वेदोत्तरकालीन हिंदु परंपरांमध्ये भाषाविचार : इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या शतकात पाणिनी या वैयाकरणाने त्याच्या अष्टाध्यायी नावाच्या व्याकरणात केलेली संस्कृत भाषेची बांधणी आजवर प्रमाण मानली गेली आहे. दार्शनिक विचार जरी पाणिनीने स्पष्टपणे मांडलेले नसले तरी त्याच्या काही कल्पनांचा आज अंदाज केला जाऊ शकतो. त्याने वर्णन केलेल्या भाषेला काळाचे बंधन नाही, तर ती सर्वसमावेशक आहे. पतंजलीच्या शब्दात सांगायचे तर भाषेचा प्रयोग-विषय किंवा भाषेच्या प्रयोगाचे क्षेत्र अफाट आहे. कात्यायन (इसवी सनपूर्व २५०) आणि पतंजली (इसवी सनपूर्व १५०) या वैयाकरणांच्या ग्रंथांत भाषेविषयीच्या अनेक कल्पना अधिक सुस्पष्ट होतात. हजारो शाखा असलेल्या वेदांचा या क्षेत्रात समावेश आहे. तसेच पृथ्वीची सात द्वीपे आहेत. या सर्व क्षेत्रात जाऊन तपासून पाहिल्याखेरीज अमुक एक शब्द वापरला जात नाही असे सांगणे हे मोठे धाडस ठरेल असे पतंजली सांगतो. पाणिनीच्या सर्वसाधारण सूत्रांनी सांगितलेले नियम या सर्व भाषाप्रयोगाच्या क्षेत्राला लागू पडतात. काही नियम फक्त वैदिक प्रयोगांना लागू पडतात, तर काही फक्त समकालीन प्रयोगाच्या भाषेला लागू पडतात. समकालीन भाषेत देखील प्राचाम् व उदीचाम् असे शब्द वापरून त्याने पूर्वेकडच्या व उत्तरेकडच्या प्रदेशातल्या प्रयोगांची दखल घेतली आहे. ४००० सूत्रांमध्ये इतक्या विशाल भाषिक परिसराची दखल घेणाऱ्या पाणिनीने प्राकृत भाषांची दखल घेतलेली नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. अपशब्द, अपभ्रंश अशी शेलकी विशेषणे पतंजलीने चुकीच्या संस्कृत प्रयोगांना आणि प्राकृत प्रयोगांना लावली आहेत. शुद्ध संस्कृत नसलेले असे भाषिक प्रयोग अज्ञानामुळे आणि अशक्तीमुळे होतात असे मत या वैयाकरणांनी मांडले आहे. प्राकृत वापरणाऱ्या जैन-बौद्धांचा साक्षात् उल्लेख न करता ते कसे अज्ञानी आहेत व त्यांचे प्राकृत भाषेचे प्रयोग कसे अशुद्ध आहेत हे सुचविले आहे. वेदांइतकीच संस्कृत भाषा पवित्र आहे असे म्हटले जाते. व्याकरणाचे ज्ञान करून घेऊन ज्ञानपूर्वक केलेला भाषेचा प्रयोग हा पुण्यजनक असतो असे हे वैयाकरण सांगतात (शास्त्रपूर्वके प्रयोगेऽभ्युदयस्तत्तुल्यं वेदशब्देन). कात्यायन आणि पतंजली यांच्या मते अर्थाचा बोध करून देण्याचे काम शुद्ध संस्कृत प्रयोग आणि अशुद्ध प्राकृत प्रयोग दोन्ही करू शकतात. परंतु पुण्यजनकता ही फक्त शुद्ध संस्कृत प्रयोगांनाच आहे. बौद्ध-जैन परंपरांवर अशी ही टीका अप्रत्यक्षपणे केली आहे.
या संदर्भात इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात झालेल्या भर्तृहरी या वैयाकरणाचा देखील उल्लेख करायला हवा. त्याच्या वाक्यपदीय या ग्रंथांत त्याने पतंजलीच्या महाभाष्यातील कल्पना बऱ्याच पुढे नेल्या आहेत आणि व्याकरणशास्त्राला एक दार्शनिक स्थान प्राप्त करून दिले आहे. व्याकरणातल्या भाषाशास्त्रीय विषयांबरोबरच भाषेविषयीच्या दार्शनिक कल्पना भर्तृहरीने सविस्तर मांडल्या आहेत. जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण हे नुसते उपनिषदांतील ब्रह्म नसून ते शब्दब्रह्म किंवा शब्दतत्त्व आहे. या शब्दतत्त्वाचा परिणाम किंवा विवर्त होऊन जगाची उत्पत्ती झाली आहे असे भर्तृहरी सांगतो. हे सांगताना हे शब्दतत्त्व संस्कृत भाषा आणि वेदग्रंथ यांच्याशी निगडित आहे आणि प्राकृत-अपभ्रंश भाषांना हे दैवी भाषेचे स्थान नाही हे प्रतिपादन त्याने केले आहे. अशा प्रकारे जैन-बौद्ध परंपरांविरोधी मते कात्यायन, पतंजली आणि भर्तृहरी यांनी त्यांचा प्रत्यक्ष उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे मांडली आहेत.
संदर्भ :
- Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.
Key Words: संस्कृत वैयाकरण, पाणिनी, पतंजली, भर्तृहरी, वैयाकरणांचे संस्कृत भाषेविषयक मत.