थिरकवा, अहमदजान : (१८९१ ? – ११ जानेवारी १९७६). प्रख्यात हिंदुस्थानी तबलावादक. त्यांचे जन्मवर्ष १८८४ किंवा १८८६ असेही दर्शविले जाते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. ते तबल्यावर ‘थिरक–थिरक’ असे बोल अत्यंत द्रुतलयीत व स्वच्छ रीतीने वाजवत; म्हणून उस्ताद कालेखाँ (मुनीरखाँ यांचे वडील) यांनी त्यांना ‘थिरकवा’ (तिरखवा) हे नाव दिले. अहमदजान यांचे घराणे कलाकारांचे होते. त्यांनी संगीतातील सुरुवातीचे धडे त्यांचे वडील व प्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद हुसेनबक्ष, उस्ताद शेरखाँ व फैयाजखाँ यांच्याकडे घेतले. पुढे उस्ताद मुनीरखाँच्या हाताखाली सु. ३० वर्षे त्यांनी तबलावादनाचे विविध बारकावे व शैली आत्मसात केल्या.

१९२८ च्या सुमारास अहमदजान यांना भास्करबुवा बखले यांनी महाराष्ट्रात आणले. ते साधारणत: दहा वर्षे ‘गंधर्व नाटक मंडळी’ त होते. बालगंधर्वांची नाट्यपदे थिरकवांच्या भावानुकूल व सुसंवादी साथीने खुलत असत. बालगंधर्व यांनी त्यांना महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवून दिली. अहमदजान काही काळ रामपूरचे नबाब रझा अली खान बहादूर यांच्या दरबारी होते (१९३६). लखनौच्या भातखंडे संगीत विद्यालयात ते तबलावादनाचे प्राध्यापक होते. १९७१ पासून त्यांनी ‘नॅशनल सेंटर ऑफ पर्‌फॉर्मिंग आर्ट्‌स’, मुंबई येथे तबल्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

थिरकवाँ आपल्या भरदार, विविध लयकारीच्या तबलावादनात दिल्ली, पूरब, अजराडा, फरूखाबाद या विविध तबला घराण्यांच्या वादनशैलींचा समावेश करीत असत. त्यांच्या वादनाला परंपरेची शिस्त होती, क्रम होता. वादनात गोडवा आणि सहजता होती. बाया आणि दाहिना याचे नेमके वजन साधत असत. त्यांच्या वादनात गूँज कायम राही. हात जलद चालविण्याबरोबरच स्वच्छ व स्पष्ट बोल निघण्यावर त्यांचा भर असे. गाण्याला जसा क्रम असतो, तसाच क्रम त्यांच्या वादनात जाणवत असे. पेशकार, रंग, कायदे, रेले, गत, तुकडे मग लग्गा अशा क्रमसिद्ध रचनेतून ते वादनाची आकृती रचत असत. ते क्वचित प्रसंगी एखादी ठुमरी किंवा चीज गातही असत. त्यांनी तबल्या-डग्ग्याच्या एकसंघ वादनामुळे तबल्याला मैफलीत गायकाप्रमाणे मध्यवर्ती स्थान प्राप्त करून दिले. अनेक श्रेष्ठ व नामवंत गायक-वादक, नर्तकांना त्यांनी साथसंगत केली. स्वतंत्र तबलावादनाच्या रंगतदार मैफली करण्याची परंपरा थिरकवांपासून सुरू झाली व त्यायोगे त्यांनी तबला या वाद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

त्यांना संगीत नाटक अकादमीचे हिंदुस्थानी वादनातील पारितोषिक (१९५४), राष्ट्रपती पारितोषिक, पद्मभूषण (१९७०) इ. मानसन्मान लाभले. एच.एम.व्ही. फिल्म डिव्हिजन, आकाशवाणी, दूरदर्शन यांवरील त्यांच्या कार्यक्रमाच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. त्यांच्या तबलावादनावरील लघुपटही प्रदर्शित झाला आहे.

अहमदजान यांचे दोन पुत्र नबीजान, महमूद जान हे ही तबलावादन करत. अहमदजान यांच्या शिष्यपरिवारात जगन्नाथबुवा पुरोहित, लालजी गोखले, निखिल घोष, नारायण जोशी, भाई गायतोंडे प्रेमवल्लभ इ. कलाकारांचा समावेश आहे.

लखनौ येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • पटवर्धन, बापू, तबल्याचा अंतर्नाद, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २०१७.

समीक्षक : श्रीकांत डिग्रजकर