प्रस्तावना : कोणताही व्यवसाय हा नितीमूल्यांवर आधारित असतो. ज्याचा प्रमुख हेतू म्हणजे माणसाचा उत्कर्ष व्हावा व समाजाचे कल्याण व्हावे असा असतो. परिचर्या हा व्यवसाय शास्त्रशुद्ध ज्ञान व कौशल्य यावर आधारित आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीची किंवा आजाऱ्यांची मूलभूत परिचर्या किंवा सेवा शुश्रूषा करता येते. शुश्रूषेमध्ये आजारी व्यक्तीची सर्वांगीण काळजी घेणे, आरोग्याचे संवर्धन व संरक्षण करणे, होणाऱ्या आजारापासून प्रतिबंध करणे इत्यादींचा समावेश होतो. याचा परिपूर्ण अर्थ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासंदर्भातील शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि अध्यात्मिक गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करणे हा परिचर्या व्यवसायाचा मूळ गाभा आहे.
नैतिकतेवर आधारलेला आणि मानवाच्या आरोग्य सेवेला पूर्णपणे वाहून घेतलेला असा हा व्यवसाय आहे. याची व्याख्या अशी करता येईल की व्यासंग कौशल्य आणि शास्त्रीय ज्ञान हा या व्यवसायाचा आधार आहे. व्यावसायिकाला तांत्रिक ज्ञान, विद्यालयीन शिक्षण आणि सेवावृत्तीचे ध्येय असणे आवश्यक असते. रोग्याच्या सामाजिक गरजेप्रमाणे त्याची सेवा करण्याची वृत्ती ठेवावी लागते मानवी आणि सामाजिक स्वास्थ्याचे जतन करावे लागते. अमेरिकन नर्सेस असोसिएशन द्वारे दिलेल्या व्याख्येनुसार परिचर्या हा मदत करणारा व्यवसाय असून व्यक्तीला आरोग्यासाठी व आपले कल्याणकारी आयुष्य जगण्यासाठी मदत करत असतो.
परिचर्या व्यवसाय का म्हणावा :
- व्यवसाय याचा अर्थच मुळी ज्याला सामाजिक मान्यता प्राप्त झाली आहे अशी कला. ही मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या क्षेत्रातील ज्ञान परिश्रमपूर्वक संपादन करावे लागते.
- व्यवसायात पडू इच्छिणाऱ्यांचा शैक्षणिक दर्जा तो त्या व्यवसायावरून ठरविला जातो.
- व्यवसाय हा शास्त्रीय तत्त्वांवर आणि सामाजिक मूल्यांवर आधारलेला असतो. हे व्यावसायिक समोर आलेल्या प्रश्नांची नेमकी उकल करून त्याची योग्य ती उत्तरे शोधून काढतात.
- व्यवसायात स्वतःची जबाबदारी ओळखून इतर शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम आखून खास अभ्यासक्रम तयार करून समाजाच्या उन्नतीसाठी आपली खास वैशिष्ट्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देतो.
- व्यवसाय सतत आपल्या ज्ञानात भर घालत असतो. सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेत असतो, त्यायोगे तो समाजाची सेवाच करतो. त्या सेवेचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होत असतो.
- व्यावसायिक परिचारिका ही मान्यता प्राप्त परिचर्या शिक्षण संस्थेतून पदवीधर झालेली असते किंवा असतो. ज्या प्रदेशात त्या संस्था असतात तेथे त्यांना व्यवसाय करण्याला परवानगी मिळालेली असते.
- ज्या उमेदवारांमध्ये आवश्यक असलेली पात्रता असते अशा उमेदवारांना परिचर्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश दिला जातो तिथे त्यांना हा शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा लागतो. हा शिक्षणक्रम भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा त्या प्रांताच्या कौन्सिलची मान्यता दिलेली असते. कोणत्या पद्धतीने हा शिक्षणक्रम शिकवला जातो यावर तिचा शिक्षणक्रम किती काळाचा असावा हे ठरविले जाते.
परिचर्या व्यवसायाची उद्दिष्टे :
- प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची किंवा समूहाची शुश्रूषा करताना भौतिक, जीवशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यक परिचर्या यांचा उपयोग करावा.
- व्यक्ती, व्यक्तीचे राहणीमान व इतर घटक ज्यांचा आरोग्यावर परिणाम होतो याचा अर्थ समजून घ्यावा.
- सेवा सुश्रुषा करताना परिचर्या प्रक्रियांचा वापर करावा. गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेताना गांभीर्याने विचार करण्याची कला अवगत असावी.
- शुश्रूषा देताना नवनवीन पद्धती आणि उपकरणांचा उपयोग करता यावा.
- परिचारिका म्हणून कार्यरत असताना संपूर्णपणे आरोग्य सेवा देणाऱ्या संघाचा एक सदस्य म्हणून काम करावे.
- व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्वगुण वापरावेत.
- गरजेनुसार परिचर्येसंदर्भात संशोधन करून गुणवत्तापूर्वक सेवा पुरवाव्यात.
- सर्वसाधारण रुग्ण सेवेतील आवड जाणीव ठेवून स्वतःच्या ज्ञानात व कौशल्यात भर घालून व्यवसायिक विकास करण्यास मदत करावी.
- प्रतिबंधात्मक उन्नतीवर्धक संरक्षणात्मक आरोग्य सेवा पुरवाव्यात. परिचर्या सेवेतील नितीमूल्यांचे पालन करावे व मानवी संबंधांचे पालन करावे.
समीक्षक : सरोज उपासनी