सूर्यग्रहणाचे प्रकार खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse), खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse) आणि कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Eclipse) असे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. सूर्यग्रहणासंबंधी सविस्तर माहिती सूर्यग्रहण या नोंदीत दिलेली आहे.

खग्रास सूर्यग्रहण

खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण: वर्तमानपत्रे किंवा अन्य माध्यमांमध्ये अमुक दिवशी ‘खग्रास ग्रहण’ आहे, अशी बातमी आली, तर ग्रहणव्याप्त प्रदेशात सर्वांनाच ‘खग्रास अवस्था’ (Totality) दिसतेच, असे नाही. सूर्याच्या मोठ्या आकारामुळे चंद्राच्या पृथ्वीवर दोन छाया पडतात. यात मध्यभागी असणाऱ्या गडद छायेच्या (Umbra) भोवती विरळ छाया (Penumbra) असते. गडद छायेच्या स्थानावरून सूर्य पूर्ण झाकलेला दिसतो, तर गडद छायेपासून आपण जसजसे दूर जाऊ, तसतसा सूर्याचा कमी कमी भाग झाकलेला दिसतो. जो भाग चंद्राच्या गडद छायेत (Umbra) येतो, त्या अत्यंत मर्यादित भागातच सूर्यबिंब चंद्रबिंबाकडून संपूर्ण झाकले गेले आहे, असे दिसते. यालाच ‘खग्रास अवस्था’ (Totality) असे म्हणतात. चंद्राच्या विरळ सावलीत म्हणजे उपछायेत (Penumbra) येणाऱ्या प्रदेशात सूर्यग्रहण खंडग्रास दिसते. सूर्यबिंबाचा भाग येथून पाहताना चंद्रबिंबामुळे अंशत:च झाकला गेल्याने या भागातून दिसणाऱ्या ग्रहणाला खंडग्रास (Partial Eclipse) ग्रहण म्हणतात.

खग्रास अवस्थेचे निरीक्षण: खग्रास अवस्थेचे (Totality) निरीक्षण करण्याची संधी जर आपल्या आयुष्यात आली, तर ती कदापिही सोडू नये. इतका हा आविष्कार सुंदर असतो. त्याचे वर्णन शब्दांच्या पलीकडचे आहे. भर दिवसा रात्रीच्या अंधाराची अनुभूती, वाटोळे काळे सूर्यबिंब, त्या भोवती प्रभामंडलाचे (Corona) दृश्य, खगोल स्थितीपूर्वी वातावरणात हळूहळू होणारा बदल, खग्रास स्थिती होताना अचानक आणि एकदम होणारा बदल, अशा अनेक गोष्टींचा रोमांचकारी अनुभव सामान्य माणूसही खग्रास ग्रहणाचे निरीक्षण करताना घेऊ शकतो. मात्र ग्रहण पाहताना योग्य ती खबरदारी घेऊनच निरीक्षण करावे लागते. ग्रहण पाहण्यासाठी खास बनवलेले, डोळ्यांना लावायचे सुरक्षा-गॉगल वापरावे लागतात. तसेच इतरही काही ग्रहण निरीक्षण पद्धती आहेत. (पाहा: ग्रहणकालीन सुरक्षा उपाय)

खंडग्रास सूर्यग्रहण

खग्रास अवस्थेत चंद्रबिंबाच्या परिघावर मण्यांसारखे तेजस्वी ठिपके दिसतात, त्यांना ‘बेलीचे मणी’ (Baily’s beads) असे ओळखले जाते. चंद्रबिंबाकडून सूर्यबिंब जेव्हा हळूहळू झाकले जाते, त्या शेवटच्या क्षणी सूर्याचा अगदी थोडा भाग झाकायचा उरतो, हे दृश्यही अतीव सुंदर दिसते. अंगठीतला खडा चमकावा, तसे हे दृश्य ‘हिऱ्याची अंगठी’ (Diamond Ring) या नावाने ओळखले जाते. खग्रास अवस्था संपत असतांना हेच दृश्य पुन्हा दिसू शकते. चंद्रबिंबाच्या परीघावर असणाऱ्या विवरांमुळे, उंचसखल भागांमुळे हा परिणाम दिसतो. तसेच खग्रास अवस्थेत, सूर्याच्या पृष्ठभागावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला (Prominences) ही पाहता येतात. प्रभामंडल किंवा सौरकिरीट (Solar Corona) हा सूर्याच्या वातावरणाचा सर्वात बाहेरचा भागही तेव्हाच दिसतो. किरीटाच्या पार्श्वभूमीवर काळे सूर्यबिंब शोभून दिसते.

खग्रास ग्रहण सुरू होत असतांनाच जमिनीवर एक अतीव सुंदर पण वेगळे दृश्य दिसते. एक आड एक अशा सावल्या जमिनीवरून सळसळत जाताना दिसतात. या प्रकाराला सावल्यांचे पट्टे (shadow bands किंवा Flying Shadows) असे म्हणतात हा सूर्याच्या प्रकाशमार्गात चंद्राच्या अडथळ्यामुळे त्याच्या सावलीच्या कडेवरून होणारा विवर्तन परिणाम असतो. या शिवाय काही काळ टिकणाऱ्या ह्या खग्रास स्थितीच्या गडद अंधारात सूर्याच्या आसपासच्या भागात असणारे काही तारे किंवा ग्रहही दिसू शकतात. बहुसंख्य ग्रहणांमध्ये खग्रास अवस्था सुमारे 3 – 4 मिनिटेच पाहता येते. या अवस्थेचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 30 सेकंद असू शकतो. खग्रास अवस्थेचा जास्तीत जास्त कालावधी किती ते पुढील गोष्टींवर अवलंबून असते.

१) चंद्र पृथ्वी पासून जवळ असला म्हणजे चंद्रबिंब मोठे असते.

२) पृथ्वी सूर्यापासून दूर असली की सूर्यबिंबाचा आकार तुलनेने लहान असतो.

३) पृथ्वीची पश्चिमेकडून पूर्वेकडे होणारी गती दर मिनिटाला सुमारे 28 किमी असते. चंद्रसावली सुद्धा त्याच दिशेने साधारण 60 किमी प्रति मिनिट या वेगाने सरकते. म्हणून विषुववृत्तावर चंद्रसावली सरकण्याचा परिणामी वेग दर मिनिटाला सुमारे 32 किमी असतो. इतर अक्षवृत्तावर हा परिणामी वेग यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे खग्रास अवस्था विषुववृत्त प्रदेशात जास्त कालावधीची असू शकते.

जर सूर्य पातबिंदूपासून म्हणजे राहू किंवा केतू बिंदूपासून 9 अंश 53 मिनिटे इतक्या अंतरापेक्षा कमी अंशात्मक अंतरावर असेल, तर खग्रास ग्रहण निश्चित होते.  हे अंतर 9 अंश 53 मिनिटे ते साडेअकरा अंशापर्यंत असेल तर खग्रास ग्रहण होण्याची शक्यता असते, पण ते होईलच असे सांगता येत नाही, कारण चंद्राचा शर (Latitude) म्हणजे आयनिकवृत्ताशी चंद्राच्या कक्षापातळीचा होणारा कोन या सतत बदलणाऱ्या किमती असतात. जर हे अंतर पातबिंदूपासून साडेअकरा अंशापेक्षा दूर असेल, तर त्या अमावास्येला ग्रहणाची शक्यता आहे, परंतु, खग्रास अवस्था निश्चितच दिसणार नाही असे सांगता येते. चंद्राच्या पृथ्वीवर पडणाऱ्या गडद सावलीची रुंदी सुमारे १०० ते २०० किमी असते. त्यामुळे बहुसंख्य लोकांना खग्रास स्थिती पाहण्यासाठी, सावलीचा मार्ग जिथून जातो, त्या स्थळी आणि त्या ठराविक वेळी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जावे लागते. त्या स्थानी उपस्थित राहावे लागते.

खग्रास अवस्था किंवा खग्रास सूर्यग्रहण ही घटना शास्त्रज्ञांनाही पर्वणी असते. हेलियम या वायूचा शोध 17 ऑगस्ट 1868 च्या खग्रास सूर्यग्रहणाची भारतामधून निरीक्षणे घेताना लागला. सूर्याच्या प्रभामंडलाचे तापमान सुमारे 10 लाख अंश सेल्सियस असते किंवा दूरच्या, परंतु वस्तुत: सूर्याच्या परीघामागे असलेल्या ताऱ्याकडून येणारा प्रकाशकिरण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे (अवकाश वक्रतेमुळे) अगदी सूक्ष्म कोनातून वळतो (विस्थापित होतो) इत्यादी शोध खग्रास ग्रहणामुळेच लागलेले आहेत.

कंकणाकृती सूर्यग्रहण

कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Eclipse): एखाद्या सूर्यग्रहणाचे वेळी चंद्राची विरळ सावली (उपछाया ; Penumbra) पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते, पण गडद छाया (Umbra) पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही. उपछायेतील लोकांना नेहमीसारखे खंडग्रास ग्रहण दिसते आणि ऋण गडद छायेत (Negative Umbra) असणाऱ्या लोकांना ते कंकणाकृती ग्रहण दिसते. (आकृती पाहा). AXB ही गडद सावली आहे. या गडद सावलीचे X टोक जेथे आहे तेथे सावली संपली. AX आणि BX या बाजू वाढविल्यास पृथ्वीवरील A’ ते B’ या भागात कंकणाकृती ग्रहण दिसते.  A’-X-B’ यास ऋण गडद छाया (negative umbra) म्हणतात. सूर्यबिंबाचा मधला भाग संपूर्ण चंद्राकडून झाकला जातो. परंतु, सूर्यबिंबाची परिघाकडील थोडी बाजू मोकळीच राहते. हे दृश्य बांगडीसारखे दिसते, म्हणून या प्रकारास ‘कंकणाकृती’ ग्रहण म्हणतात. परिघाकडील बाजू झाकली न गेल्यामुळे खग्रास अवस्थेतील अंगठी(डायमंड रिंग), बेलीचे मणी, सावल्यांचे पट्टे, अशा कोणत्याच गोष्टी कंकणाकृती ग्रहणात अनुभवास येत नाहीत. कंकणाकृती ग्रहण जास्तीत जास्त 12 मिनिटे 30 सेकंद पर्यंत राहू शकते.  कंकणाकृती ग्रहण जास्तीत जास्त वेळ दिसण्यासाठी पृथ्वी उपसूर्य स्थानी (सूर्याला जवळ) असणे आणि चंद्र अपभू स्थानी (पृथ्वीपासून कमाल अंतरावर) असणे ही आदर्श स्थिती असते.

15 जानेवारी 2010 रोजी भारतातून दिसलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणातील कंकणाकृती अवस्था 11 मिनिटे 8 सेकंद इतक्या कालावधीची होती.  इ.स. 3043 पर्यंतच्या कंकणाकृती ग्रहणांमध्ये एवढा मोठा कालावधी कोणत्याच कंकणाकृती अवस्थांचा असणार नाही.  कोणत्याही सूर्यग्रहणात चंद्र त्याच्या सरासरी अंतरापेक्षा जास्त अंतरावर असेल, तर चंद्रबिंब नेहमीच सूर्यबिंबापेक्षा लहान असते. (अपवाद चंद्राची उपभू स्थिती) त्यामुळे एखाद्या विशिष्ट कालावधीत होणाऱ्या सूर्यग्रहणांची संख्या विचारात घेतली तर त्यामध्ये खग्रास ग्रहणांपेक्षा कंकणाकृती ग्रहणांची संख्या जास्त असण्याची शक्यता असते.  डोळ्यांच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घेऊन कंकणाकृती अवस्थासुद्धा पाहण्यासारखी असते.

संयुक्त सूर्यग्रहण

 

संयुक्त ग्रहण (Hybrid Eclipse): या प्रकारचे ग्रहण अत्यंत दुर्मिळ असते. चंद्राची गडद छाया (Umbra) जेमतेम पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत असेल, तर तेथील मर्यादित भागात खग्रास अवस्था दिसते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वक्रतेमुळे नंतर किंवा अगोदर हीच सावली पृष्ठभागाला स्पर्श करू शकत नाही. अशा ठिकाणी ग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसते.  मात्र विरळ सावलीच्या भागात नेहमीप्रमाणे खंडग्रास ग्रहण दिसते. अशा तऱ्हेने एकाच ग्रहणात (सावलीच्या मार्गात) काही ठिकाणी कंकणाकृती अवस्था दिसणे आणि काही ठिकाणी खग्रास अवस्था दिसणे यास संयुक्त ग्रहण (Hybrid Eclipse) किंवा ‘खकंकण ग्रहण’ म्हणतात.

 

 

संदर्भ:

समीक्षक : आनंद घैसास