पूर्व कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीची प्रमुख उपनदी. ओटावा नदी क्वीबेक प्रांताच्या पश्चिम भागातील लॉरेंचन या पठारी व पर्वतीय प्रदेशात उगम पावते. पश्चिमेकडे तमिस्कमिंग सरोवराकडे वाहत जाऊन ही नदी पुढे आग्नेय दिशेस वळते. ओटावा शहरापासून ती पूर्ववाहिनी बनून माँट्रिऑलच्या पश्चिमेस सेंट लॉरेन्स नदीस मिळते. या नदीचा बहुतांश प्रवाह क्वीबेक आणि आँटॅरिओ या प्रांतांची सीमा आहे. ओटावा नदीची एकूण लांबी १,२७० किमी. आहे. या नदीमध्ये असंख्य सरोवरे निर्माण झाली आहेत. यांत ग्रँड व्हिक्टोरिया, तमिस्कमिंग, सीमार्ड, अ‍ॅलमेट, चॅट्स आणि देस्चेन्स यांचा समावेश होतो. ओटावा नदी आणि उपनद्यांचे एकूण पाणलोट क्षेत्र १,४२,००० चौ. किमी. आहे. रूझ, लीइव्हर, गॅटंओ, कूलाँग, रिडो, मिसिसिपी आणि मॅदवास्का या ओटावा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. शोद्येर ही या नदीमार्गातील प्रमुख प्रपात व द्रुतवाहमालिका आहे.

इसवी सन १६१३ साली सॅम्यूएल द शांप्लँ या फ्रेंच समन्वेषकांनी या नदीचा शोध लावला. या भागात वास्तव्य करणाऱ्या अल्गॉन्क्वियन इडियनांपैकी ओटावा लोकांवरून या नदीला ओटावा हे नाव देण्यात आले. समन्वेषक, फर व्यापारी तसेच मिशनरी यांना पंचमहासरोवरांच्या (ग्रेट लेक्स) वरच्या (अंतर्गत) भागाकडे जाण्यासाठी ही नदी महत्त्वाचा जलमार्ग बनली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात व्यापारी लाकूडतोड हा ओटावा नदीकाठावरील महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय ठरला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हाच व्यवसाय येथील प्रदेशाच्या आर्थिक विकासास कारणीभूत ठरला. इ. स. १८३२ मध्ये ओटावा नदी आँटॅरिओ सरोवरास जोडणाऱ्या रिडो कालव्याचे काम पूर्ण झाले.

कॅरिलॉन धरण

सध्याच्या काळात ओटावा नदीचे जलमार्ग म्हणून महत्त्व कमी झाले असले, तरी जलविद्युतनिर्मितीचा स्रोत म्हणून तिचे महत्त्व अबाधित आहे. या नदीवरील अनेक जलविद्युतनिर्मिती प्रकल्प क्वीबेक आणि आँटॅरिओ या प्रांतांना वीज पुरवठा करतात. त्यांपैकीच क्वीबेकमधील कॅरिलॉन येथील ओटावा नदीवर उभारलेला प्रसिद्ध कॅरिलॉन धरण व जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. ओटावा नदी व तिच्या खोऱ्यात समृद्ध परिसंस्था आढळतात. आँटॅरिओ प्रांतातील पेम्ब्रोक आणि ओटावा तसेच क्वीबेक प्रांतातील हल, गॉटंओ ही ओटावा नदीच्या काठावरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

 

समीक्षक : वसंत चौधरी