूषेच्या विरुद्ध असल्याचे जाणवते. त्यात त्यांनी ‘आत्म्याचा जोगी’ होण्यास सांगितले आहे. तथापि नेपाळमधील काही स्तुतीपर स्तोत्र ते गूढ साधनेशी संबंधित असल्याचे दर्शवितात. त्यांचे नाव कापालिकांच्या बारा शिष्यांतही आढळते. सोळाव्या शतकात लामा तारानाथाने लिहिलेल्या कथेत चर्पटीनाथांनी व्याली सिद्धाकडून धातूंपासून पारा व सोने बनविण्याची कला अवगत केल्याचा उल्लेख आहे.

चर्पटीनाथांविषयीच्या कथा हिमाचल प्रदेशातील चंबा खोऱ्यात लोकप्रिय आहेत. तेथे महाकालीबरोबर चर्पटीनाथांना पूजण्याची प्रथा प्रचलित आहे. ते ‘आई’ पंथाशीही निगडीत होते. नाथ परंपरेत त्यांचे नाव गोरक्षनाथांचे शिष्य, तर तिबेटी परंपरेत मिनापाचे गुरू म्हणून घेतले जाते. रससिद्धांच्या सूचींमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने आढळते.

महाराष्ट्रात त्यांचे नाव नवनाथांमध्ये आदराने घेतले जाते. नवनाथभक्तिसारात त्यांना नव-नारायणांपैकी पिप्पलनारायणाचा अवतार मानले गेले आहे. त्यांच्याविषयीची कथाही या ग्रंथात दिलेली आहे. तिबेटमधील सिद्धांच्या चित्रांमध्ये त्यांची चित्रे आढळून येतात.

संकेतशब्द : चर्पटी, चंबा, चौऱ्याऐंशी सिद्ध, नाथ-योगी, रस-सिद्ध, नवनाथ.

संदर्भ :

  • Sharma, M. ‘Protest and counter-protest : The Nath Siddhas and Charpatnathʼ, Devotion and Dissent in Indian History, New Delhi, 2014.
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद,१९५०.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
  • सांकृत्यायन, राहुल, वज्रयान और चौरासी सिद्ध, पुरातत्त्व निबंधावली, मुंबई, १९५८.

                                                                                                                                                                                     समीक्षक : अभिजित दांडेकर