झारखंड पक्ष : झारखंड पक्षाची स्थापना १९५० मध्ये झाली. तथापि पक्षाच्या निर्मितीची प्रक्रिया तीस वर्षे अगोदर अस्तित्वात आलेल्या ‘छोटा नागपूर उन्नती समाज’ या संघटनेपासून सुरू झाली होती. १९३८ मध्ये त्या संघटनेने ‘आदिवासी महासभा’ असे नवे रूप धारण केले. आदिवासी महासभेने १९३९ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आणि १९४६ मध्ये कायदेमंडळाच्या निवडणुकांत भाग घेतला. १९५० पर्यंत संघटनेची उद्दिष्टे आणि कार्यक्षेत्र आदिवासी समाजापुरतेच मर्यादत होते. परंतु १९५० मध्ये पक्षाचे सभासदत्व बिगर आदिवासींनाही खुले करण्यात आले व पक्षाचे नामांतर ‘झारखंड पक्ष’ असे झाले. बिहारमधील खाणक्षेत्रे, ओरिसा आणि मध्य प्रदेश यांचा काही भाग, या सर्वांचे मिळून एक वेगळे घटक राज्य (झारखंड) निर्मिण्याचे उद्दिष्ट पक्षाने जाहीर केले. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) झारखंड पक्षास बिहारमध्ये उल्लेखनीय यश मिळाले. राज्य पुनर्रचना मंडळाने ‘झारखंड’ निर्मितीची मागणी फेटाळली. त्यानंतरही पाच-सहा वर्षे पक्षाने ‘झारखंड’ निर्मितीचा आग्रह चालू ठेवला. तथापि पक्षाचा राजकीय प्रभाव कमी होत गेला. १९६३ मध्ये  ‘झारखंड पक्ष’ काँग्रेसमध्ये विलीन झाला. त्यानंतर दोन वर्षांनी पूर्वाश्रमींच्या झारखंड कार्यकर्त्यांचा मोठा गट जयपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून बाहेर पडला. या गटातही त्यानंतर दोन वेळा फूट पडली. १९७२ मध्ये पूर्णचंद्र बरुआ यांनी ‘झारखंड’ राज्य पक्ष स्थापून पूर्वीच्या झारखंड पक्षाचे पुनरुज्जीवन केले.

संदर्भ :

  • Misra, B. B., The Indian Political Parties : An Historical Analysis of Political Behaviour upto 1947, Delhi, 1976.