कीटक वर्गाच्या कोलिऑप्टेरा गणात (ढालपंखी गणात) भुंगेऱ्यांचा समावेश करण्यात येतो. त्यांना मुद्गल असेही म्हणतात. प्राणिसृष्टीमध्ये कीटक वर्ग हा संख्येने सर्वांत मोठा असून त्यात सु. १२ लाख जातींची नोंद आहे. यात नवीन जातींची भर पडत आहे. सध्या ही संख्या सर्व जातींच्या प्राण्यांच्या सु. एकतृतीयांश एवढी आहे. कीटक वर्गात कोलिऑप्टेरा गण सर्वांत मोठा असून त्यात सु. पाच लाख जातींचा समावेश होतो. भुंगेऱ्यांची एकूण १३५ कुले आहेत. ही कुले आकौस्टेमटा, अडिफंगा व पॉलिफॅगा या तीन उपगणांत विभागली आहेत.
भुंगेरे सर्वत्र आढळतात. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोक्यावर शृंगिकांची एक जोडी, संयुक्त नेत्रांची एक जोडी आणि दोन-तीन साधे नेत्र असतात. डोक्याच्या खाली मुखांगे असतात. मुखांगातील जंभ अथवा जबडे मजबूत व तीक्ष्ण असून अन्न कुरतडून व चावून खाण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. वक्षाचे तीन खंड असून त्यावर पायांच्या तीन जोड्या आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. पायांचा उपयोग चालणे, धावणे, उड्या मारणे, जमीन उकरणे, भक्ष्य पकडणे, पोहणे इत्यादींसाठी केला जातो. कोलिऑप्टेरा गणाच्या कीटकांमध्ये पंखांच्या पुढच्या जोडीत कठीण कायटीन असते. पंखांच्या या जोडीला इलिट्रा म्हणतात. या पंखांचा आकार ढालीसारखा दिसतो. त्याखाली पंखांची मागची जोडी झाकलेली असते. पुढच्या जोडीमुळे उदरखंडाच्या वरच्या बाजूचे तसेच पंखांच्या मागच्या जोडीचे रक्षण होते. म्हणून या गणाला ‘ढालपंखी गण’ असे नाव पडले आहे. पंखांची मागची जोडी पापुद्र्याप्रमाणे अर्धपारदर्शक व मिटून घेता येणारी असून उड्डाण करण्यास उपयोगी असते. उदरखंडाची खालील बाजूही कठीण असते. या कठीण आवरणामुळे भुंगेरे सहसा चिरडले जात नाहीत आणि ते सुरक्षित राहतात.
भुंगेरे काळे, तपकिरी, उदी, पांढरे, निळे, हिरवे, जांभळे, गुलाबी व लाल अशा विविध रंगांचे असतात. त्यांचे जीवनचक्र परिपूर्ण असून अंडे, अळी, कोश आणि प्रौढ कीटक अशा त्यांच्या वाढीच्या अवस्था असतात. अळीच्या अवस्थेत चार-पाच वेळा कात टाकली जाते. अधिवास, अन्न इ. घटकांमुळे ज्याला अनुकूलन म्हणता येईल असे बदल भुंगेऱ्यात घडून आले आहेत. स्वसंरक्षण, ध्वनिनिर्मिती व प्रकाशनिर्मिती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. काही भुंगेरे उपद्रवी, तर काही उपयुक्त असतात. सर्व भुंगेऱ्यांच्या अळ्या खादाड असून कुजणारे पदार्थ खातात. त्यामुळे उकिरड्यातील अन्नपदार्थांचे विघटन कमी वेळात होते.
भुंगेऱ्यांचे प्रकार : भुंगेऱ्यांचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
व्याघ्र भुंगेरा : हे नदीच्या किनाऱ्यालगत पाणथळ जागी आढळतात. डोक्यावर दोन आणि पुढच्या पंखांच्या जोडीवर सहा पिवळे ठिपके असतात.
भुई भुंगेरा : हे वृक्षाच्या बुंध्यावर, जमिनीवर, दगडाखाली किंवा लाकडाच्या ओंडक्याखाली आढळतात. त्यांच्या वक्षाच्या पहिल्या खंडावर दोन व पुढच्या पंखांवर चार पांढरे ठिपके असतात. उदराच्या मागील वर्तुळाकार भागात दुर्गंध ग्रंथी असतात. त्यांच्या स्रावाने त्वचेची जळजळ होते. म्हणून ते उपद्रवी ठरतात.
कवडी भुंगेरा : हे वाहत्या किंवा स्थिर पाण्यात, काही गरम पाण्याच्या झऱ्यात, तर काही मचूळ पाण्यात आढळतात. त्यांचे शरीर कवडीसारखे लंबगोल आणि गुळगुळीत असते.
निवळी भुंगेरा : हे गोड्या व स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावर आढळतात व समूहाने राहतात. ते सतत गिरक्या घेतात आणि चाहूल लागताच तळाशी जातात.
गेंडा भुंगेरा : हे नारळ, पोफळी, अननस व खजूर यांच्या बागांमध्ये आढळतात. त्यांची लांबी ३०-५७ मिमी. असून डोक्यावरील आवरणावर गेंड्यासारखे शिंग असते. ते झाडांची नासधूस करतात. त्यामुळे ते उपद्रवी ठरतात.
शेण भुंगेरा : हे सस्तन प्राण्यांच्या शेणात राहतात आणि वाढतात. नराच्या डोक्यावर शिंग असते, तर मादीच्या डोक्यावर शिंग नसते. नर आणि मादी एकमेकांच्या मदतीने टेनिसच्या चेंडूएवढा शेणाचा गोळा ढकलतात व जमिनीत पुरून ठेवतात. मादी त्यावर अंडी घालते. अळ्या तयार झाल्यावर त्यांना शेणाचे अन्न लगेच मिळते. ते शेणाचे विघटन करून चराऊ जमिनीची सुपीकता वाढवितात. म्हणून ते उपयुक्त आहेत.
पादरा भुंगेरा अथवा पेंगूळ : हे कायम दगडाखाली आणि टाकाऊ व कुजलेल्या पदार्थांच्या ढिगात आढळतात. रंग काळा असून पुढील पंखांवर सूक्ष्म खड्डे असतात. हातात घेतल्यास घाण वास असलेला स्राव सोडतात.
पट्टेदार भुंगेरा : हे भारतात सर्वत्र आढळतात. भेंडी व बेशरमी या वनस्पतींवर राहतात. रंग काळा असून पुढच्या पंखांवर एकाआड एक असे पिवळे-काळे पट्टे असतात. ते भेंडीच्या फुलातील परागकण खातात. म्हणून ते उपद्रवी मानले जातात.
दीर्घशृंगी भुंगेरा : हे आंबा व शेवगा या झाडांवर आढळतात. यांचा रंग फिकट राखाडी असून त्यात पिवळी झाक असते. पुढच्या पंखांवर गुलाबी ठिपके असतात. त्यांच्या शृंगिका शरीराच्या लांबीपेक्षाही लांब असतात. अळ्या खोड पोखरतात. म्हणून त्या उपद्रवी आहेत.
लाल भुंगेरा : हे नारळ, पोफळीच्या बागा, पिठगिरणी, धान्याची कोठारे व धान्याच्या डब्यात नेहमी आढळतात. रंग लाल तपकिरी व शरीरावर सहा ठिपके असून मुस्कट सोंडेसारखे व टोकदार असते. लाल भुंगेऱ्यांना सोंडे किंवा टोके असेही म्हणतात. काही टोके दूरध्वनी व दूरदर्शन संचाच्या तारांवरील शिशाच्या आवरणाला भोके पाडतात. त्यांच्या अळ्या पक्ष्यांना खाद्य म्हणून देतात, कारण त्यात प्रथिने असतात. तसेच मासे पकडण्याकरिता गळाला आमिष म्हणून त्या अळ्या लावतात.
काजवा भुंगेरा : प्रौढ काजवे पावसाळ्यात झाडांवर आढळतात. अळ्या ओलसर जमिनीवर आढळतात. मादी पंखहीन असते. नराला पंख असून वक्षाच्या पहिल्या खंडावरील आवरण आणि पुढच्या पंखांची जोडी यांचा रंग पिवळा असतो. नर आणि मादी यांच्या उदराच्या खालच्या बाजूला शेवटच्या खंडात प्रकाशपेशी असतात.
यांशिवाय भुंगेऱ्यांच्या इतर काही जातींपैंकी चित्रांग भुंगेरा, सोसा भुंगेरा, पोलादी भुंगेरा, अश्म भुंगेरा, चर्म भुंगेरा, भोपळा भुंगेरा, जलप्रेमी भुंगेरा, केसाळ भुंगेरा, गोल ओठांचा भुंगेरा, मिठास भुंगेरा, रत्न भुंगेरा, पुरळजनिता भुंगेरा, कासवी भुंगेरा, कोळी भुंगेरा, गालिचा भुंगेरा, तैल भुंगेरा इत्यादी जाती आहेत.