घोष, ज्ञानप्रकाश : (८ मे १९०९–१८ फेब्रुवारी १९९७). प्रसिद्ध भारतीय तबलावादक व हार्मोनियमवादक. त्यांचा जन्म संगीताचा समृद्ध वारसा असलेल्या घराण्यात कोलकाता येथे झाला. त्यांचे आजोबा द्वारकानाथ घोष यांनी भारतीय संगीताला उपयुक्त अशा हार्मोनियमची (संवादिनी) निर्मिती केली होती (१८७५) आणि त्याचे व्यावसायिक स्तरावर उत्पादनही सुरू केले होते. त्याला ‘द्वारकीन हार्मोनियम’ असे म्हणतात. ज्ञानप्रकाश यांनी कोलकाता विद्यापीठातून पाली भाषेची पदवी घेतली. तरुणपणी त्यांना विविध क्रीडा प्रकाराची आवड आणि गती होती. त्यांना फुटबॉल, हॉकी, पोलो, बिल्यर्ड्स या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त होते; परंतु फुटबॉल खेळताना डोळ्याला झालेल्या इजेमुळे त्यांना खेळ सोडावा लागला आणि ते संगीताकडे वळले.

ज्ञानप्रकाश यांनी प्रसिद्ध शास्त्रीय व अर्धशास्त्रीय गायक गिरिजा शंकर चक्रवर्ती, मोहम्मद सगीर खाँ आणि बीनकार व गायक मोहम्मद दबीर खाँ यांच्याकडून कंठसंगीताचे शिक्षण घेतले, तर तबलावादनाचे धडे त्यांनी फर्रुखाबाद घराण्याचे उस्ताद मसीत खाँ आणि पंजाब घराण्याचे उस्ताद फिरोज खाँ यांच्याकडून घेतले. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी आकाशवाणीमध्ये संगीत निर्माता म्हणून काम केले. संगीताच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ते स्वतः उत्तम हार्मोनियमवादक तर होतेच पण विविध चर्चा, अभ्यास सत्रे, मुलाखती इत्यादींद्वारेही त्यांनी मोठे काम केले आहे. ‘कोलकात्याचा सांगीतिक आवाज’ म्हणून त्यांना ओळखले जात असे. ‘रामायण गीति’ हा त्यांनी निर्मिलेला भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा मिलापाचा प्रकार लोकप्रिय झाला होता. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीशी त्यांचा घनिष्ट संबंध होता.

ज्ञानप्रकाश यांनी ‘सौरभ म्युझिक अकादमी’ची त्यांनी स्थापना केली. पराया धन (१९४३), मुजरिम (१९४४) इत्यादी हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. अनेक बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. त्यांपैकी बसंतबहार या बंगाली चित्रपटासाठी त्यांनी एक वेगळेपणा म्हणून त्यातील गाण्यासाठी शास्त्रीय संगीत दिले होते आणि ते तत्कालीन श्रोत्यांना चांगलेच भावले. त्यातील माणिक वर्मा, ए. टी. कानन आणि प्रसून बन्दोपाध्याय या गायकांनी गायलेली नवेली कली, नबी के दरबार, बाडे-बाडे बाँधो झूलना ही गाणी गाजली. द ड्रम्स ऑफ इंडिया ही त्यांची ध्वनिफीत खूप लोकप्रिय झाली. तसेच त्यांनी तबला, पखावज, कथ्थक आणि तराना यांच्या एकत्रित समायोजनाने बनविलेला चतुरंग हा एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरला. त्यांनी अनेक हिंदी भजनांची रचनाही केली. व्ही. जी. जोग आणि घोष यांची व्हायोलीन–हार्मोनियम वादनाची, तसेच त्यांची व्ही. बलसारा यांच्याबरोबरची पियानो–हार्मोनियम वादनाची जुगलबंदीही खूप गाजली. १९४०-५० च्या काळात ते तबलावादक म्हणून प्रसिद्ध होते. रविशंकर, अली अकबर खाँ यांच्याबरोबर त्यांनी अनेक ध्वनिफीतींसाठी तबला साथ केली आहे. संगीतज्ञ, गायक, हार्मोनियमवादक, तबलावादक, निर्माता इ. विविध प्रकारची कामगिरी करणाऱ्या ज्ञानप्रकाश यांना १९८४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविले आहे.

त्यांचे तबलावादक शिष्य निखील घोष, श्यामल बोस, अनिंदो चटर्जी, अभिजीत बॅनर्जी, संजय मुखर्जी  आणि त्यांचा पुत्र मल्हार घोष. तसेच त्यांचे गायक शिष्य प्रसून बॅनर्जी, मीरा बॅनर्जी, ए. कानन, मालविका कानन, अजय चक्रवर्ती, अरुण भादुरी इ. नी ज्ञानप्रकाश यांचा गानवारसा पुढे चालविला आहे. त्यांचे कोलकाता येथे निधन झाले.

संदर्भ :

  • राग, पंकज, धुनों की यात्रा, नवी दिल्ली, २००७.

मराठी भाषांतर : सुधीर पोटे