बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी व बागांमध्ये शोभेसाठी लावतात.

बेहडा (टर्मिनॅलिया बेलिरिका): (१) पाने व फळांसह फांदी, (२) सुकलेली फळे, (३) फुलोरा व फळांसहित फांदी

बेहडा वृक्ष २०–३० मी. उंच वाढतो. साल राखाडी रंगाची असून त्यावर अनेक लहानलहान उभ्या भेगा असतात. कोवळी पालवी लालसर रंगाची असते. पाने साधी, एकाआड एक व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकाला एकत्रितपणे वाढलेली असतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात आणि त्यानंतर बेहडा फुलायला लागतो. फुले अगदी लहान व पिवळट असून त्यांना एक प्रकारचा उग्र वास असतो. अनाकर्षक फुलांच्या असंख्य तुऱ्यांनी वृक्ष मोहरल्यावर जमिनीवर वाळलेल्या फुलांचा सडा पडतो. बेहडा वृक्ष त्याच्या फळांसाठी प्रसिद्ध असून फळे उन्हाळ्यात लागतात. फळे (म्हणजे बेहडे) आठळीयुक्त, २-३ सेंमी. व्यासाची, लंबगोल आणि तपकिरी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. ही फळे पक्षी, खारी, माकडे आणि शेळ्यामेंढ्या तसेच हरिणे खातात. उन्हाळ्यात बेहड्याच्या झाडाखाली फळे पडलेली दिसून येतात.

बेहडा वृक्ष फार उपयोगी आहे. बेहडा आणि हिरडा या फळांची साल आणि आवळकाठी (म्हणजे वाळलेल्या आवळ्याचे तुकडे) यांपासून ‘त्रिफळा चूर्ण’ हे आयुर्वेदिक रेचक तयार केले जाते. या चूर्णाचे अनेक औषधी उपयोग असून पोटाच्या तक्रारींवर तसेच कफ आणि पित्त या विकारांवर ते गुणकारी असते. हलक्या प्रतीच्या घरबांधणीसाठी, फळ्या बनविण्यासाठी आणि बैलगाड्या व होड्या करण्यासाठी तसेच कागदाचा लगदा, कोळसा व जळाऊ लाकूड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड वापरले जाते. प्लायवुड तयार करण्यासाठी त्याचे लाकूड उत्तम समजले जाते. फळांमध्ये १७% टॅनीन असते. त्याचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, तसेच कापड उद्योगात केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा