संगणकाने प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकलेला आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, समाज सेवा, कायदा, कला, संगीत, चित्रकला, आरोग्यसेवा इ. सर्व व्यवसायामध्ये संगणकाने आपला प्रभाव उमटविलेला आहे. परिचर्या व्यवसायातही संगणकाने परिवर्तन आणले. निदानीय (Clinical) आणि तांत्रिक प्रगतीमुळे परिचर्या व्यवसायात परिचर्या माहिती तंत्रज्ञान (Nursing Informatics) नावाचे नवीन क्षेत्र उदयास आले. परिचर्येसाठी विशिष्ट परिचर्या क्षेत्रात संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.

संगणकाची परिचर्या व्यवसायातील विकसित  वाटचाल : ई. स. १९६० मध्ये आरोग्यसेवा क्षेत्रात संगणकाचा वापर करण्यास सुरुवात झाली. ई.स. १९७० मध्ये परिचारिकांनी रुग्णालय माहिती प्रणाली (Hospital Information System) विकसित करण्यात मदत केली. सुरुवातीला रुग्णालय व्यवस्थापनातच या प्रणालीचा वापर होत असे. ई.स. १९८० मध्ये आरोग्यसेवा अंतर्गत संगणक हा महत्त्वाचा भाग बनला.

संगणक व्याख्या : संगणक हे सांकेतिक स्वरूपातील माहितीवर संस्करण करणारे एक इलेक्ट्रॉनीय यंत्र असून त्याचा जास्तीत जास्त उपयोग शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या कार्यासाठी  केला जातो. यात चिन्हांवर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व त्यावर संस्करण करणे आणि निकाल तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पायऱ्या पायऱ्यांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात.

परिचर्या क्षेत्रात संगणकाची उपयुक्तता

 शिक्षण क्षेत्र : संगणकाने शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भर टाकली.

अ) विद्यार्थ्यांना सीडीच्या माध्यमातून तसेच सादरीकरणाद्वारे एखाद्या अवघड विषयाचे सखोल ज्ञान दिले जाते. परिचर्येचे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना विविध आजार किंवा समस्यांशी निगडीत रुग्णावर शुश्रूषा कशी केली जाते यासंदर्भात विविध प्रकारच्या चित्रफितीद्वारे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विध्यार्थाना कमी वेळात अधिक ज्ञानाची माहिती मिळते.

आ) महाविद्यालयातील प्रशासकीय काम संगणकावर केले जात आहे. उदा. विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बनवणे, विद्यार्थ्यांचे गुण प्रकाशित करणे, हिशोब करणे, हॉल तिकीट तयार करणे, इत्यादी कामे केल्या जातात. महाविद्यालयातील कार्यालयाचे, ग्रंथालयाचे काम संगणकावर केले जातात.

इ) विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, परीक्षा घेणे, परीक्षेचा निकाल पाहणे ही कामे संगणकावर केली जातात. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्जसुद्धा  संगणकावर भरले जातात.

आरोग्य सेवा किंवा रुग्णालय :

अ) रुग्णाचा प्रवेश, घरी सोडणे, रुग्णांना हलविणे (ADT; Admission, Discharge, Transfer) : संगणकाच्या मदतीने परिचारिका अगदी कमी वेळेत ADT चे काम करू शकतात. रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर प्रथम त्यांची वैयक्तिक माहितीची नोंद केली जाते. रुग्णाला घरी सोडण्यात येणार असेल किंवा दुसऱ्या रुग्णालयात भरती करायचे असेल तर त्या रुग्णाचे नाव टाकले किंवा खाट क्रमांक टाकला की संपूर्ण माहिती संगणकामध्ये परिचारिकेला मिळते. जसे रुग्णालयात राहण्याचा कालावधी, विभाग, त्यांचा आहार, औषधे ही सर्व माहिती दिसते.

आ) याव्यतिरिक्त आरोग्य निगा पद्धतीमधील संगणकाचे उपयोग खालीलप्रमाणे  आहेत :

  • परिचारिकेची कार्यक्षमता वाढल्यामुळे रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान करणे त्यांना शक्य झाले आहे.
  • कॅट स्कॅन वाहिनीदर्शन (C.A.T. scan Angiography) वापरून निदान करण्याची संगणकीय पद्धती, शस्त्रक्रियेपूर्वी छेद परीक्षा, संगणकाच्या मदतीने लेसर किरणांनी करावयाच्या शस्त्रक्रिया (डोळे, मूत्रपिंड खडा, मेंदू इ. शस्त्रक्रिया) अशा प्रक्रियेत प्रशिक्षित परिचारिका भाग घेते.
  • अवैद्यकीय कार्यासाठी जसे नोंद, बिल बनविणे, हिशेब ठेवणे वैगरे कामासाठी संगणकाचा वापर होतो.
  • अभ्यास विषयक नोंद, दृश्यपट्टी, सादरीकरण कागदपत्र, व्याख्यान नोंदी, हजेरी इ. चा संग्रह करणे सोपे जाते.
  • अतिविशिष्ट रुग्ण विभागात संगणकीय विभाग कार्यरत असून तयार परिचारिका क्लिष्ट आजार व त्याची रुग्ण शुश्रूषा यासाठी त्वरीत संदर्भ म्हणून वापर करतात. ज्याचा उच्च, विशिष्ट परिचर्या शिक्षण [M.Sc. Nursing and Ph.d. Nursing] यासाठी उपयोग होतो.

संशोधन क्षेत्र : संशोधकास आरोग्य सेवेतील गृहीत गोष्टी समजण्यासाठी पृथ:करणाची गरज आहे आणि महत्त्वाच्या निरीक्षणाचा अहवाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गृहीत गोष्टींचे पृथ करण करावे लागते. संगणकामुळे हे काम अगदी सोपे झाले आहे.

संदर्भ :

  • Shebeer P. Basheer; S. Yaseen Khan, A consise text book of Advanced Nursing Practice, 1st edition. 2021.
  • सामंत, कुसुम, शुश्रूषा संशोधन,  प्रथमावृत्ती, २००९.

समीक्षक : सरोज उपासनी