शैवालस्तराश्म हे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या प्रारंभ काळातील सूक्ष्म जीवजंतूंनी (Microbes) ठसे (Impression) प्रकारातील जीवाश्मांच्या रूपाने ठेवलेला पुरावा असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. शैवालस्तराश्म ही निळ्या – हिरव्या शैवालामुळे (Blue – Green Algae) तयार झालेली एक संरचना आहे. यामध्ये शैवाळे आपल्या सूक्ष्म तंतूंच्या (Filaments) साहाय्याने पाण्यातील कार्बोनेट कणांना आकर्षित करून व एकत्र जोडून सपाट अथवा छोट्या उंचवट्याचे थर (mats) तयार करतात. त्याकाळातील परिस्थितीनुसार शैवालांची संख्या, आकार, त्यांचे एकत्रीकरण (Assembledges), गाळाचे प्रमाण आणि त्यांच्यातील कणांना जोडणारी क्रिया (Bonding) यांच्या एकत्रित परिणामाने; कालांतराने हे स्तरीय, स्तंभी आणि गाठीसारखी रचना (Stratiform, Columnar and Nodular structure) दाखवितात. हे बहुतांशी उथळ पाण्यात तयार होतात; ज्या ठिकाणी भरतीमुळे बारीक गाळाचे आणि कार्बोनेटचे प्रमाण मिळत जाते.

राजस्थान राज्यातील झामरकोत्रा (उदयपूर जिल्हा) येथील शैवालस्तराश्म उद्यान हे शैवालस्तराश्म खडकांबरोबर असलेल्या सर्वांत  मोठ्या आणि संपन्न/समृद्ध अशा फॉस्फेटी खाण खडकांचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीवरील आदिम जीवसृष्टीबद्दल माहिती देऊ शकणारा हा महत्त्वाचा दुवा येथील खडकांत माग अवशेष जीवाश्मांच्या रूपात संरक्षित आहे. त्यांचे भूशास्त्रीय वय साधारण १७०० – १८०० द.ल. वर्षांपूर्वी इतके आहे.

कँब्रियन पूर्व महाकल्पातील अरावली महासंघाच्या खडकातील फॉस्फेटी खडकांमध्ये हे शैवालस्तराश्म जवळपास १५ किमी. लांबीच्या सलग पट्ट्यात आढळतात. येथील रॉक फॉस्फेट हे शैवालस्तराश्म सहित असलेल्या डोलोमाइट चुनखडी खडकात मिळत असून ते राखाडी ते निळसर राखाडी रंगाच्या छटात, विविध आकारात आणि स्वरूपात पाहवयास मिळतात. हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय जीवाश्म उद्यान प्रसिद्ध अशा उदयपूर शहरापासून २५ किमी. आग्नयेला उदयपूर सालंबर रस्त्यावरील झामरेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला; पूर्वेकडे ५०० मी. अंतरावर आहे.

संदर्भ :

  • संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी