ब्लॉगच्या आरशापल्याड : साहित्य अकादमी नवी दिल्लीचा २०१६ चा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त मराठी कथासंग्रह. मनस्विनी लता रवींद्र या कथासंग्रहाच्या लेखिका आहेत. शब्द प्रकाशन, मुंबई कडून २०१४ मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण बारा कथांचा समावेश आहे. मळक्या पायांची मुलगी, हातात सुकाणू घेऊन भूर्रर, आणि तो नायक ठरला, मधुबाला आणि लोडशेडिंग, ओझ्याविना, काळ्याकुट्ट वेळी, माझ्या जन्माची गोष्ट, बाइक विना हीरो, उर्मी, सुसाईडवाला लव्ह, साडेएकतीस वर्षांचा संसार आणि शीर्षककथा ब्लॉगच्या आरशापल्याड ही आशयानुरूप या कथांची शीर्षके आहेत. प्रामुख्याने महानगरीय जाणिवा केंद्रस्थानी असणार्या या कथा स्त्री-पुरुष नातेसंबंधातील बदलते व गुंतागुंतीचे आयाम उलगडतात. जागतिकीकरणानंतर बदललेल्या काळाची अभिव्यक्ती करताना वेगाने बदलती जीवनशैली आणि युवा पिढीची आभासी विश्वात रममाण होण्याची वृत्ती यावर सटीक भाष्य करणार्या कथा या संग्रहात आहेत.
समाजातील सर्व बाबींचा मुक्तपणे स्वीकार करणारी स्त्री व पुरुष पात्रे हा या कथांचा विशेष. हिंसा, सुप्त इच्छ, सेक्शुअल फ्रस्ट्रेशन, संवेदनशून्यता, वैवाहिक जीवनातील नवी आव्हाने यांना सामोरे जातांना समाजातील दांभिकतेकडे निर्देश करतात. समकालीन जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणार्या, आधुनिक विषय केंद्रस्थानी असणार्या कथा माणूस म्हणून जगताना सामोरे जावे लागणार्या जटिल वास्तवाभोवती केंद्रित आहेत. सामाजिक माध्यमांच्या युगात मानवी नातेसंबंधातील विदीर्णता, एकटेपण, तुटलेपण आणि संवादहीनता त्यातून येणारी हतबलता आणि जीवनाची अपरिहार्यता यासोबतच पुढे जाण्याचा वेग आणि आवेग याला सामोरे जाणारा माणूस, जगण्याच्या व्यामिश्रतेकडे आणि स्व अस्तित्त्वाकडे पाहण्याचा तटस्थपणा हा या कथांचा विशेष आहे. जगताना पडणारे मानसिक, भावनिक व आर्थिक पेच मृत्यूकडे निर्देश करतात तेव्हा मृत्युचा अंतिम पर्याय म्हणून स्वीकार वा त्यावर मात करणारी जीवनेन्छा लक्षात घेत त्याची निवड करणारी पात्रे या कथांमधून चित्रीत झाली आहेत.
लिंगभावाचे राजकारण उजागर करतांना स्त्री संदर्भाने होणारे पुरुषी राजकारण, पुरुषांचा लैंगिक राजकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, गर्भपाताचे वास्तव शोषण याची खुलेपणाने चर्चा या कथांत केली आहे. समकालीन स्त्रीच्या आयुष्याचे बहुस्तरीय वास्तव नोंदवितांना तिच्या भावनिक, मानसिक, शारीरिक व आर्थिक आंदोलनांबाबत भाष्य यात केले आहे. राजकारणातील स्त्रिया, आंतरजातीय विवाह, स्वातंत्र्याचा संकोच व अभिलाषा, घटस्फोट आणि मुलांचे प्रश्न यातून स्त्रीच्या समाजीवनातील आणि कुटुंबातील स्थानाची धीट व स्पष्ट मीमांसा यात आहे. जीवनाच्या अनुभवांना खुलेपणाने सामोरे जाणे, येणार्या अनुभवांचा अन्वयार्थ लावणे, भावनिक गुंता सोडवत आयुष्यातील साचलेपण प्रवाही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हा स्त्रीपात्रांचा विशेष स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत तिचे उत्तर आधुनिक काळातील जगणे मुखर करणारे आहे. तरीही हवे असणार्या जीवनाची आस आणि वास्तवातील जीवन यातील रुंदावणारी दरी आणि अथक प्रयत्नांनंतरही त्याच त्या वर्तुळात तिचे फिरत राहणे सूचक आहे.
या कथांतील आजच्या काळाच्या भाषेत व्यक्त होण्याचे वेगळेपण लक्षणीय आहे. आधुनिक, इंग्रजी-मराठी व प्रसंगी इतर भाषीय ही शब्द असणारी मिश्र, सामाजिक माध्यमावर वापरली जाणारी पण तरीही कथेतील पात्रांच्या मानसिकतेचा वेध घेणारी नवी, प्रवाही भाषा या कथांमध्ये लक्षणीय आहे. साहित्य अकादमी पुरस्कारा समवेतच महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने या संग्रहाचा सन्मान झाला आहे.
संदर्भ : मनस्विनी लता रवींद्र, ब्लॉगच्या आरशापल्याड, शब्द प्रकाशन, मुंबई, २०१४.