भारतीय क्रांती दल : भारतातील राजकीय पक्ष. काँग्रेस पक्षातील गटबाजीने १९६६ च्या सुमारास उग्र स्वरूप धारण केले. देशभर विविध राज्यांमध्ये फुटीरगटांनी पर्यायी काँग्रेस पक्ष स्थापन केले. सप्टेंबर १९६६ मध्ये हुमायून कबीर यांनी जन-काँग्रेस पक्षाची स्थापना करून ही प्रक्रिया सुरू केली. त्यानंतरच्या दोन वर्षात हरेकृष्ण मेहताब (ओरिसा), महामायाप्रसाद सिन्हा (बिहार), तखतमल जैन (मध्य प्रदेश), अजय मुखर्जी (पश्चिम बंगाल), कुंभाराम आर्य (राजस्थान), चरणसिंग (उत्तर प्रदेश), नाईक निंबाळकर (महाराष्ट्र) इ. बंडखोर काँग्रेस नेत्यांनी आपापल्या प्रभावक्षेत्रांत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वारसा सांगणारे ; परंतु संघटनात्मक दृष्ट्या अलग असे पक्ष स्थापन केले. या सर्व पक्षांना एकत्र गुंफून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाला पर्यायी पक्ष म्हणून भारतीय क्रांती दल या नव्या पक्षाची निर्मिती इंदूर येथे करण्यात आली (१०−१२ नोव्हेंबर १९६७). अहिंसक मार्गाने सामाजिक न्यायाची प्रस्थापना, भ्रष्टाचार निर्मूलन, कार्यक्षम प्रशासन, रोजगार निर्मिती इ. उद्दिष्टे पक्षाने जाहीर केली. तथापि वर्षभरातच बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पक्षात फाटाफूट झाली. आसाम, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इ. राज्यांमध्ये पक्षास मुळातच पाठिंबा मिळू शकला नाही. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका (१९७१) पक्षाने लढविल्या; परंतु त्यांत त्यास समाधानकारक यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर डिसेंबर १९७१ मध्ये पक्षाच्या बिहार शाखेचे (निजलिंगप्पा गट) काँग्रेसमध्ये सामीलीकरण झाले. पक्षाच्या राजस्थान शाखेने जानेवारी १९७२ मध्ये तोच निर्णय घेतला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही पक्षविसर्जनास अनुकूल मत होते; तथापि पक्षाचा सर्वांत मोठा प्रभाव असलेल्या उत्तर प्रदेशात पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यात आले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकांत भारतीय क्रांती दलाने उत्तर प्रदेशात काँग्रेस (निजलिंगप्पा गट) या विरोधी पक्षाखालोखाल यश मिळविले. त्यावेळी भारतीय क्रांती दलाचे राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व नाममात्रच राहिले होते. पक्षाचे कार्यक्षेत्र आणि प्रभाव उत्तर प्रदेशापुरताच मर्यादत झाला. चौधरी चरणसिंगांचे लोकप्रिय व्यक्तीमत्व हे या प्रभावामागील एक प्रमुख कारण होते. १९ ऑगस्ट १९७४ रोजी भारतीय क्रांती दल आणि इतर सहा विरोधी पक्ष (स्वतंत्र, उत्कल काँग्रेस, संयुक्त सोशलिस्ट पक्ष−राजनारायण गट, राष्ट्रीय लोकतांत्रिक संघ, किसान−मजदूर पार्टी, खेतीबारी जमीनदार युनियन) यांचे दिल्ली येथे एकीकरण होऊन भारतीय लोकदल हा नवा पक्ष अस्तित्वात आला. या पक्षाचे पहिले अध्यक्ष चौधरी चरणसिंग हे होते.

संदर्भ :

  • Sadasivan, S. N., Party and Democracy in India, New Delhi, 1977.