चौऱ्यांशी सिद्धांपैकी एक सिद्ध. नवनाथांपैकी एक नाथ-योगी व कानिफनाथांचे गुरू. जालंधरनाथांना जालंधरी, जळांधरी, जालंधरीपा, हाडिपा, ज्वालेंद्र, बालनाथ, बालगुंडाई, जान पीर या इतर नावांनीही ओळखले जाते.

जालंधरनाथांचे एक चित्र.

जालंधरनाथांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पंजाबातील जालंधर, सिंध प्रांतातील थट्टा, नगरभोग व बंगालशी त्यांचा संबंध दाखविला जातो. तारानाथ या यात्रेकरूच्या मते, जालंधरनाथांचा जन्म सिंध प्रांतात झाला होता. त्यानंतर खूप वर्षे ते कांगडा खोऱ्यातील ‘ज्वालामुखी’ या ठिकाणी राहिले. तिबेटी परंपरेनुसार त्यांचा जन्म नगरभोग देशात ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या जाती संबंधीही असाच वाद आहे. तिबेटी परंपरेनुसार ते ‘ब्राह्मण’ व ‘शुद्र’, बंगाली परंपरेनुसार ‘हाडी’ किंवा ‘हलखोर’ (भंगी) आणि योगीसंप्रदायाविष्कृती या ग्रंथानुसार ‘क्षत्रिय’ मानले जातात. तिबेटी परंपरेनुसार ते ‘देवपाल’ नामक राजाच्या समकालीन होते.

तिबेटी परंपरेत त्यांना मत्स्येंद्रनाथांचे गुरू, तर काही ठिकाणी मत्स्येंद्रनाथांचे गुरुबंधूही समजले जाते. जालंधरनाथांच्या विमुक्तमंजरी  ग्रंथाच्या भोटिया अनुवादाला प्रमाण मानून महापंडित राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३) त्यांना ‘आदिनाथ’ मानतात. बंगाल प्रांतात मिळणाऱ्या वृत्तांतानुसार मत्स्येंद्रनाथ व जालंधरनाथ हे आदिनाथांचे थेट शिष्य होत. विनयतोष भट्टाचार्यांनी त्यांच्या गुरू-शिष्यांची परंपरा सरह-नागार्जुन-शबरीपा-लुइपा-वज्रघंटा-कच्छपा-जालंधरीपा-कृष्णाचार्य-गुह्य-विजयपा-तैलोपा-नारोपा अशी सांगितली आहे. सांकृत्यायन यांच्या मते, जालंधरनाथ हे कूर्मपादाचे, तर मत्स्येंद्रनाथ व तंतिपा हे जालंधरनाथांचे शिष्य बनले. त्यांच्या इतर शिष्यांपैकी मैनावती, कृष्णपाद (कानिफनाथ) व गोविंदचंद्र (गोपीचंद) प्रमुख होते.

जालंधरनाथांचा प्रारंभिक ज्ञात ऐतिहासिक संदर्भ कान्हच्या चर्यापदामध्ये मिळतो. यामध्ये कान्हने त्यांना आपले गुरू मानले आहे. त्यानंतर त्यांचा उल्लेख चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सर्व प्रारंभिक सूचींमध्ये दिसतो. तेराव्या शतकातील मराठीतील महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र  या ग्रंथात त्यांच्याविषयीची कथा आलेली आहे. त्यामध्ये जालंधरनाथांचा उल्लेख गोविंदचंद्राचा उपदेशक व कान्हचा गुरू म्हणून आलेला आहे. स्कंदपुराणात नवनाथ वर्णनातही त्यांचा उल्लेख आहे. नवनाथभक्तिसारात त्यांना अंतरिक्षनारायणाचा अवतार म्हटले गेले आहे. या ग्रंथात त्यांच्याविषयी कथाही दिलेली आहे. गोरक्षसिद्धांतसंग्रह  या ग्रंथाच्या आरंभी जालंधरनाथांना वंदन केले आहे.

तंजूर हा एक तिबेटी ग्रंथसंग्रह असून त्यामध्ये बौद्ध धर्मातील सूत्रे व तंत्र यांवरील टीका अंतर्भूत आहेत. तंजूरमध्ये जालंधरनाथांनी लिहिलेल्या सात ग्रंथांचा उल्लेख आहे; त्यांपैकी दोन विमुक्तमंजरीगीत  व हूंकारचित्तबिंदुभावनाक्रम  हे मगही भाषेत आहेत. जालंधरनाथ हे हेवज्रतंत्राशीही संबंधित होते. ते डाकिनीद्वारे हेवज्रतंत्रात दीक्षित झाल्याचे सांगितले जाते. तंजूरातील बौद्धतंत्र ग्रंथांमध्ये त्यांच्याद्वारा लिखित एका टिप्पणी-ग्रंथाचेही नाव आलेले आहे. सरोरूहपादाचा प्रसिद्ध तंत्रग्रंथ हेवज्रसाधन  यावरील या टिप्पणी-ग्रंथाचे नाव शुद्धिवज्रप्रदीप आहे.

जालंधरनाथांविषयी बऱ्याच कथा प्रचलित आहेत. लीळाचरित्रातील लीळा क्र. ५०७ (उत्तरार्ध), २०२ (पूर्वार्ध) व ११४ (अज्ञात लीळा) मध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. लीळा क्र. ५०७ मध्ये गोविंदचंद्राचा पुतळा जालंधरांनी भस्मसात केल्याची कथा आहे. कथेमध्ये जालंधरनाथांचे गोविंदचंद्राने आपल्या नगरीत केलेले आदर-आतिथ्य, गोविंदचंद्राला दिलेला उपदेश, त्यांनंतर त्यांच्यात वाढलेला क्षोभ, जालंधरनाथांना जमिनीत गाढल्याचे उल्लेख, नंतर काही वर्षांनी कान्हने आपल्या गुरूची केलेली सुटका इत्यादी गोष्टींचे वर्णन आले आहे. अशा आशयाची कथा बंगालमध्येही प्रचलित आहे.

जालंधरनाथांची काही ‘थंका’ प्रकारातील चित्रे तिबेट हाउस संग्रहालयात तसेच, राहुल सांकृत्यायन संकलित पुरातत्त्व निबंधावलीत पाहावयास मिळतात. त्यांचे शिल्प आजही ओळखता आलेले नाही. चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये ते एक महत्त्वाचे सिद्ध असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ‘पन्हाळे काजी’ व गुजरातमधील ‘दभोई’ येथील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांमध्ये त्यांना शिल्पांकित केले गेले असावे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील ‘येवलेवाडी’ हे त्यांच्या समाधीचे ठिकाण सांगितले जाते. या व्यतिरिक्त राजस्थानातील जोधपूर भागात त्यांना मानणारा भक्तवर्ग मोठा आहे. जालोर जिल्ह्यातील जालंधरनाथांचे ‘सिरे मंदिर’ प्रसिद्ध आहे.

हठयोगातील ‘जालंधर’ व ‘उड्डियान’ बंधांशी त्यांचा संबंध जोडला जातो. तेराव्या शतकात दोन तिबेटी यात्रेकरूंनी सुप्रसिद्ध जालंधरपीठाची यात्रा केल्याचा उल्लेख आढळतो. जालंधरनाथांचा संबंध कापालिकांशी जोडला जातो. असे म्हटले जाते की, जालंधरनाथ व कानिफनाथांचा पंथ हा मत्स्येंद्र-गोरक्षांच्या परंपरेपेक्षा वेगळा होता व नंतर तो नाथसंप्रदायात अंतर्भूत झाला. जालंधरीपाद व कृष्णपाद यांच्या कापालिक संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा आधार बौद्ध असला, तरी तो संप्रदाय तांत्रिक बौद्ध व शैव-नाथांचा मध्यस्थ मानला जातो.

शब्दसंकेत : जालंधरनाथ, नाथ संप्रदाय, चौऱ्याऐंशी सिद्ध, नवनाथ, हाडिपा, गोविंदचंद्र.

संदर्भ :

  • उपाध्याय, नागेन्द्रनाथ, बौद्ध कापालिक साधना और साहित्य, वाराणसी, २००९.
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
  • सांकृत्यायन, राहुल, वज्रयान और चौरासी सिद्ध, पुरातत्त्व निबंधावली, मुंबई, १९५८.

                                                                                                                                                                                     समीक्षक : अभिजित दांडेकर