तांबूस-पिंगट रंगाची पिसे असलेला व प्रथमदर्शनी कावळ्यासारखा दिसणारा एक पक्षी. भारद्वाजाचा समावेश पक्षिवर्गाच्या क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस आहे. कोकिळ, पावशा व चातक या पक्ष्यांचा समावेशही याच कुलात होतो. भारद्वाज पक्षी भारत, श्रीलंका तसेच चीन ते इंडोनेशियापर्यंत सर्वत्र आढळतो. तो दाट झुडपे असलेला प्रदेश, शेते, मनुष्यवस्तीला लागून असलेली उद्याने, झाडी इ. ठिकाणी राहतो. उडण्याच्या बाबतीत तो दुबळा असतो. बऱ्याचदा झाडाझुडपांमध्ये तो धडपडत वर चढताना दिसतो.

भारद्वाजाच्या शरीराची लांबी सु. ४८ सेंमी. असते. पिसांचा रंग तांबूस-पिंगट असून त्यात तपकिरी रंगाची झाक असते. शेपूट लांब, टोकाला रुंद व काळ्या रंगाची असते. चोच काळी व किंचित बाकदार असते. डोळे लालभडक रंगाचे आणि पाय काळे असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.
भारद्वाज एकेकटा किंवा जोडीने वावरतो. कीटक व त्यांच्या अळ्या, सरडे, उंदराची पिले व साप हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे. याखेरीज तो पक्ष्यांची अंडी व पिले, फळे, बिया इ. खातो. तो बऱ्याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये बसलेला दिसतो. सकाळी आणि संध्याकाळी तो सक्रिय असतो. तो जमिनीवर हळूहळू एकेक पाऊल टाकीत किंवा झाडांच्या फांद्यांवर उड्या मारीत भक्ष्य शोधताना दिसतो. तो ‘कूप, कूप कूप’ असा घुमणारा विशिष्ट आवाज काढतो. पुष्कळदा दोन नर-भारद्वाज जवळ असले आणि एकाने आवाज काढला की दुसराही आवाज काढून प्रत्युत्तर देतो. त्यांचे हे आवाज काढणे बराच वेळ चालते.
भारद्वाजाचा प्रजननकाळ जून–सप्टेंबर असतो. या काळात नर व मादी एकत्र येऊन घरटे तयार करतात. घरटे तयार करण्याच्या कामी नर पुढाकार घेतो. घरटे खोल कपासारखे व मोठे असून ते काटक्या, गवत व पाने यांपासून बनविलेले असते. मादी एका खेपेला ३–५ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंडी १५-१६ दिवसांत उबतात. यात नर व मादी दोघेही सहभागी असतात. पिले १८–२२ दिवसांनंतर उडण्यास सक्षम होतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
छान माहिती आहे. नाँलेज मिळाले.
Chan mahiti milali
उत्तम माहिती