(पॉर्क्युपाइनफिश). अस्थिमत्स्य वर्गाच्या डायोडोंटिडी कुलात साळमाशांचा समावेश केला जातो. डायोडोंटिडी कुलात एकूण सात प्रजाती असून त्यांपैकी डायोडॉन आणि लोफोडायोडॉन प्रजातीतील माशांना ‘साळमासा’ म्हणतात. डायोडॉन प्रजातीत साळमाशाच्या पाच जाती, तर लोफोडायोडॉन प्रजातीत एकच जाती आढळते. भारतालगतच्या समुद्रात त्याच्या डायोडॉन हिस्ट्रिक्स आणि डायोडॉन होलोकँथस या दोन जाती बहुतकरून आढळतात.

साळमासा (डायोडॉन हिस्ट्रिक्स)

साळमाशाचे शरीर गोल असून शरीराचे डोके, धड, शेपूट असे तीन भाग असतात. मुख लहान असून दोन्ही जबड्यांवरील दात अग्र टोकाकडे एकत्र आल्यामुळे मुखाचा आकार चोचीसारखा दिसतो. डोक्यावर दोन मोठे डोळे असतात. शरीराची लांबी सु. १८ सेंमी. असून ती ५४ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग वरच्या बाजूस फिकट तपकिरी  असून खालच्या बाजूस पांढरट असतो. शरीरावर तपकिरी आणि निळ्या रंगाचे पट्टे अथवा ठिपके असतात. त्याच्या परांवरही असेच ठिपके असतात. साळमाशांच्या त्वचेवर खवले नसतात. शरीरावरील त्वचा हालणारी असून त्यावर अस्थिकंटक म्हणजेच हाडाचे काटे असतात आणि ते दोन प्रकारांचे असतात; पहिल्या प्रकारच्या अस्थिकंटकांना दोन मुळे असून ते हालणारे असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या काट्यांना तीन मुळे असून ते न हालणारे असतात. सामान्यपणे शरीरावर असलेल्या प्रत्येक ठिपक्यावर एक असे काटे असतात. काटे मुळाशी फुगीर असून शरीराच्या दोन्ही बाजूंकडे आणि वक्षपरांच्या मागे जास्त लांब असतात. या काट्यांमुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते. स्तनी वर्गाच्या साळींदर या प्राण्याच्या शरीरावर जसे काटे असतात, त्याप्रमाणे या माशाला काटे असतात. म्हणून या माशाला साळमासा असे नाव पडले आहे.

साळमासा (डायोडॉन होलोकँथस)

साळमासा मांसाहारी असून कवचधारी प्राणी, पोवळे इत्यादी तो खातो. शरीरातील पिशवीत तो हवा भरून घेतो, तेव्हा त्याचा आकार गोल बनतो, तसेच त्याचे आकारमानही वाढते आणि तो समुद्राच्या पाण्यावर उलटा तरंगतो. त्याच्या शरीरातील काही अवयवांमध्ये टेट्रोडोटॉक्झिन असल्याने या माशाचे मांस विषारी असते आणि ते खात नाहीत. काही देशांमध्ये त्याची वाळलेली कातडी शिरस्त्राण टोपी म्हणून वापरतात. ते दिव्यांसाठी आच्छादन टोपी म्हणूनही वापरतात. साळमाशाचे बंदिवासातील आयुर्मान कमीत कमी १० ते १५ वर्षे एवढे आहे.