जनार्दनपंत पेशवे : ( १० जुलै १७३५–२१ सप्टेंबर १७४९ ). मराठेशाहीतील श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव (१७००–१७४०) यांचे पुत्र. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. बाजीरावांना काशीबाई या पत्नीपासून नानासाहेब, रामचंद्र, जनार्दन आणि रघुनाथ अशी चार मुले झाली. त्यांपैकी रामचंद्र हा वयाच्या दहाव्या वर्षी वारला (१७३३), तर जनार्दनपंत यांनाही १४ वर्षांचे आयुष्य लाभले. नानासाहेब, रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले.
जनार्दनपंतांची मराठी कागदपत्रांतून फारशी माहिती मिळत नाही; तथापि प्रभाकर शाहिराच्या एका पोवाड्यात त्यांचे वर्णन आढळते. नानासाहेब हे जनार्दनपंतांपेक्षा सु. १४-१५ वर्षांनी मोठे होते. त्यांनी जनार्दनपंतांचा आपल्या पित्याप्रमाणे सांभाळ केला. जनार्दनपंतांच्या जन्माविषयी आणि बारशाविषयी काही टिपणे पेशवे रोजनिशीत आढळून येतात. यात बारशाच्या दिवशी दोन सोन्याच्या मोहरा मोडून त्याच्या बिंदल्या करून जनार्दनाच्या हातात घातल्या व त्यास २८ रुपये खर्च आला, अशी नोंद आढळून येते. जनार्दनपंतांची मुंज २६ मार्च १७४० रोजी झाली. यावेळी बाजीराव उत्तरेच्या स्वारीवर होते. काशीबाई आणि इतर कुटुंबियांच्या उपस्थितीत ही मुंज करण्यात आली. मुंज झाल्यावर जनार्दनपंत हे मातोश्री काशीबाई यांच्यासोबत बाजीरावांकडे गेले. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांचे नर्मदाकाठी रावेर येथे निधन झाले. तेव्हा बाजीरावांचे सर्व क्रियाकर्म हे लहानग्या जनार्दनपंतांनी केले. पेशवे दप्तरात याबाबत उल्लेख आहे. पुढे जनार्दनपंतांना देवीचा आजार होऊन गेल्याची नोंद आढळते (१७४१).
जनार्दनपंतांचे लग्न सावकार अंतोबा भिडे यांच्या मुलीशी झाले (२० एप्रिल १७४४). मुलीचे नाव लग्नानंतर सगुणाबाई असे ठेवण्यात आले. नानासाहेब पेशव्यांवर १.५ कोटी रुपयांचे कर्ज होते, त्यांतील ४५ लाख रुपये कर्ज हे फक्त भिडे यांचे होते. या लग्नाबाबत फारशी माहिती मिळत नाही; परंतु पेशवे दप्तरात या लग्नाचा उल्लेख करणारे सदाशिवराव भाऊ यांनी लिहिलेले एक पत्र आहे.
नानासाहेबांनी रघुनाथराव व जनार्दनपंत यांच्या शिक्षणासाठी गुरुजी नेमून चोख व्यवस्था केली होती. तसेच त्यांना युद्धशास्त्राचे शिक्षण मिळेल, याकडे लक्ष पुरविले होते. क्रीडाप्रकारातही नैपुण्य यावे म्हणून नानासाहेबांनी जनार्दनपंत यांच्यासाठी विशेष मल्लांची तैनात केली होती. थोरले बाजीराव बहुतांश वेळा स्वारीवरच असल्याने नानासाहेबांसोबत जनार्दनपंतांना सातारा दरबारी जाण्याचा व प्रत्यक्ष राज्यकारभार जवळून पाहण्याचा अनुभव मिळाला. छ. शाहू महाराज आजारी असताना नानासाहेबांसोबत जनार्दनपंतही सातारा येथे गेले होते (१७४९). पुढे जनार्दनपंत यांना ज्वराची बाधा झाली व त्यातच त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- केळकर, य. न. जनार्दन पेशवे, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, वर्ष ४३, अंक १-४, पुणे, १९६५.
- राजवाडे, वि. का. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड : ८, कोल्हापूर ग्रंथमाला प्रकाशन, कोल्हापूर, १९०३.
- सरदेसाई, गो. स. पेशवे दप्तर, खंड : १८, शासकीय मुद्रणालय, मुंबई, १९३२.
- सरदेसाई, गो. स. पेशवे दप्तर, खंड : २२, शासकीय मुद्रणालय, मुंबई, १९३२.
समीक्षक : शिवराम कार्लेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.