केरळ काँग्रेस : केरळ राज्यातील एक प्रादेशिक पक्ष. १९६० च्या दशकात तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री आर्. शंकर व पी.टी. चाको यांच्या व्यक्तीगत संघर्षामुळे केरळ मंत्रिमंडळात अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले. समझोत्याचे अनेक प्रयत्न करूनही संघर्षाचे वातावरण राहिल्याने काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांनी चाको यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा सल्ला मुख्यमंत्री शंकर यांना दिला. काही आठवड्यांतच चाको यांचे अकस्मिक निधन झाले. चाको यांचे विधिमंडळातील पंधरा अनुयायी के.एम्. जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली ८ सप्टेंबर १९६४ रोजी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी कोट्टयम् (केरळ) येथे आपल्या समर्थकांची एक परिषद घेऊन ९ ऑक्टोबर १९६४ रोजी केरळ काँग्रेसची स्थापना केली. पक्षाध्यक्ष जॉर्ज यांनी केरळमधील भ्रष्टाचारी सरकार उलथून टाकणे आणि लोकशाही समाजवादाची स्थापना करणे, हे आपल्या पक्षाचे ध्येय जाहीर केले आणि ‘केरळ काँग्रेस’ हाच खरा आणि भ्रष्टाचारापासून मुक्त असलेला पक्ष आहे, असा दावा केला. या काँग्रेसचे बहुसंख्य अनुयायी ख्रिश्चन धर्माचे आणि नायर जातीचे होते. केरळ काँग्रेसचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. कार्यकर्त्यांना मूळ काँग्रेसमध्ये परत येण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून १ जुलै १९६६ रोजी टी. के. गोपाळकृष्ण पण्णिकर यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला. के. एम्. जॉर्ज यांनी केरळमध्ये सरकार स्थापण्यासाठी कम्युनिष्ट (मार्क्सवादी) पक्षाशी हातमिळवणी केली. त्याचा चाको यांच्या सहकाऱ्यांनी  तर्कविसंगत आणि विश्वासघातकी धोरण मानून विरोध केला. जॉर्ज यांची १७ ऑक्टोबर १९७४ रोजी पक्षातून हकालपट्टी झाली. डिसेंबर १९८६ मध्ये केरळ काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांत काँग्रेस (आय्.) मध्ये सामील होण्याबाबत तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले आणि केरळ काँग्रेसमधील एक गट काँग्रेस (आय्) मध्ये सामील झाला.

संदर्भ : 

  • मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती