पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या भूशास्त्रीय घटनाक्रम इतिहासकाळात विविध शैलप्रणाली निर्माण झालेल्या आहेत. मुख्य दोन शैल संघ (Group) – प्रणाली (System) मध्ये किंवा एकाच कालखंडातील शैल संघ – प्रणालीमधील श्रेणी (Series) व अवस्था (Stage) यांच्यातील काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्याही विवर्तनी (Tectonic), संरचनात्मक (Structural), अग्निज (Igneous), अपक्षरण (Erosion) आणि निक्षेपण (Deposition) प्रक्रियांद्वारे सततची क्रिया घडत असताना जेव्हा खंड पडतो; म्हणजेच जेव्हा त्यातल्या त्यात शांततेचा काळ असतो, उदा., ज्या वेळी मोठ्या प्रमाणात कोणत्याही विवर्तनी, संरचनात्मक आणि अग्निज क्रिया होत नाहीत आणि अपक्षरण पृष्ठ तयार होते तेव्हा त्याला अभिविसंगती/विसंगती (अप्रासंगिकता; Unconformity) म्हणतात. या अपक्षरण पृष्ठावरती अवसादी निक्षेपणामध्ये पिंडाश्म (Conglomerate) किंवा संकोणाश्म (Breccia) खडकांचे कमी जास्त जाडीचे थर पाहावयास मिळतात. अर्थात ज्या ठिकाणी पिंडाश्म/संकोणाश्म असतात; त्या ठिकाणी निश्चितपणे अभिविसंगती आहे असे अनुमान काढता येते.

बार (पाली; राजस्थान) या ठिकाणी आढळणाऱ्या पिंडाश्म खडकांचे हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय शिला स्मारक त्याच गावाच्या नावाने भारतीय भूशास्त्रीय इतिहासात प्रचलित असून प्राचीन अशा दिल्ली (अधि) महासंघाच्या (Delhi Super group) तळातील (Base) खडकांचा भाग आहेत. या पिंडाश्मामध्ये बारीक मृदा घटकांच्या आधारकामध्ये (Fine Pelitic matrix) मुख्यतः अतिप्राचीन अशा अरावली संघातील क्वॉर्ट्झाइट (Quartzite) खडकांचे विदारित झालेले/झिजलेले गोटे असून क्वचितप्रसंगी ग्रॅनाइट पट्टिताश्मांचेही (Granite Gneiss) झिजलेले गोटे आढळतात. हे पिंडाश्म बार गावाजवळ अरावली संघातील आधारभूत (Basement) असलेल्या जुन्या पट्टिताश्म खडकांवरती अभिविसंगतीच्या रूपात आढळतात. यांचे वैशिट्य म्हणजे या पिंडाश्मातील गोटे हे असामान्यरित्या ताणल्यामुळे (Extraordinary Stretched) त्यांच्या नेहमीच्या आकाराच्या २० ते ३० पटीने लंब आकारात विस्तारित (Extended dimension) झालेले आहेत. हे बहुधा उत्तरीय (नंतर झालेल्या) विवर्तनी हालचालींमुळे झाले असावे असा भूवैज्ञानिकांचा कयास आहे.

बेवर – सेन्द्रा – बार – पाली या मार्गावरील बार – पाली या आडव्या रस्त्यावरुन सेन्द्रा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे पिंडाश्म पाहता येतात.

संदर्भ :

  •  https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी