एलपीजी म्हणजेच द्रवीकृत पेट्रोलियम वायू होय. तेल विहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलाचे शुध्दिकरण केले असता एलपीजी मिळतो.
रासायनिक घटक : एलपीजी हा वायू प्रामुख्याने प्रोपेन (C3H8) आणि ब्युटेन (C4H10) या दोन हायड्रोकार्बन वायूंचे मिश्रण असून त्यात त्यांचे प्रमाण ३०: ७० असे असते. शिवाय, त्यात अल्प प्रमाणात प्रोपिलीन (C3H6) व ब्युटिलिन (C4H8) असतात. औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीमध्ये नाममात्र ईथेन (C2H6) व एथिलीन (C2H4) हे हलके तर पेंटेन (C5H12) सारखे जड हायड्रोकार्बन समाविष्ट असतात.
प्राप्ती : एलपीजी नैसर्गिक वायूपासून किंवा तेल विहिरीतून मिळणाऱ्या संलग्न (Associate) गॅसपासून मिळवला जातो तसेच तो तेलशुध्दिकरण प्रक्रियेतून प्राप्त केला जातो. नैसर्गिक वायूपासून मिळणारा एलपीजी प्रोपेन आणि ब्युटेन या संपृक्त हायड्रोकार्बन वायूंनी युक्त असतो. तेलशुध्दिकरण कारखान्यांत भंजन आणि उत्प्रेरकी सुधारणा (Cracking and Reforming) या प्रक्रियांनी तयार केलेल्या वायूमध्ये प्रोपिलीन आणि ब्युटिलीन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आढळतात.
भंजन आणि उत्प्रेरकी सुधारणा (Cracking and Reforming) : भंजन : पेट्रोलियम उद्योगात दीर्घ साखळीच्या क्लिष्ट सेंद्रिय रसायनांचे उच्च तापमान आणि दाबाखाली लहान आकाराच्या रेणूत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला भंजन म्हणतात. जितका दाब व तापमान जास्त, तितकी जास्त प्रमाणात छोट्या रेणूची निर्मिती होत असते. उत्प्रेरकीय भंजनापासून पेट्रोल आणि एलपीजी वायू मिळवले जातात, तर जलीय भंजनापासून (Hydrocracking) विमानाचे इंधन (एटीएफ), डीझेल, नॅप्था तसेच एलपीजी देखील प्राप्त केला जातो.
ऊष्मीय पध्दत (Thermal cracking & Steam cracking) आणि उत्प्रेरकीय पध्दत (Fluid catalytic cracking, Hydrocracking) या विविध प्रक्रियांनी क्लिष्ट रसायनांचे भंजन घडवून आणले जाते.
उत्प्रेरकी सुधारणा : पेट्रोलियम खनिज तेलापासून विविध पदार्थ निर्माण करताना सुधारित रासायनिक प्रक्रियेचा वापर होतो. या प्रक्रियेला उत्प्रेरकी सुधारणा असेही नाव आहे. या प्रक्रियेद्वारे कमी ऑक्टेन क्रमांक असलेल्या हायड्रोकार्बन रसायनांचे उच्च ऑक्टेन क्रमांक असलेल्या हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेसाठी ५०० — ५३०० से. तापमान आणि २ — २५ किग्रॅ./सेंमी. दाबाची गरज असते व त्यात उत्प्रेरकांचा सहभाग असतो.
भंजन आणि उत्प्रेरकी सुधारणा प्रक्रियांनी निर्माण केल्या जाणाऱ्या एलपीजीमध्ये संपृक्त हायड्रोकार्बन रसायनांसोबत काही प्रमाणात असंपृक्त हायड्रोकार्बन रसायनेदेखील समाविष्ट असतात.
साठवण : वातावरणातील सर्वसाधारण तापमानाला व दाबाला एलपीजी वायूरूपात असतो. त्यावर दाब देऊन त्याचे द्रवात रूपांतर केले जाते आणि म्हणूनच त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे संबोधितात. त्याची वाहतूक द्रवरूपात होते आणि तो द्रवरूपात टाक्यांत साठविला जातो. द्रवात रूपांतर केल्याने या वायूचे आकारमान २४० पटीने कमी होते. त्यामुळे एका टाकीत मुबलक गॅस भरता येतो. घरगुती वापराच्या एका गॅसटाकीत १४.२ किग्रॅ. एलपीजी साठविलेला असतो तर रिकाम्या टाकीचे वजन १६ ते १८ किग्रॅ. असते.
गुणधर्म : हा वायू रंगहीन असतो आणि त्याला वासही नसतो. परंतु त्याचा सिलिंडर हाताळताना निष्काळजीपणा झाला किंवा काही तांत्रिक त्रुटीमुळे गॅस टाकीतून गळाला, तर त्याचे वातावरणातील अस्तित्व सहज समजावे म्हणून एलपीजीमध्ये एथिल मरकॅप्टन नावाचा तीव्र वासाचा वायू अल्प प्रमाणात मिसळतात. शेगडीत एलपीज. जळत असताना हा वायूदेखील जाळून जातो आणि शिजवल्या जाणाऱ्या अन्नावर त्याचा काही परिणाम होत नसतो. एलपीजी हा विषारी वायू नाही, परंतु वातावरणात जास्त प्रमाणात पसरला तर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने माणूस गुदमरण्याची शक्यता असते. द्रवरूपात असलेल्या एलपीजीचे वजन पाण्याच्या निम्मे असते. त्याची घनता ०.५५ ते ०.५८ ग्रॅम प्रति लिटर असते. त्याचे बाष्प हवेपेक्षा दीड ते दोन पट वजनी असते. त्यामुळे गळती झालेला एलपीजी जमिनीलगत पसरतो. त्याचा विस्तार सहगुणक (Coefficient of expansion) पाण्याच्या १२ पट असतो. हा द्रव रूपातील वायू टाक्यांत भरताना त्याची घनता व विस्तार सहगुणक विचारात घ्यावे लागतात.
एलपीजीचा सर्वांत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याचा बाष्पदाब (Vapour pressure) होय. जसे तापमान वाढते, तसा द्रवाचा बाष्पदाब वाढत जातो. वातावरणातील दाब आणि द्रवपदार्थाचा बाष्पदाब समान होतो, तेव्हा तो द्रव उकळू लागतो. द्रवरूपातील एलपीजीचा उत्कलनबिंदू ०० से.च्या खाली असतो.
एलपीजी हवेच्या संपर्काशिवाय जळू शकत नाही. त्याचे हवेतील २ — ९ % प्रमाण ज्वलनशील असते. ज्वलनशील वायू विशिष्ट प्रमाणात हवेत मिसळले की पेट घेतात. ज्या कमीत कमी प्रमाणात वायू हवेत मिसळून स्फोटक मिश्रण तयार होते त्यास न्यूनतम स्फोटक मर्यादा (Lower explosive limit) म्हणतात. जर त्या मिश्रणातील वायूचे प्रमाण वाढत गेले तर एका विशिष्ट वरच्या प्रमाणानंतर ते मिश्रण जाळण्याचे थांबते व त्या प्रमाणाला उच्चतम स्फोटक मर्यादा म्हणतात. तक्ता क्र. १ मध्ये दिसून येते की, विविध ज्वलनशील वायूशी तुलना करता एलपीजी खूप कमी प्रमाणातील हवेशी होणारे मिश्रण ज्वलनक्षम असते.
विविध पद्धतींनी उपयोगी असलेले हे इंधन तुलनात्मकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोपे ठरते आणि साठवणुकीसाठी सुरक्षित असते. त्याचा वापरदेखील कमी खर्चाचा असतो. हे स्वच्छ इंधन आहे. एलपीजीचा स्वयंपाकघरातील इंधन, वाहतुकीसाठी इंधन आणि औद्योगिक क्षेत्रात कर्तन कामामध्ये (Cutting) प्रामुख्याने वापर होतो.