भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे. आशिया खंडातील सर्व लोकांच्या दैनंदिन आहारात भात हा एक घटक असतो. भात ही संज्ञा भाताच्या वनस्पतीसाठी, तिच्या टरफलासहित दाण्यासाठी, तांदूळ तसेच शिजविलेल्या तांदळासाठी वापरली जाते. ही वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ओरिझा सटायव्हा आहे. गहू व मका या वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. ओ. सटायव्हा (एशियन राइस) याशिवाय ओ. ग्लॅबरिमा (आफ्रिकन राइस) ही भाताची आणखी एक जाती आहे. एशियन राइसच्या दोन उपजाती आहेत; ओ.सॅटायव्हा जॅपोनिका आणि ओ.सॅटायव्हा इंडिका. ओ.सॅटायव्हा जॅपोनिका या जातीचे तांदूळ आखूड आणि चिकट असतात, तर ओ.सॅटायव्हा इंडिका या जातीचे तांदूळ लांब असून चिकट नसतात. अलीकडे या भाताची आणखी एक उपजाती मानली जाते. तिचे शास्त्रीय नावहीओ.ट्रॉपिकल जावानिका असून तिचे दाणे फुगीर असतात. आफ्रिकन राइस ही जाती वन्य जातीच्या लागवडीकरणातून निर्माण झाली आहे. उष्ण प्रदेशातील दमट हवामानात हे पीक घेतले जाते.
भात हे बहुवर्षायू गवत असले, तरी ते वर्षायू असल्याप्रमाणे त्याची लागवड केली जाते. भाताला जमिनीत वाढणारे खोड अर्थात मूलक्षोड नसते. ही वनस्पती ०·६–१·९ मी. उंच वाढते. तळापासून तिला अनेक फुटवे निघतात. भाताची कोवळी रोपे हिरवी व तजेलदार दिसतात, तर वाढलेली पिके सोनेरी-पिवळी दिसतात. या वनस्पतीच्या खोडावर १२–१४ पेरे असतात. तिची पाने लोमश असून त्यांच्या कडांवर काटेरी केस असतात. फुलोरा (पुष्पविन्यास) खोडाच्या टोकाला येत असून तो लोंबी प्रकारचा असतो. फुलोऱ्यातील एकके म्हणजेच कणिशके सामान्यपणे एकेकटी किंवा २–७ च्या झुबक्यात असतात. कणिशकांची संख्या ६०–१५० असते. प्रत्येक कणिशकात दोन लहान व दोन मोठी पुष्पतुषे, एक बाह्यतुष, एक अंत:तुष व दोन परिदलके यांनी वेढलेले एक पूर्ण फूल येते. त्यात तीन पुंकेसर, एक अंडाशय, आखूड कुक्षिवृंत व दोन केसाळ कुक्षी असतात. परागण बहुधा वाऱ्याने होते. तृणफळ शुष्क, एकबीजी व न तडकणारे असते. फळ (दाणा/साळ) ६–१० मिमी. लांब असते. दाणा दोन्ही टोकांना निमुळता असून मध्यभागी फुगीर असतो. दाण्यावर सालीसारखे आवरण (तूस) असते. तुसाखाली कोंड्याचा स्तर, भ्रूणपोष आणि भ्रूण असतो. कोंड्याच्या स्तरापासून भाताच्या दाण्याचे म्हणजे तांदळाचे कठीण आवरण तयार होते. कोंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. भाताच्या दाण्याचा मधला भाग प्रामुख्याने भ्रूणपोषाने बनलेला असून स्टार्चयुक्त असतो. सामान्यपणे भाताचा हाच भाग खाल्ला जातो.
भाताच्या बीजात असलेल्या भ्रूणापासून नवीन रोप वाढीला लागते. बीजाला भरपूर पाणी आणि उब मिळाली की काही दिवसांनंतर त्याचे अंकुरण होते. पेरल्यानंतर पहिल्या ५–१० दिवसांत बीजातून फुटवे निघतात. काही वेळा या फुटव्यांची संख्या ३०पर्यंत असू शकते. प्रत्यक्षात मात्र ती बरीच कमी असते. जसजसे फुटवे उंच वाढतात, तसतशी त्यांना पाने येऊ लागतात.
भाताची रोपे लावल्यानंतर ६–१० आठवड्यांत फुटव्याच्या टोकाला कणिशके दिसू लागतात. खोडाला आच्छादून टाकणाऱ्या नळीसारख्या पानाच्या छदात कणिशके वाढतात. साधारणपणे चार आठवड्यांनंतर वाढलेल्या कणिशकांना फुले येतात. भाताच्या फुलात स्वपरागण होते, कारण एकाच फुलामध्ये नर व मादी अशी दोन्ही प्रजननाची अंगे असतात. परागण झाल्यानंतर ४–६ आठवड्यांत फुलांपासून भाताचे दाणे तयार होतात.
तूस आणि कोंड्याचा स्तर काढून टाकलेला भात बहुधा खाल्ला जातो. अशा भाताचा रंग पांढरा असतो. त्याला सडीचा भात किंवा पॉलिश्ड राइस म्हणतात. काही ठिकाणी भातावरील फक्त तुसे काढून टाकलेली असतात. अशा भाताच्या दाण्यांचा रंग किंचित लालसर असतो. त्याला असडीचा भात किंवा ब्राउन राइस म्हणतात. असडीचा भात पांढऱ्या भातापेक्षा पौष्टिक असतो, कारण त्यात अनेक पौष्टिक घटकांनी युक्त असा कोंडा शाबूत असतो. ज्या लोकांच्या आहारात ब्राउन राइस असतो ते सर्व जण थायामीन या ब१ जीवनसत्त्वाअभावी होणाऱ्या बेरीबेरी या विकारापासून मुक्त असतात. बरेच लोक पांढरा भात खातात, कारण तो लवकर शिजतो आणि जास्त चावावा लागत नाही.
भाताच्या १०० ग्रॅ. सेवनातून ८० ग्रॅ. कर्बोदके, ७ ग्रॅ. प्रथिने आणि यांशिवाय ब-समूह जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसयुक्त खनिजे मिळतात. भातापासून मोठ्या प्रमाणात कर्बोदके मिळत असल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते. जगात सर्वत्र पिकविले जाणारे भाताचे सर्व उत्पादन अन्न म्हणून वापरले जाते. त्याचा वापर अन्य कारणांसाठी केला जात नाही. भाताचा मुख्य उपयोग शिजवून खाण्यासाठी केला जातो. भारतात इडली, डोसा, शेवया, पापड्या इ. अन्नपदार्थ तयार करण्यासाठीही त्याचा वापर करतात. भातापासून स्टार्च तयार करतात आणि ते सूप, लहान मुलांचे अन्न, पीठ आणि आइसक्रीम इत्यादी बनविताना वापरतात. तांदळापासून चीनमध्ये बिअर, वाइन इ. आणि जपानमध्ये साके ही मद्ये बनवितात. भारतातही हिमाचल प्रदेशात तांदळापासून मद्य तयार करतात. भाताच्या तुसापासून खाद्य तेल मिळवितात, त्याला राईस ब्रान ऑईल म्हणतात.
फिलिपीन्समधील भातासंबंधी संशोधन करणाऱ्या इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत जगभरातून गोळा केलेले एक लाखापेक्षा जास्त भाताचे वाण आहेत. भारतात आंबेमोहर, बासमती, दुबराज, जय श्रीराम, पुसा, लक्षीचुरा, गोबिंदो भाग, एच्एम्टी, चंपा, कोलम, सोना मसुरी, अन्नपूर्णा, कर्जत, रत्नागिरी, पनवेल, फोंडाघाट, तुमसर इत्यादी भाताचे वाण लागवडीखाली आहेत. वैज्ञानिकांनी २००२ मध्ये तांदळाच्या पेशीतील जनुकक्रम शोधून काढला आहे. त्या माहितीचा उपयोग करून भाताच्या रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती शोधून काढण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करीत आहेत. २०१५ मध्ये उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जगभरात सु. ४७ कोटी टन भाताचे उत्पादन झाले होते. त्या उत्पादनात चीन, भारत, इंडोनेशिया, बांगला देश, व्हिएटनाम आणि थायलंड हे देश क्रमाने आघाडीवर होते.