एक उभयचर प्राणी. बेडकाचा समावेश उभयचर वर्गाच्या ॲन्यूरा गणातील रॅनिडी कुलात करण्यात येतो. जगात त्यांच्या सु. ४,८०० जाती असून भारतामध्ये त्यांच्या सु. २७६ जाती दिसून येतात. भारतातील होप्लोबॅट्रॅकस टायगेरिनस ही बेडकाची जाती रॅनिडी कुलात समाविष्ट आहे. बेडकाची ही जाती पूर्वी राना टायग्रिना या नावाने ओळखली जात होती. अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व परिसंस्थांमध्ये बेडूक आढळतात. ते फक्त गोड्या पाण्यात राहतात.

बेडूक (होप्लोबॅट्रॅकस टायगेरिनस)

बेडकाच्या शरीराची लांबी १२–१८ सेंमी. असून त्याचा मध्यभाग सर्वांत रुंद सु. ५–७ सेंमी. असतो. शरीराचे डोके आणि धड असे दोन भाग असतात. डोके धडाला जुळलेले असून ते चपटे, रुंद, त्रिकोणाकृती आणि अग्रभागास जुळलेले असते. डोके व धड यांना जोडणारी मान नसते. डोक्याच्या निमुळत्या भागास मुस्कट म्हणतात. मुस्कटाच्या पुढील टोकावर दोन नासाछिद्रे असतात. डोक्याच्या ऊर्ध्व बाजूवर दोन बटबटीत डोळे व त्यामागे फिकट रंगाचा कानाचा पातळ पडदा असतो. नासाछिद्रे, डोळे व कानाचा पडदा एकाच रेषेत असतात. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी पांढरा ठिपका असतो. जबडा रुंद असून एका कानाच्या पडद्यापासून दुसऱ्या कानाच्या पडद्यापर्यंत असतो. वरील जबडा खालील जबड्याहून मोठा असून वरील जबड्याच्या कडेस असलेल्या खाचेमध्ये खालील जबडा घट्ट बसतो. दोन्ही जबडे बंद झाल्यानंतर मुखपोकळी जलाभेद्य बनते. त्यामुळे बेडूक पाण्याखाली असताना पाणी मुखपोकळीत शिरत नाही. धडास पायांच्या दोन जोड्या असतात. अग्रपाद आखूड असून त्यास चार बोटे असतात. पश्चपाद लांब असून त्यांची ‘Z’ अशा आकाराची घडी होते. पश्चपादाला पाच विकसित व एक अविकसित अशी सहा बोटे असतात. पाचही बोटे पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. मागील पायांच्या साहाय्याने बेडूक पाण्यात पोहतो. बेडूक जमिनीवर असताना पुढील पाय शरीरास आधार देतात. मागच्या लांब व ताकदवान पायांमुळे बेडूक आपल्या लांबीच्या वीस पट लांब उडी घेऊ शकतो. धडाच्या पश्च टोकावर अवस्कर छिद्र असून त्यातून मल, मूत्र आणि युग्मके बाहेर टाकली जातात.

बेडकाच्या त्वचेच्या ऊर्ध्व बाजूचा रंग हिरवा किंवा तपकिरी हिरवा असून त्यावर हिरवे, काळे तपकिरी पट्टे किंवा ठिपके असतात. मुस्कटापासून अवस्कर छिद्रापर्यंत शरीराच्या ऊर्ध्व बाजूस काळपट हिरवी पिवळी मध्यरेषा असते. पोटावरील त्वचेचा रंग पिवळट तांबूस असून त्यावर ठिपके नसतात. बेडूक जमिनीवर उकिडवा बसल्यास पाठीवर त्रिकास्थी उंचवटा दिसून येतो. त्वचा मृदू असून श्लेष्मल ग्रंथीमुळे कायम ओलसर व बुळबुळीत असते.

बेडकाच्या पचन संस्थेत मुखानंतर दोन्ही जबड्यांनी वेढलेली मुखगुहा असते. वरच्या जबड्याच्या बाह्य कडेवर हन्वस्थिदंत आणि तालूवर हलास्थिदंत असतात. जीभ खालच्या जबड्याच्या अग्रटोकास चिकटलेली असते. जिभेचा पृष्ठभाग बुळबुळीत असून त्याचे अग्रटोक दुभागलेले असते. कीटकासारखे भक्ष्य पकडताना जीभ तोंडातून उलटी बाहेर टाकली जाते. जिभेद्वारे तोंडात घेतलेला कीटक हलास्थिदंताखाली दाबला गेल्याने अर्धमेला होतो. कीटकाची हालचाल थांबल्यानंतर तो गिळला जातो. बेडूक प्रामुख्याने कीटकाहारी असला तरी काही वेळा त्याच्या जठरात गांडुळे, खेकडे, गोगलगायी व क्वचित सापाची पिले आढळली आहेत.

प्रौढ बेडकामध्ये फुप्फुस हे श्वसनाचे प्रमुख इंद्रिय असून पाण्याखाली असताना त्वचा श्वसनास मदत करते. पाण्याबाहेर असताना खालच्या जबड्याच्या तळाच्या हालचालीमुळे बेडूक मुखगुहेने श्वसन करतो. हृदय दोन अलिंदे व एक निलय अशा तीन प्रमुख आणि शिरानाल (सायनस व्हिनॉसस) व शंकू धमनी (ट्रंकस आर्टेरिओसस) या अतिरिक्त कप्प्यांचे असते. वृक्काद्वारे उत्सर्जन आणि परासरण घडून येते. मेंदूतील दृष्टिपालींची विशेष वाढ झालेली असते. बेडकामध्ये लैंगिक द्विरूपता असून प्रजननकाळात नर व मादी बाह्यलक्षणावरून ओळखता येतात. नर हा मादीपेक्षा लहान असून त्याचा रंग मादीपेक्षा गडद असतो. नराच्या दोन्ही अग्रपादांची आतील बोटे फुगीर असतात. त्यांना ‘मीलन फुगवटे’ म्हणतात. नराच्या खालच्या जबड्याच्या त्वचेमध्ये मागील बाजूस सैल त्वचेच्या पिशव्या असून त्यांना ‘स्वरकोश’ म्हणतात. मादीला मीलन फुगवटे आणि स्वरकोश नसतात. श्वसन संस्थेतील स्वरयंत्र नालामुळे नर मीलनकाळात आवाज काढतात. नरात असलेल्या स्वरकोशामुळे आवाजाचे अनुनादातून ध्वनिवर्धन होते.

बेडकाच्या जीवनचक्रात अंडे, डिंभ, बेडूकमासा आणि बेडूक अशा चार अवस्था असतात. या अवस्थांमध्ये त्यांच्या कल्ले, फुप्फुस, शेपूट, पाय, त्वचा इत्यादी अवयवांमध्ये रूपांतरण घडून येते. बेडकाची मादी मीलनकाळात अंडपुंजाच्या स्वरूपात अंडी पाण्यात सोडते. या अंडपुंजावर नर शुक्रपेशी सोडतो. अंड्यांचे बाह्यफलन पाण्यात होते. सु. १४ दिवसांनी डिंभ तयार होतो. हे डिंभ अंड्याच्या आवरणातून बाहेर पडतात आणि पाणवनस्पतींना चिकटून राहतात. डिंभाचे डोके व धड एकत्र असून धडाला माशाप्रमाणे शेपूट असते. डिंभाचे दात तीक्ष्ण असून ते पाणवनस्पती खातात. २१ दिवसांनी डिंभाचे रूपांतर बेडूकमाशामध्ये होते. बेडूकमाशाचे श्वसन प्रारंभी बाह्य कल्ल्याद्वारे, त्यानंतर आंतरकल्ल्याद्वारे व फुप्फुसाद्वारे होते. अन्ननलिका लांब व स्प्रिंगेप्रमाणे गुंडाळलेली असते. बेडूकमाशाला सु. ५ आठवड्यांनी अग्रपाद व त्यानंतर पश्चपाद येतात. चार पाय तयार झाल्यानंतर अन्न ग्रहण थांबते. शेपटीमध्ये साठलेल्या अन्नावर त्याचे पोषण होते आणि बेडूकमाशाचे रूपांतर भूचरात होते. अंडी घातल्यापासून प्रजननक्षम बेडूक तयार होण्यास सु. ११ आठवडे लागतात. बेडूक अनियततापी असून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात स्वत:चा बचाव करण्यासाठी ते चिखलात खोलवर गाडून घेतात; त्याला अनुक्रमे ग्रीष्मनिष्क्रियता आणि शीतनिष्क्रियता म्हणतात.

प्राणिविज्ञानात शरीररचना अभ्यासण्यासाठी बेडकाचे विच्छेदन केले जात असे. जैविक कीड नियंत्रणात बेडूक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्याचे विच्छेदन थांबविण्यात आले आहे. भारतात मागील काही वर्षांत बेडकाच्या नवीन नऊ जाती शोधून काढण्यात आल्या आहेत. त्यांपैकी एक नवीन जाती पश्चिम घाट परिसरात आढळून आली आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी मिक्रिझॅलिस गाडगीळी  ही बेडकाची नवीन जाती शोधून काढलेली आहे. मात्र, ती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

बेडकांच्या शरीराच्या लांबींत विविधता आढळून येते. पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरूनच्या वनांत आढळणारा गोलियाथ फ्रॉग आकाराने सर्वांत मोठा म्हणजे सु. ३० सेंमी. लांब असून पापुआ न्यू गिनीमध्ये आढळणारा ब्राझीलियन गोल्ड फ्रॉग आकाराने सर्वांत लहान म्हणजे सु. १․३ मिमी. लांब असतो.

मानवासाठी बेडूक अनेक दृष्ट्या उपयुक्त ठरला आहे. तो कीटकभक्षी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या आटोक्यात राहते. नव्या औषधांची चाचणी घेण्यासाठी वैद्यकशास्त्रात त्यांचा वापर करतात. मात्र प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा ऱ्हास, आम्लवर्षा इ. कारणांनी बेडकांच्या संख्येत घट झाल्याचे १९८० नंतर झालेल्या संशोधनांतून आढळून आले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे बेडकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. ज्या परिसरात बेडकांची संख्या अधिक असते ते पर्यावरण निरोगी असते, असे काही वैज्ञानिकांचे मत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा