कालमापनाची ही एक भूरासायनिक पद्धती असून ऑब्सिडियन काचेपासून बनविलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या कालमापनासाठी ती उपयोगी पडते. ऑब्सिडियन पद्धतीची सुरुवात १९६० मध्ये आयरविंग फ्रीडमन यांनी अमेरिकेत केली.

ज्वालाकाच.

ऑब्सिडियन ही एक ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण होणारी नैसर्गिक काच आहे. ती हिरवट किंवा काळपट अशा मोहक रंगाची असते. तिला उत्कृष्ट चकाकीही असते. सौंदर्य आणि कणखरपणा या गुणांमुळे प्रागैतिहासिक काळातील अश्मयुगीन लोकांनी त्या काचेचा वापर करून आपली हत्यारे बनविल्याचे आढळून येते. या काचेचा पापुद्रा/शकल/छिलका (Flake) काढल्यानंतर तिला अत्यंत धारदार कड प्राप्त होते. या गुणधर्मामुळेच धारदार आणि अणकुचीदार हत्यारे तयार करण्यासाठी प्रागैतिहासिक मानवाने यूरोप, पश्चिम आफ्रिका व अमेरिकेमध्ये ऑब्सिडियनचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. पश्चिम आशियात ईजिप्त आणि तुर्कस्तान येथे उत्कृष्ट ऑब्सिडियन काच सापडते. ती अत्यंत उच्च प्रतीची असल्याने तेथून पश्चिम आशियातील इतर देशांमध्ये प्रागैतिहासिक काळात निर्यात होत असे. गुजरातचा अपवाद सोडल्यास भारतात ऑब्सिडियन काच सापडत नाही. गुजरातमधील ऑब्सिडियन काच कनिष्ठ प्रतीची असल्याने तिचा वापर हत्यारे बनवण्यासाठी झाला नाही. प्राचीन काळातील मानव हा फेकण्याची अस्त्रे, सुर्‍या किंवा आकार देण्यासाठी दगडाचे काळजीपूर्वक शकला पाडून कापण्याची हत्यारे बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून या काचेचा वापर करत असे. याशिवाय प्राचीन कालखंडामध्ये या काचेपासून  बनविलेले अलंकारही उपलब्ध झालेले आहेत.

ऑब्सिडियन काचेमध्ये बाष्प शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. या काचेचे शकल काढल्यानंतर वरचे आवरण नव्याने तयार होते. तयार झालेल्या नवीन पृष्ठभागावर हळूहळू हवेतील बाष्पाचा थर (Hydration layer) ठरावीक प्रमाणात जमू लागतो. फक्त ऑब्सिडियनच्या काचेवरच असा जलथर जमतो, हा निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कारच म्हणायला पाहिजे. हा थर इतका सूक्ष्म असतो की, तो नुसत्या डोळ्यांना दिसू शकत नाही. मात्र या प्रक्रियेमुळे ऑब्सिडियनच्या कोर्‍या पृष्ठभागावर पाण्याचे अतिसूक्ष्म कण जमून ते ऑब्सिडियनच्या सर्व अंतर्भागात पसरतात आणि बाष्प जमा होते. दगडाचा शकल काढून हत्यार तयार केले गेले असेल तेव्हापासून ते आजपर्यंत त्यावर जमलेल्या थराची जाडी मोजून कालमापन केले जाते. डोळ्यांना पाहता येत नसले, तरी उच्च क्षमतेच्या सूक्ष्मदर्शकाखाली बाष्पाचे प्रमाण मोजता येते. किती काळात किती जाडीचा थर होतो हे एकदा निश्चित झाले, की थराच्या जाडीवरून ऑब्सिडियनच्या हत्याराचे वय काढता येते.

या कालमापनासाठी ऑब्सिडियनचा अत्यंत लहान चकतीचा (४ x २ x ०.५ मिमी.) तुकडा कापून घेतात. त्या तुकड्यावर जमा झालेल्या बाष्पमय थराची जाडी मायक्रॉन या परिमाणात (१ सेंमी.चा दशसहस्रांश) सूक्ष्ममापन यंत्राने मोजतात. किती मायक्रॉन जाडीचा थर जमा होण्यासाठी किती काळ लागतो याचे गणित किरणोत्सारी कार्बन किंवा इतर पद्धतींनुसार निश्चित केले गेले आहे. असे करताना जलथर जमा होण्याच्या प्रक्रियेत निरनिराळ्या ठिकाणी असलेले हवामानातील तापमान लक्षात घेतले आहे. थंड हवामानात बाष्पथर जमण्यास अधिक वेळ लागतो, तर उष्ण हवामानात तो अधिक गतीने जमत असतो.

ऑब्सिडियनचे र्‍हायोलिटिक आणि ट्रॅकायटिक असे दोन प्रकार आढळून येतात. यांतील ट्रॅकायटिक ऑब्सिडियनवर एक हजार वर्षांत जो बाष्पथर जमतो, त्याची जाडी र्‍हायोलिटिक ऑब्सिडियनवर जमणार्‍या तितक्याच काळातील बाष्पथराच्या जवळजवळ पावणेदोन पट असते.

ईजिप्तमधील पिरॅमिडमध्ये ममीबरोबर सापडलेल्या वस्तू ट्रॅकायटिक ऑब्सिडियनच्या असल्याने त्या कालमापनाला उपयोगी पडल्या नाहीत. याउलट मेक्सिकोमधील इ. स. पू. ७,२०० ते इ. स. पू. १,८२१ या काळातील कालमापन या पद्धतीने निश्चित करण्यात यश मिळाले. या पद्धतीला तुलनेने कमी खर्च येत असल्याने यूरोप आणि अमेरिकेत तिचा वापर केला जात आहे. तेथील उत्खननांत ऑब्सिडियनची हत्यारे मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने या पद्धतीने अचूक असे कालमापन करता येते; म्हणून तेथे ही पद्धती उपयुक्त आणि महत्त्वाची ठरली आहे. मेक्सिको आणि पश्चिम आशियाच्या प्रदेशांमध्येही या पद्धतीने कालमापन करून अनेक वस्तूंचे कालखंड निश्चित करण्यात आले आहेत. भारतात मात्र ऑब्सिडियन सापडत नसल्याने या पद्धतीचा आपल्याकडे काहीही उपयोग नाही.

संदर्भ :

  • Walker, M. J. C. Quaternary Dating Methods, England, 2005.
  • क्षीरसागर, अनुपमा, प्राचीन संस्कृतींचे कालमापन, पुणे, १९९८.

                                                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर