द्विधृवी पक्षव्यवस्था : दोन पक्षांमध्ये व दोन आघाड्यांमध्ये सत्तास्पर्धा असे द्विधृवी पक्षव्यवस्थेचे दोन उपप्रकार भारतात दिसतात. अनेक पक्ष असले तरी दोन प्रमुख पक्ष प्रतिस्पर्धी असतात. ते जवळजवळ सर्व जागांसाठी एकमेकाविरुद्ध स्पर्धा करतात. थोडया जागा सोडून बाकी सर्व जागा एकमेकात विभागून घेतात. दोन पक्ष किंवा आघाडयांमधील मतांचे एकत्रिकरणाचे चित्र असे दिसते की, दोन्ही पक्ष किंवा आघाडया एकूण मतदानापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के मते मिळवतात. याचे गैर-काँग्रेसवाद हे एक उदाहरण आहे. तर दुसरे उदाहरण राज्यांच्या राजकारणात १९८० पासून दिसू लागले आहे. १९८० पासून केरळमध्ये युडीएफ आणि एलडीएफ या दोन्ही आघाडया राज्यातील प्रत्येक निवडणूकीत मतदारांना व्यवस्थीत द्विधृवी पर्याय देतात. तसेच त्यांचा वाटा सुमारे नव्वद टक्के एकमेकांत वाटून घेतात. भारतामध्ये मध्यप्रदेश आणि दिल्ली येथे द्विपक्षीय व्यवस्था १९८० च्या अगोदर होती. डुर्वेगर हे द्विपक्षीय व्यवस्थेचे सूत्र मांडत होते. त्यांचे हे सुत्र १९८० अगोदर सुस्पष्टपणे दिसत नाही. मात्र १९८०च्या दशकांत सरळ द्विपक्षीय व्यवस्था आघाडी व्यवस्थांमधील द्विधृवी स्पर्धा हे वर्गीकरण प्रमुख बनले होते (नोडल कॅटेगरी). यादव-पळशीकरांच्या मते द्विधृवी स्पर्धा घडली तेव्हा ती परस्परसाठीची व्यवस्था होती. काँग्रेस खेरीज इतर पक्ष राज्यांमध्ये जलद गतीने विस्तारले. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश (भाजप), कर्नाटकात जनता दल व आंध्र प्रदेशात टीडीपी यांच्या विस्ताराच्या लक्षणामुळे द्विधृवी स्पर्धा टिकून राहली.

काँग्रेस व्यवस्थेच्या खेरीज भारतातील काही राज्यात द्विपक्षपद्धती देखील उदयास आली होती. १९८३ ते २००४ या काळात आंध्रप्रदेशात द्विपक्ष पद्धतीचा टप्पा होता. १९८० च्या दशकात कर्नाटकातील पक्षव्यवस्था द्विधृवीय राहली. परंतु भाजपच्या उदयानंतर कर्नाटकातील पक्षव्यवस्था बहुध्रुवीय झाली (तिरंगी स्पर्धा). महाराष्ट्रात १९९० पासून बहुध्रुवी पक्ष स्पर्धा असूनही मुख्य स्पर्धा द्विधृवीय झाली (भाजप-शिवसेना युती व काँग्रेस परिवार), २०१४ मध्ये पक्षस्पर्धा बदलली आणि बहुधृवीय राजकीय पक्षपद्धती उदयाला आली. द्विधृवी अधिक स्पर्धा हा एक पक्ष पद्धतीचा प्रकार आहे. यात बहुपक्षीय स्पर्धा असते. या स्पर्धेत मुख्य स्पर्धक दोन पक्ष आणि दुय्यम भूमिका निभावणारा एक पक्ष असतो. या स्पर्धेचे उदाहरण म्हणजे पंजाब राज्य आहे. पंजाबमध्ये अकाली दल व काँग्रेस यांच्यात मुख्य स्पर्धा होती. तर भाजपची येथे दुय्यम भूमिका राहिली आहे. १९८० नंतर काँग्रेसने तमिळनाडूत दुय्यम पक्षाची भूमिका निभावली होती. कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये भाजप दुय्यम भूमिकेत होता.

संदर्भ :

  • पवार, प्रकाश, समकालीन राजकीय चळवळी, डायमंड पब्लिकेशन्स, २०११.