युनायटेड गोवन्स : गोवा राज्यातील प्रादेशिक पक्ष. पोर्तुगीज अंमलातून मुक्त होऊन गोवा भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला (१९६२). त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. देशातील घटक राज्यांच्या भाषावार पुनर्रचनेच्या प्रक्रियेमध्ये गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होण्याची भीती गोव्यातील कॅथलिक ख्रिश्चन समाजात निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पाच छोट्या पक्षांच्या एकीकरणातून जॅक सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड गोवन्स या पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली. गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण पृथगात्मता जोपासणे आणि त्यासाठी गोव्यास घटक राज्याचा दर्जा मिळविणे हे या पक्षाचे उद्दीष्ट होते. १९६३ मध्ये गोव्यात पहिल्या निवडणुका झाल्या. त्यात दयानंद बांदोडकरांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षास बहुमत मिळून तो पक्ष सत्तेवर आला. ३० पैकी युनायटेड गोवन्स पक्षाने १२ जागा मिळवून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळविले. पुढे १९६७ मध्ये गोव्याचे घटनात्मक स्थान ठरविण्यासाठी सार्वमत घेण्यात आले. त्यात गोव्यातील बहुसंख्य मतदारांनी गोव्याचा केंद्रशासित दर्जा ठेवण्याच्या बाजूने कौल दिला. यानंतरच्या काळात पक्षात फूट पडून सिक्वेरा गट व लोबो गट निर्माण झाले. सिक्वेरा गटातही १९७४ मध्ये फ्रूट पडून फ्रॅन्सिस सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखालील गट भारतीय लोकदलात विलीन झाला. त्याच सुमारास पक्षामध्ये पक्षाध्यक्ष जॅक सिक्वेरा आणि उपाध्याक्ष नाईक यांच्यातही मतभेद होऊन पक्षाचे पुन्हा एकदा विभाजन झाले. सिक्वेरा गट ८ मे १९७७ रोजी जनता पक्षात विलीन झाला.

संदर्भ :

  • Weiner, Myron, Ed. State Politics in India, Princeton, 1968.