पुरातत्त्वीय अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग. सर्व वसाहतवादी यूरोपीय देशांनी सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी आपल्या देशातील गुन्हेगारांची हकालपट्टी करून त्यांच्या वसाहती (Penal Settlements) स्थापन केल्या होत्या. ब्रिटनने सन १७१८ पासून देशातील गुन्हेगारांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना अमेरिकेतील वसाहतींमध्ये पाठवायला सुरुवात केली. परंतु वसाहती स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १७७६ नंतर हे थांबले. मग काही वर्षे गुन्हेगारांना कामातून जवळजवळ बाद झालेल्या जुन्या जहाजांवर डांबून ठेवले जात असे. त्यांना हुक (Hulk) म्हणत असत. नंतर गुन्हेगारांना ऑस्ट्रेलियात पाठवण्याची कल्पना पुढे आली. एकट्या ऑस्ट्रेलियात १७८८ ते १८६८ या काळात १६८०० गुन्हेगार पाठवले होते. किरकोळ शिक्षा झालेले अगदी भुरटे चोर (यात भुकेपोटी चोरी करणारी आठ वर्षे वयापासूनची मुलेही असत) ते जन्मठेपेची शिक्षा झालेले अट्टल गुन्हेगार जहाजात भरून वसाहतींकडे पाठवले जात. या जहाजांना ’गुन्हेगार जहाजे’ (Convict Ship) असे म्हटले जाई. इतर जहाजांप्रमाणेच या जहाजांनाही अपघात होऊन ती बुडत असत. ब्रिटनहून ऑस्ट्रेलियाकडे १८०० ते १८९९ या काळात पाठवलेल्या व बुडलेल्या ४० जहाजांपैंकी ॲम्फिट्राइट (Amphitrite), जॉर्ज थर्ड (George III), नेवा (Neva) आणि हाइव्ह (Hive) ही चार जहाजे गुन्हेगार जहाजे होती. ऑस्ट्रेलियात अशा बुडलेल्या जहाजांचा पुरातत्त्वीय अभ्यास झाला असून त्यांमधील काही आता वारसास्थळे बनली आहेत.

जॉर्ज थर्ड जहाजबुडीचे स्मारक.

ॲम्फिट्राइट (Amphitrite) हे इंग्लंडमधील वूलविच येथून न्यू साउथ वेल्सकडे निघालेले ब्रिटिश जहाज ३१ ऑगस्ट १८३३ रोजी फ्रान्सच्या किनाऱ्यावर बोल्योन गावाजवळ बुडले. त्याच्यावर १०८ गुन्हेगार स्त्रिया, १२ मुले आणि १६ कर्मचारी होते. जहाज बुडत असतानाही कप्तान जॉन हंटर याने स्त्रिया व मुलांना मोकळे करून डेकवर येऊ न दिल्यामुळे सर्वजण बुडून मरण पावले. या जहाजाचा पुरातत्त्वीय दृष्टीने फारसा अभ्यास झालेला नाही.

जॉर्ज थर्ड (George III) हे जहाज १८३४ मध्ये इंग्लंडमधील वूलविच येथून टास्मानियातील व्हान डीमेन्स लँड (Van Diemen’s Land) या ब्रिटिश गुन्हेगार वसाहतीकडे निघाले होते. ते १२ एप्रिल १८३५ रोजी खडकावर आपटून फुटले. जहाजावर एकूण ३०८ जण होते. त्यांत २२० पुरुष कैद्यांचा समावेश होता. जहाजातील १३३ जण मरण पावले, त्यांत १२८ कैदी होते. जहाज बुडत असूनही पहारेकऱ्यांनी गोळीबार केला आणि कोठड्यांमधून कैद्यांना डेकवर येऊ दिले नाही, अशी बातमी स्थानिक वृत्तपत्रांनी दिल्याने या जहाजबुडीच्या घटनेची चौकशी झाली, पण त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. जहाजफुटीला कारणीभूत ठरलेल्या खडकाचे आता जॉर्ज थर्ड असे नामकरण करण्यात आले असून तेथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. बुडलेल्या जहाजाचे उथळ पाण्यातले अवशेष सहज दिसतात. त्याच्यावरील काही वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

नेवा (Neva) हे तीन शिडांचे ३०० टनी ब्रिटिश जहाज आयरिश गुन्हेगारांना घेऊन आर्यलंडमधील कॉर्कहून टास्मानियाकडे जाताना १३ मे १८३५ रोजी उथळ पाण्यात शिरून फुटले. जहाजावर १५० गुन्हेगार स्त्रिया, ९ ‘मुक्त’ स्त्रिया आणि ५५ मुले होती. जहाजावरील बचावलेल्या २२ लोकांनी किनाऱ्यावर तात्पुरती छावणी उभारली व त्यात ते दोन महिने राहिले. अखेर त्यांतील फक्त नऊ कर्मचारी आणि सहा स्त्रिया वाचल्या. जहाजावरचे एकूण २२० जण मृत्यूमुखी पडले होते.

सन १८३५ एकाच वर्षात ऑस्ट्रेलियात बुडलेले हाइव्ह (Hive) हे तिसरे गुन्हेगार जहाज होते. हे ४८० टनाचे जहाज ऑगस्ट १८३५ मध्ये आर्यलंडमधील कॉर्क येथून २५० पुरुष गुन्हेगारांना घेऊन ऑस्ट्रेलियाकडे निघाले होते. हे जहाज १० डिसेंबर १८३५ रोजी न्यू साउथ वेल्समध्ये शोलहेवन शहराजवळ भेरवेरे बीच (Bherwerre beach) या ठिकाणी अपघातग्रस्त झाले. हाइव्हवरील काही माल व वस्तू मिळवण्यासाठी ‘ब्लॅकबर्ड’ नावाचे एक मालवाहू जहाज सिडनीहून पाठवण्यात आले. पण ते देखील १६ जानेवरी १८३६ रोजी हाइव्हच्या जवळच वाळूत रूतल्याने अपघातग्रस्त झाले. त्यात बहुतेकजण वाचले आणि त्यांना स्थानिक आदिवासींनाही मदत केली. जहाजाचे किनाऱ्यापासून ४० मी. अंतरावर साधारण अडीच मीटर खोलीवर विखुरलेले अवशेष १९९४ मध्ये सापडल्यावर पुरातत्त्वीय अभ्यास करण्यात आला. सांप्रत हे स्थळ वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Staniforth, Mark, ‘Shipwrecks: images and perceptions of nineteenth century maritime disastersʼ, Sydney Studies in Society and Culture, 7: 45-64, 1992.
  • Roe, Michael, An Imperial Disaster, The Wreck of the George the Third, Blubber Head Press, Hobart, 2006 .

                                                                                                                                                                                    समीक्षक : भास्कर देवतारे