मणिपूर पीपल्स पार्टी : १९६८-६९ मध्ये मणिपूरच्या स्वायत्ततेचा प्रश्न मणिपूर प्रदेश काँग्रेसपुढे गंभीर स्वरूप धारण करून उभा राहिला होता. काँग्रेस अंतर्गत एक गट मणिपूरच्या संपूर्ण अंतर्गत स्वतंत्रतेचा विचार आणि प्रादेशिक अस्मितेवर भर देऊन काँग्रेसबाहेर पडला आणि मणिपूर पीपल्स पार्टीची स्थापना केली. एस्. तोम्बी सिंग आणि महंमद अलीमुद्दीन या दोन नेत्यांनी हा पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. मणिपूरला संपूर्ण प्रादेशिक स्वायत्तता आणि काँग्रेसला विरोध, असे ह्या पक्षाचे ध्येय होते. मात्र काँग्रेस नेते कोइराँग आणि तोम्बी सिंगयांच्यातील वैयक्तिक मतभेद असेच स्वरूप या विरोधात दिसून येते. १९७१ साली पक्षाने आपल्या मागण्यांसाठी आक्रमक धोरण स्वीकारले. १९७१ च्या निवडणुकीत पक्षाला ५८ पैकी ३३ जागा मिळून बहुमत मिळाले होते. मणिपूरला राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी १९७१ साली त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभावर बहिष्कार टाकला होता. २१ जानेवारी १९७२ रोजी मणिपूरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे या पक्षाला नंतर विशेष अस्तित्व राहिले नाही. राज्यात प्रबळ विरोधी पक्ष बनावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. १४ नोव्हेंबर १९८३ रोजी मणिपूर पीपल्स पार्टी आणि पीपल्स लेजिस्लेचर पार्टी यांचे विलीनीकरण झाले.

संदर्भ : Bhuyan, Dasarati, Role of Regional Political Parties in India, Mittal Publication, 2007.