भारताच्या हरयाणा राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि एक औद्योगिक शहर. लोकसंख्या १४,१४,०५० (२०११). हे राज्याच्या आग्नेय भागात, दिल्लीच्या साधारण दक्षिणेस सुमारे ३५ किमी. वर वसलेले आहे. मोगल सम्राट जहांगीर याचा खजिनदार शेख फरीद याने दिल्ली-आग्रा यांदरम्यानच्या ग्रँड ट्रंक रोडच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे शहर वसविले (इ. स. १६०७). त्याने येथे किल्ला, मशीद व तलाव बांधला. इ. स. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. हिंदुस्थानच्या फाळणीवेळी पाकिस्तान व वायव्य सरहद्दीवरून येणाऱ्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी फरीदाबादची निवड करण्यात आली होती.

फरीदाबाद हे शहर यमुना नदीपासून पश्चिमेस काही अंतरावर असून त्याच्या जवळून आग्रा कालवा जातो. आग्रा कालवा आणि यमुना नदी यांदरम्यान नव्याने विकसित झालेल्या निवासी आणि औद्योगिक भागाला ‘बृहत फरीदाबाद’ असे म्हटले जाते. शहराच्या पायाभूत मूलभूत सुविधांमध्ये पुष्कळ सुधारणा झाली असून याचे नवे शहर व जुने शहर असे दोन भाग केले जातात. नवीन भागात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, शासकीय कार्यालये आणि जुन्या भागात उद्योगधंदे आढळतात. येथील औद्योगिक विकासास इ. स. १९५० पासून सुरुवात झाली. फरीदाबादमध्ये विविध प्रकारचे कारखाने स्थापन झाले असून त्याला हरयाणाची औद्योगिक राजधानी मानले जाते. ट्रॅक्टर, मोटरसायकल, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, यंत्राचे सुटे भाग, प्रशीतक, पादत्राणे, कापड, पोलादी नळ, रसायने, औषधे इत्यादींची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या येथे आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने एस्कॉर्ट्स लि., आयचर ट्रॅक्टर लि., हॅवेल्स इंडिया लि., जेसीबी इं. लि., लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, यामा मोटार प्रा. लि., व्हर्लपूल इं. लि., ओरिएन्ट पंखानिर्मिती कं., बाटा इं. लि., एबीबी ग्रुप लि., गुडइयर इं. लि., इंडियन ऑइल या प्रमुख कंपन्या आहेत.

फरीदाबाद शहरास व्यापारी दृष्ट्याही महत्त्व आहे. हीना मेंदीचे उत्पादन आणि निर्यातीत हे शहर अग्रेसर आहे. शहराचा परिसर सुपीक असून तो शेती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गहू, साखर आणि कापूस यांची ही महत्त्वाची स्थानिक बाजारपेठ येथे आहे. शैक्षणिक दृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे असून वैद्यक, विज्ञान व तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट (हॉटेल व्यवस्थापनशास्त्र), राष्ट्रीय विद्युतशक्ती प्रशिक्षण संस्था, केंद्र शासनाची महसूल विभागाची प्रशिक्षण संस्था, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि अमली पदार्थविषयक राष्ट्रीय अकादमी, वित्तीय व्यवस्थापनाची राष्ट्रीय संस्था इत्यादी विद्याशाखांची महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षण व प्रशिक्षण संस्था या शहरात आहेत. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभागाचे कार्यालय येथे आहे. केंद्र शासनाची अनेक प्रधान कार्यालये येथे आहेत. उदा., राष्ट्रीय जलविद्युतशक्ती महामंडळ (एन.एच.पी.सी.). भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभागाचे कार्यालय येथे आहे.

सिटी मेयर्स फाउन्डेशनच्या पाहणीनुसार वेगाने भरभराटीस येणाऱ्या शहरांत हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. रुंद रस्ते, गगनचुंबी इमारती, विविध मॉल्स, शैक्षणिक संस्था, आरोग्य आणि व्यापारी केंद्रे, औद्योगिक (सेक्टर क्रमांक ६६ ते ७४) आणि निवासी (सेक्टर क्र. ७५ ते ८९) असे वेगवेगळे सेक्टर ही या शहराची वैशिष्ट्ये आहेत. केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ या अभियानांतर्गत निवडलेल्या शहरांमध्ये फरीदाबादचा समावेश आहे (२०१६). जागतिक आरोग्य संघटनेने फरीदाबाद म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचे म्हटले होते (२०१८). २०२० च्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या पाहणीमध्ये मात्र स्वच्छ शहरांमध्ये फरीदाबादचा देशात दहावा क्रमांक आला होता. हे शहर दळणवळणाच्या दृष्टीनेही हे शहर महत्त्वाचे आहे. येथे मेट्रो मार्गाची सोय आहे. रस्त्यांनी ते दिल्ली, गुरगाव शहरांशी तसेच उत्तर प्रदेशातील मथुरा आणि गौतम बुद्ध नगर शहरांशी जोडलेले आहे. दिल्ली-मुंबई हा लोहमार्ग शहराजवळून जातो. शहरात तसेच दिल्ली-फरीदाबाद यांदरम्यान मेट्रो मार्गांची सुविधा आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ३५ किमी. वर आहे. १९९१ ते २०११ या कालावधीत शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होऊन ती जवळजवळ दुप्पट झाली.

फरीदाबाद शहरात क्रिकेट खेळाचे मोठे मैदान असून येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात. शहरातील व याच्या नजीकची राजा नाहर सिंह राजवाडा, इस्कॉन मंदिर, साईबाबा मंदिर, हनुमान मंदिर, बाबा फरीद कबर, टाउन पार्कसारखी अनेक उद्याने, बदखल तलाव, सुरजकुंड पर्यटन संकुल, आंतरराष्ट्रीय कारागिरी जत्रा इत्यदी प्रवाशांची आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी