प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती अन्य वस्तू किंवा व्यक्तीहून भिन्न असते; परंतु ती त्याच प्रकारच्या वस्तूंशी किंवा व्यक्तींशी काही बाबतीत ‘समान’ ही असते. व्यक्ती किंवा वस्तुविशेषांचा निर्देश विशेषनाम, दर्शक सर्वनाम अशा निर्देशपर पदांनी होतो, तर त्यांच्या ‘सामान्य’ स्वरूपाचे वर्णन सामान्यनाम, विशेषण, क्रियापद, भाववाचकनाम इ. वर्णनपर पदांनी होते. ‘सामान्या’च्या स्वरूपाविषयी तत्त्वज्ञानात विभिन्न उपपत्ती आढळतात.

भारतीय तत्त्वज्ञानात ‘सामान्य’ आणि ‘विशेष’ यांच्या स्वरूपाचा विचार प्रामुख्याने वैशेषिक दर्शनाने केला आहे. वैशेषिकांनी ‘सामान्य’ आणि ‘विशेष’ हे दोन स्वतंत्र पदार्थ मानले. ‘पदार्थ’ या पारिभाषिक संज्ञेचा अर्थ ‘पदस्य अर्थः’ म्हणजे ‘जे जे शब्दाने वाच्य आहे ते’ असा आहे. सामान्य ‘नित्यं, एकम्, अनेकानुगतम्’ असते. मानवव्यक्ती मर्त्य व अनेक आहेत, तर ‘मनुष्यत्व’ नित्य, एक आणि सर्व व्यक्तींत अनुस्यूत आहे. तसेच गोत्व हे सामान्य अनेक गायीत असते, ते तेच असते आणि गायी जन्मल्या अथवा मेल्या तरी त्यांच्याबरोबरच ते जन्मत व मरत नाही. सगळ्या अश्वांवर अश्वत्व हा धर्म राहतो म्हणून ते सामान्य. म्हणून जे अनेक ठिकाणी राहते पण एक असते आणि नित्य असते ते सामान्य होय. गोत्व, अश्वत्व, नीलत्व ही सामान्यांची उदाहरणे आहेत. वैशेषिकांनुसार गोत्व, नीलत्व हा सामान्य पदार्थ गाय, निळा, गमन या अनुक्रमे द्रव्य, गुण आणि कर्म या अन्य पदार्थांहून भिन्न आहे. सामान्यांच्या व्यापकत्वाच्या आधारे ‘पर’, ‘अपर’ आणि ‘परापर’ असे सामान्यांमध्ये तीन भेद केले गेले. उदा., ‘अस्तित्व’ हे ‘पर’, ‘घटत्व’ हे ‘अपर’ आणि ‘द्रव्यत्व’ हे घटत्वाच्या अपेक्षेने ‘पर’, तर अस्तित्वाच्या अपेक्षेने ‘अपर’ म्हणून ‘परापर’ सामान्य होय.

वैशेषिक दर्शनाने स्वीकारलेले सामान्याचे हे वास्तव व नित्य स्वरूप इतर अनेक दर्शनांनी थोड्याफार फरकाने स्वीकारलेले दिसते; पण चार्वाक व बौद्ध दर्शनाने ते नाकारले. विशेषतः बौद्ध दर्शनाने या सामान्यतत्त्वावर प्रखर टीका केली व सामान्य हे कल्पित मानले.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात सॉकेटीस, प्लेटो यांपासून ते विसाव्या शतकापर्यंत ‘सामान्या’ चा विचार चालूच राहिला. या सुमारे अडीच हजार वर्षांच्या इतिहासात खालील पाच प्रमुख उपपत्ती प्रतिपादन केल्या गेल्या :

  • वास्तववाद (Realism) : सॉकेटीसने इंद्रियग्राह्य विशेषे आणि बुद्धिगम्य सामान्य संकल्पना यांत भेद केला. प्लेटोने ‘सामान्ये’ अतींद्रिय नित्य सद्वस्तू असल्याचे मानले. त्यासाठी त्याने ‘आयडिया’ अशी पारिभाषिक संज्ञा वापरली. नित्य, अव्ययी, दिक्कालातीत अतींद्रिय बुद्धिगम्य सामान्यांचे विश्व आणि अनित्य, बदलणाऱ्या, दिक्कालांतर्गत, इंद्रियगम्य विशेषांचे विश्व अशी दोन स्वतंत्र विश्वे प्लेटोने स्वीकारली. ॲरिस्टॉटलने प्लेटोप्रणीत सामान्यांच्या दिक्कालातीत स्वतंत्र विश्वाचा आणि दोन स्वतंत्र विश्वांचा सिद्धांत नाकारला. नित्य, अव्ययी, एक सामान्य अनित्य, अनेक विशेषांतर्गत असते, असे त्याने मानले. त्याच्या मते सामान्ये बुद्धिगम्य, ज्ञातृनिरपेक्ष वस्तुतत्त्वेच होती, म्हणून प्लेटो आणि ॲरिस्टॉटल दोघेही वास्तववादी आहेत; परंतु त्यांच्या वास्तववादाने दोन वेगळी रूपे धारण केली.
  • संकल्पनावाद (Conceptualism) : सामान्यांचे अतींद्रिय सत्ताशास्त्रीय स्वरूप नाकारून सामान्ये तार्किक अमूर्त संकल्पना आहेत, असे संकल्पनावाद मानतो. आपण अनेक विशेषे पाहतो-अनुभवतो आणि त्यांच्यातील साम्य-भेदाच्या आधारे त्यांचे तार्किक वर्गीकरण करून त्यांना सामान्य संकल्पनेखाली आणतो. हे साम्य-भेद वस्तुनिष्ठ असले, तरी वस्तूंचे वर्गीकरण आणि त्यासाठी उपयोजिलेल्या संकल्पना ही ज्ञात्यांनी ज्ञानाची आणि ज्ञेयवस्तूंची बौद्धिक व्यवस्था लावण्यासाठी उपयोजिलेली ‘तार्किक साधने’ असतात. तार्किक संकल्पना मानवनिर्मित आणि ज्ञातृसापेक्ष असल्या, तरी त्या व्यक्तिनिष्ठ व मानसिक नसतात. त्यांना व्यक्तिनिष्ठ आणि मानसिक मानल्याने व्यक्तिनिष्ठतेचा आणि मानसिकीकरणाचा (Subjectivism and Psychologism) असे दोन तार्किक दोष घडतात.
  • नाममात्रतावाद (Nominalism) : नाममात्रतावादासाठी व्यक्तिमात्रतावाद, वस्तुमात्रतावाद असेही पर्यायी शब्द आहेत. सामान्यांचे दिक्कालातीत सत्ताशास्त्रीय स्वरूप आणि अमूर्त तर्कशास्त्रीय स्वरूप नाकारून त्यांचे स्वरूप भाषिक असल्याचे नाममात्रतावाद मानतो. मध्ययुगीन स्कोलॅस्टिक तत्त्ववेत्ता विल्यम ऑफ ऑकम (१३००–५०) तसेच थॉमस हॉब्स (१५८८–१६७९) हे नाममात्रतावादाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते ‘सामान्ये’ म्हणजे अनेक वस्तू किंवा व्यक्तिविशेषांना (Particulars) लावले जाणारे भाषिक संकेत आहेत. सामान्यांना स्वतंत्र सत्ता किंवा अस्तित्व नसते. जे जे अस्तित्वात असते, ते व्यक्तिरूप किंवा विशेष असते. या अर्थाने नाममात्रतावादाला व्यक्तिमात्रतावाद किंवा वस्तुमात्रतावादही म्हणता येते. नाममात्रतावादाच्या कडव्या मांडणीनुसार ज्या व्यक्तिविशेषांना एकाच सामान्यनामाने किंवा संकेताने संबोधिले जाते, त्या सर्वांमध्ये कोणताही एक समानधर्म किंवा समानतत्त्व नसते. एकाच पदाने संबोधिले जाणे किंवा त्या सर्वांसाठी एकच संकेत वापरला जाणे, एवढेच त्या सर्वांत समान असते. रूढीने दिलेली संज्ञा किंवा संकेत किंवा नाम एवढेच त्या सर्वांत समान आहे, असे प्रतिपादन करीत असल्यामुळे या उपपत्तीस नाममात्रतावाद असेही म्हणतात.
  • सादृश्यवाद (Resemblance Theory) : काही व्यक्तिविशेषांसाठी एकच संकेत वापरला जातो, ही रूढी केवळ मानवी लहर नसून त्या व्यक्तिविशेषांमधील सादृश्य (Resemblance) हा त्याला तार्किक आधार आहे, असे सादृश्यवादाचे प्रतिपादन आहे. जॉर्ज बर्क्ली (१६८५–१७५३) आणि डेव्हिड ह्यूम (१७११–७६) यांनी अमूर्त सामान्यांचे सत्ताशास्त्रीय आणि तर्कशास्त्रीय स्वरूप नाकारले. त्यांच्या मते मानवी मन अमूर्त सामान्य कल्पना करू शकत नाही. ते गुणधर्म किंवा संख्या यांची विशिष्ट कल्पनाच करू शकते. उदा., रंगाची किंवा संख्येची कल्पना करताना कोणतातरी विशिष्ट रंग किंवा विशिष्ट आकडाच मनापुढे मनःचक्षुसमोर येतो; परंतु तो रंग अथवा आकडा सर्व रंगांचा किंवा संख्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो, तेव्हा तो तत्सदृश अन्य रंग किंवा संख्या विशेषांचे स्मरण करून देण्याचे आणखी एक कार्य करतो. अशा प्रकारे सादृश्य हा सदृश वस्तू किंवा गुणधर्म किंवा संख्या यांना एकच संकेत वापरण्याचा तार्किक आधार असतो, असे सादृश्यवादाचे प्रतिपादन आहे.
  • कुलसादृश्यवाद (Family Resemblance Theory) : लूटव्हिख योझेफ योहान व्हिट्‌गेन्श्टाइन (१८८९–१९५१) आपल्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स  या ग्रंथात खेळाचे उदाहरण घेऊन सर्व खेळांत सामान्य अथवा सादृश्य असते म्हणून ‘खेळ’ ही संज्ञा सर्व खेळांना वापरली जाते, हे मत तपासून पाहण्याचे आवाहन करतो. कार्ड, बोर्ड, मैदानी अशा विविध प्रकारच्या खेळांत कसब, डावपेच, मनोरंजन इ. कोणतीही गोष्ट समान नाही किंवा त्यात सादृश्य नाही, हे विविध उदाहरणांच्या आधारे दाखवून देतो. ज्याप्रमाणे एका कुटुंबातील व्यक्तींत कोणताच एक समान धागा किंवा सादृश्य नसताना काहींचा तोंडवळा, काहींचा शारीरिक बांधा, अन्य काहींच्या डोळ्यांचा रंग इत्यादींच्या आधारे ते एकाच कुटुंबातील असावेत, असा अंदाज बांधतो; तसेच सामान्य नामाने निर्देशित होणाऱ्या एकाच वर्गातील सदस्यांमध्येही ‘कुलसादृश्य’ (Family Resemblance) असते आणि तेवढे त्या सर्व सदस्यांना एकाच वर्गांत समाविष्ट करण्यासाठी पुरेसे असते, असे त्याचे प्रतिपादन आहे. याला ‘कुलसादृश्यवाद’ म्हणतात.

या सामान्यविषयक प्रधान उपपत्ती पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात आढळतात.

संदर्भ :