ज्वारीच्या पिकावर वाढणारा एक उपद्रवी कीटक. मिज माशीचा समावेश कीटक वर्गाच्या डिप्टेरा गणात केला जातो. तिची ३०–३४ कुले आहेत. त्यांपैकी सीसिडोमाइडी कुलातील काही जातींच्या माश्या गहू, ज्वारी व बाजरी यांसारख्या पिकांचे नुकसान करतात. भारतात स्टेनोडिप्लोसिस सोर्घीकोला या जातीची मिज माशी ज्वारीच्या पिकावर वाढते. तिच्या उपद्रवामुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरत नाहीत. मिज माशीची कॉण्टॅरिनिया सोर्घीकोला ही जातीसुद्धा ज्वारीच्या पिकावर वाढते.
मिज माशीची (स्टेनोडिप्लोसिस सोर्घीकोला) लांबी १·५–२ मिमी. असते. शरीराचा रंग लाल ते केशरी यांच्या दरम्यान असतो. डोके पिवळ्या रंगाचे व पाय तपकिरी रंगाचे असतात. स्पृशा लांब असतात. नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो. मादीचा मागचा भाग निमुळता होत गेलेला असून त्याचा अंडनिक्षेपक बनलेला असतो. त्याद्वारे मादी फुलांमध्ये अंडी घालते. कोशातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे तासाभरात नर-मादीचे मीलन होऊन त्यानंतर तासाभरात मादी अंडी घालायला सुरुवात करते. अंडी बहुधा सकाळच्या वेळेत घातली जातात. मादी एका वेळी ३०–१०० अंडी घालते. अंडी सुरुवातीला पिवळसर असून नंतर गर्द तपकिरी होतात. त्यांतून २–५ दिवसांत डिंभ (अळ्या) बाहेर पडतात. डिंभ ज्वारीचे तयार होत असलेले दाणे खाऊन जगतात. त्यामुळे कणसात दाणे तयार होत नाहीत. डिंभ दोन-तीन वेळा कात टाकतो आणि त्याची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढलेल्या डिंभाचा रंग गर्द केशरी असतो. दोन-तीन दिवसांत डिंभ कोशावस्थेत जातो. कोशावस्था ६–१० दिवसांची असते. मिज माशी या कोशातून सकाळी बाहेर पडते. मिज माशी २-३ दिवसांपेक्षा जास्त जगत नाही. तिची एक पिढी २–४ आठवड्यांत पूर्ण होते आणि एका ऋतूत त्यांच्या अनेक पिढ्या तयार होतात. मिज माशीचे आयुष्य २-३ दिवसांचे असले, तरी तिच्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होते. जेव्हा पिकाचा हंगाम नसतो, तेव्हा ही माशी सुप्तावस्थेत असते. दाणे काढलेले कणसाचे भाग, खळ्यातला भुसा, जॉनसन गवत यांमध्ये त्यांची सुप्तावस्था दिसून येते.
ज्वारीची पेरणी हंगामात एकाच वेळी न केल्यास मिज माशीचा उपद्रव अधिक होतो. दोन-तीन आठवड्यांच्या कालखंडामध्ये अधूनमधून पेरणी झाल्यास पीक तयार होण्याच्या वेळा टप्प्याटप्प्याने आल्याने माशीचा उपद्रव वाढतो. मिज माशीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका मोठ्या प्रदेशात ज्वारीची पेरणी एकाच वेळी करावी लागते. त्यामुळे पीक एकाच वेळी तयार होते. मादी एकाच दिवसात अंडी घालत असल्यामुळे पिकाच्या फुलोऱ्यावर नवीन माश्यांना अंडी घालायला पुरेसा वेळ नसतो. ज्वारीचे दाणे एकदा तयार झाले की मिज माशीची मादी अंडी घालू शकत नाही. त्यामुळे तिचा उपद्रव आटोक्यात येतो. नव्वद दिवसांत येणाऱ्या एसपीएच-८३७ किंवा वसंत-१ या संकरित ज्वारीच्या पिकांवर मिज माशीचा उपद्रव होत नाही. या ज्वारीला फुलोरा लवकर येतो. त्यामुळे मिज माशीच्या अंडी घालण्याच्या वेळेत व फुलोऱ्याच्या वेळेत अंतर पडते.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा ज्वारीच्या शेतातून फेरफटका मारल्यास मिज माशी फुलोऱ्यावर आलेल्या कणसांवर घिरट्या घालताना दिसते. मिज माशीने अंडी घातलेली असल्यास, कणसातील कोवळे दाणे बोटांनी दाबल्यावर त्यातून केशरी रंगाचा द्रव बाहेर पडतो. हा रंग दाण्यावर डिंभ चिरडल्यामुळे निर्माण होतो. अशा वेळी पिकांवर योग्य कीटकनाशके फवारतात. मिज माशीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्यास कणसे तयार झाल्यानंतर कार्बारिल हे कीटकनाशक फवारतात. ३-डी फवारल्यास मिज माशीचा प्रतिबंध होतो. तसेच मिज माशीच्या वाढीला प्रतिबंध घालण्यासाठी ज्वारीच्या शेतात वाढणारे जॉनसन गवत नावाचे तण उपटून टाकतात.