प्राचीन काळापासून आपल्या मानवजातीच्या भूतकाळाबद्दल सर्वांनाच विलक्षण कुतूहल आहे. जगभरातल्या जवळजवळ सर्व जमातींच्या मौखिक परंपरा व मिथ्यकथांमध्ये भूतकाळाबद्दल व उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न आढळतात. तथापि युरोपात प्रबोधनकाळापासून भूतकाळाच्या शोधाला गती मिळाली व यामधून पुरातत्त्वविद्येचा उगम झाला. हे प्रामुख्याने सतराव्या शतकात घडून आले. तेव्हापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंत पुरातत्त्वविद्येत अनेक बदल होत गेले.

फ्लाविओ बिओन्दो (१३९२–१४६३) यांनी इटलीचा पहिला इतिहास लिहिला. रोम शहराची रचना समजावी म्हणून त्यांनी रोममधील प्राचीन अवशेष (फोरो रोमानो) खोदले व त्याचे वर्णन हिस्टोरिअरम  या ग्रंथात केले. यामुळे बिओन्दो हे पहिले पुरातत्त्वज्ञ ठरतात. ब्रिटिश लेखक व पुराणवस्तू-संग्राहक जॉन ऑब्रे (१६२६–९७) यांना पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी विल्टशायर  (विल्टशर) परगण्यातील ॲव्हबरी येथील महाकाय दगडांच्या प्राचीन स्मारकांचा आणि आता जागतिक वारसास्थळ असलेल्या ⇨ स्टोनहेंजचा शोध लावला. यानंतर प्राचीनवस्तुसंशोधक विल्यम स्टकली (१६८७–१७६५) यांनी येथील अवशेषांचे पद्धतशीर वर्णन केले. तसेच महाकाय दगडांचे हे प्रचंड काम कोणा राक्षसांचे नसून ते प्राचीन काळातील माणसांनीच केले आहे, हे त्यांचे प्रतिपादन अत्यंत महत्त्वाचे आहे.

इटलीतील एल्बोयुफच्या राजपुत्राने १७०७ मध्ये हर्क्युलेनिअम (⇨ हर्क्युलॅनिअम) येथे संगमरवरी पुतळे व प्राचीन मौल्यवान वस्तूंसाठी उत्खनन करवले.  पुढे १७३८ मध्ये सिसिलीच्या चार्ल्स राजाने नेमलेल्या मार्सेलो व्हेनुती या अभियंत्याने हर्क्युलेनिअम येथे पद्धतशीर उत्खनन करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर १७४८ मध्ये ज्वालामुखीच्या राखेखाली गाडल्या गेलेल्या पोम्पेईचा (⇨ पॉंपेई)  शोध लागला. नेपल्सच्या राजा-राणीने या ठिकाणी उत्खननाला प्रोत्साहन दिले. तथापि या उत्खननाचा हेतू मौल्यवान पुराणवस्तू मिळवणे हाच होता. अशा उत्खननांमध्ये मोठमोठे खड्डे व भुयारे खणली जात असत व पुराणवस्तू कोठून काढल्या, याची कसलीही नोंद ठेवली जात नसे. या काळात अनेक हौशी लोक खजिना शोधण्यासाठी ईजिप्त, ग्रीस वगैरे देशांमध्ये मोहिमा काढत. चांगल्या मौल्यवान पुराणवस्तू मिळवून त्या संग्रहालयांसाठी अथवा धनिकांच्या खासगी हौसेसाठी लुटून नेण्याच्या या कालखंडात जिओव्हान्नी बेल्झोनी (१७७८–१८२३) हा इटालियन धाडसी शोधक आघाडीवर होता. त्याने ईजिप्तमध्ये अनेक प्राचीन स्थळांचा शोध लावला; तथापि अनेक मौल्यवान पुरावशेष त्याने इंग्लंडमध्ये विकले.

यूरोपात पुरातत्त्वविद्येचा उगम होत असताना नव्या जगातही (New World)  उत्खनन करण्याचा पहिला प्रयत्न १७६४ मध्ये झाला होता. पेरूमध्ये हुआका डी टान्टालुक येथे प्राचीन दफन-टेकाडांच्या उत्खननाचे आराखडे मिळाले; परंतु हे करणाऱ्याचे नाव कळाले नाही. बहुधा ट्रूजिल्लोचा नगरप्रमुख असलेल्या मिग्युएल फिजीओ याने ते केले होते. १७८४ ते १७८७ यादरम्यान कॅप्टन अंतोनिओ डेल रिओ याने पेलेनक्यू या माया-संस्कृतीच्या नगराचे उत्खनन केले होते. या दोन्ही उत्खननांचा हेतू स्थानिक रहिवाशांचा इतिहास जाणून घेणे हा होता.

भारतात पुरातत्त्वविद्येचा उगम जरी एकोणिसाव्या शतकात झाला असला, तरी भारताचा प्राचीन इतिहास शोधण्याचे काम ⇨ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या स्थापनेने सुरू झाले (१७८४). या काळात भारतविद्या (Indology)  अथवा प्राच्यविद्या (Oriental studies)  यांच्या अभ्यासकांनी प्राचीन भारतीय इतिहास आणि भाषा यांच्यात रस घेऊन महत्त्वाची कामगिरी केली. यामध्ये प्राच्यविद्यासंशोधक ⇨ सर विल्यम जोन्स (१७४६–१७९४) यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे एशियाटिक रिसर्चेस हे नियतकालिक सुरू झाले (१७८८). भारतात पुरातत्त्वीय स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासंबंधी पहिले प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू झाले. बंगाल व मद्रास येथील ⇨ रेग्युलेटिंग ॲक्टमुळे सरकारला सार्वजनिक इमारतींच्या गैरवापरावर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला.

पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात पहिले वैज्ञानिक उत्खनन करण्याचे श्रेय अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन ( ⇨ टॉमस जेफरसन ; १७४३–१८२६) यांना जाते. त्यांनी सन व्हर्जिनियातील आपल्या जमिनीत असलेल्या प्राचीन दफन-टेकाडांचे उत्खनन केले (१७८१). मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडे आढळणारी ही टेकाडे स्थानिक इंडियनांची नव्हे, तर माउंडबिल्डर वंशातील लोकांच्या दफनभूमी आहेत, ही प्रचलित समजूत जेफरसन यांनी प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यांनी खोडून काढली. पुरातत्त्वज्ञ कॉलीन रेनफ्रू व पॉल बाह्न हे ‘जेफरसननी अंदाजांचा कालखंड संपवलाʼ, असे मानतात. तथापि पुरातत्त्वविद्येचे स्वरूप हौशी पातळीवरचे, मौल्यवान पुरावशेष जमवण्याच्या आणि खजिना शोधण्याच्या उद्देशाने करायचे अद्भुत काम असेच मर्यादित होते. उदा., थॉमस ब्रूस (सेव्हन्थ अर्ल ऑफ एल्गिन) याने १८०३ मध्ये अथेन्समधील प्राचीन ग्रीक मंदिरांचे अनेक शोभिवंत संगमरवरी भाग काढून मायदेशी इंग्लंडला नेले. अशाच प्रकारे ईजिप्तवर स्वारी केल्यानंतर नेपोलियन बोनापार्टने अनेक मौल्यवान पुरावशेष फ्रान्सला नेले होते. केवळ नेपोलियनच नाही, तर या काळातील सर्व वसाहतवादी यूरोपीय सत्तांनी जगभरातून अत्यंत मौल्यवान पुराणवस्तू गोळा केल्या होत्या. जगातील मोठी वस्तुसंग्रहालये अशा लुटून नेलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांनी भरलेली आहेत.

पुरातत्त्वविद्येच्या उगमकाळात सुमारे दोनशे वर्षे प्राचीन अवशेषांकडे छंद म्हणून अथवा काहीतरी अद्भुत म्हणून बघितले जात असे. बहुतेक वेळा हौस भागवण्यासाठी, गमतीसाठी श्रीमंत लोक पुरातत्त्वाकडे वळत असत. या काळात प्राचीन अवशेषांकडे लुटण्याजोगी संपत्ती म्हणून पाहिले जात असे. म्हणून या कालखंडाला ‘पुराणवस्तू शोध-कालखंडʼ (Antiquarian period) असे म्हणतात. अद्याप पुरातत्त्वविद्येला एक ज्ञानशाखा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झालेली नव्हती. प्राचीन अवशेषांचा अर्थ लावताना लोक प्रामुख्याने वैयक्तिक अंदाजांवर विसंबून राहत असत,  म्हणून कॉलीन रेनफ्रू व पॉल बाह्न पुरातत्त्वविद्येच्या इतिहासातील या काळाला (सतरावे व अठरावे शतक) ‘अंदाजांचा कालखंडʼ असे म्हणतात.

संदर्भ :

  • Chakrabarti, Dilip. K. A History of Indian Archaeology from the Beginning to 1947, Delhi, 1988.
  • Milner, G. R.  The Moundbuilders : Ancient Peoples of Eastern North America, New York, 2004.
  • Noël Hume, Ivor Belzoni: The Giant Archaeologists Love to Hate, 2011.
  • Paz, Cabello Carro ; Eds., Bleichmar, D. & Mancall, P. C.  ‘Spanish Collections of Americana in the Eighteenth Centuryʼ, Collecting Across Cultures, Philadelphia, 2011.
  • Ramage, Nancy H. ‘Goods, Graves, and Scholars: 18th-Century Archaeologists in Britain and Italyʼ, American Journal of Archaeology, 1992.
  • Renfrew, Colin & Bahn, Paul G. Eds., Key Concepts in Archaeology, New York, 2004.
  • Sweet, Rosemary Antiquaries: The Discovery of the Past in Eighteenth-Century Britain, London, 2004.

समीक्षक : शरद राजगुरू