गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महसीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर आहे. मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने महसीर हा शब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला खडवी, खडची, मस्ता, महाला व मस्तर अशी नावे आहेत. बंगाली भाषेत त्याला टॉर, महासीर, मासीर, महासार व महासाल अशी नावे आहेत. त्याच्या सात जाती आहेत. यूरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील बहुतेक सर्व नद्या व सरोवरे यांत महसीर आढळतो. भारतामध्ये हिमालय पर्वताच्या पायथ्याच्या टेकड्यांत असणाऱ्या जलाशयात (काश्मीरपासून आसामपर्यंत) आणि पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांतील नद्या व तलाव यांत महसीर आढळतो. नर्मदा आणि तापी या नद्यांत त्यांची मासेपकड मोठ्या प्रमाणात केली जाते.
महसिराची लांबी सु. १·५ मी. असून वजन ५०–५४ किग्रॅ. असते. शरीराचा रंग आकर्षक व अनेक मिश्र छटांचा असतो. शरीराच्या वरच्या अर्ध्या बाजूचा रंग हिरवट रुपेरी किंवा गडद काळसर हिरवा असतो. शरीराच्या बाजू रुपेरी-सोनेरी रंगांचे मिश्रण असलेल्या आणि खालच्या बाजूला पोटाकडे त्याच रंगाच्या फिकट छटा असतात. सर्व शरीरावर मोठे चक्राभ (सायक्लॉइड) व षट्कोनी खवले असतात. खवल्यांच्या कडा काळसर रंगाच्या असतात, त्यामुळे माशाच्या शरीरावर त्यांची सुंदर नक्षी तयार होते. मुस्कट टोकदार असून चूषी मुख पुरस्सरणक्षम असते. महसीर पाण्याच्या तळाकडील अन्न घेतो. नवजात मासे कीटकभक्षी, तर पूर्ण वाढ झालेले हे मासे शाकाहारी असतात. डोळे खूप मोठे असून डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात. ताेंड जाड असून त्यांभोवती चार लवचिक स्पृशा असतात. डोके मोठे, धड निमुळते व शेपटी लांब असते. पुच्छपर दोन खंडांमध्ये विभागलेला असतो. पृष्ठपर हा अधरपराच्या अगदी समोर असतो. वक्षपर डोक्याच्या मागे सुरू होऊन अधरपरापर्यंत असतो. अधरपर भडक लालसर पिवळ्या रंगाचा असतो. गुदपर छोटा असतो.
महसिरांचे विणीचे हंगाम वर्षातून १–३ वेळा असतात. या हंगामात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीच्या उगमाकडे तसेच उपनद्यांकडे जातात. मादी तेथे अंडी घालते. पिले मोठी झाली की प्रवाहाबरोबर नदीमुखाच्या दिशेने येतात. जलाशयातील महसीर खोल पाण्यात अंडी घालतात. या माशांमध्ये स्थलांतर दिसून येते. खाण्यासाठी असलेल्या माशांमध्ये उत्कृष्ट मासा म्हणून महसिराची गणना होत असल्यामुळे त्याला माशांचा राजा असे म्हणतात. गळाने त्यांची शिकार फार मोठ्या प्रमाणात होते. अनेक राज्यांत महसिरांचे संवर्धन केले जाते.