जीवनसत्त्व अ हे एक सेंद्रिय संयुग असून मेद विद्राव्य आहे. त्याची आहारातील आवश्यकता कमी आहे. परंतु, त्याच्या कमतरतेमुळे काही विकार होतात. क्रियाशील अ जीवनसत्त्व केवळ प्राण्यांच्या ऊतींमध्ये असते. वनस्पती ऊतींमध्ये क्रियाशील जीवनसत्त्व पूर्व रेणू (Pro vitamin) स्वरूपात असते. बीटा कॅरोटिनापासून क्रियाशील अ जीवनसत्त्व ‘रेटिनाल’ (Retinal) हे यकृतामध्ये तयार होते. रेटिनाल हे एक प्राथमिक अल्कोहॉल (Alcohol) तसेच अल्डिहाइड (Aldehyde) आहे. रेटिनालच्या ऑक्सिडीकरणामुळे रेटिनॉल अम्ल (Retinol acid) तयार होते.
मानवी शरीर बीटा कॅरोटिनाचे रेटिनॉलमध्ये (अ जीवनसत्त्वामध्ये) रूपांतर करते. थोडक्यात बीटा कॅरोटीन हे रेटिनॉलचा पूर्वघटक आहे. निरोगी त्वचा, पचनसंस्थेची अंत:त्वचा (Mucus membrane), प्रतिकारक्षमता (Immune system) आणि डोळ्यांचे आरोग्य व दृष्टी यासाठी रेटीनॉल आवश्यक आहे. बीटा कॅरोटिनाच्या स्वरूपात ते आहारातून उपलब्ध होते.
अ जीवनसत्त्व स्रोत :
प्राणिजन्य स्रोत : लोणी, दूध, चीज आणि अंड्यातील पिवळ बलक, कॉड माशाच्या यकृतापासून मिळणारे तेल (Cod liver oil).
वनस्पतिजन्य स्रोत : टोमॅटो, गाजर, पालक, ब्रोकोली, कोथिंबीर, ढोबळी मिरची, हिरव्या पालेभाज्या, आंबा, पपई, बहुतेक सर्व रंगीत भाज्या व फळे, फळांच्या साली इत्यादी.
प्रौढ पुरुष आणि स्त्रिया यांना दररोज ३००० आंतरराष्ट्रीय युनिट्स (IU) इतकी अ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना तसेच यकृताच्या आजार असलेल्या रुग्णांना अधिक प्रमाणात अ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
अ जीवनसत्त्व आतड्यातून मेदपदार्थांबरोबर शोषून घेतले जाते. यकृतामध्ये अ जीवनसत्त्व साठवले जाते. रेटिनॉलच्या स्वरूपात ते यकृतामधून आवश्यकतेनुसार उपलब्ध होते.
अ जीवनसत्त्वाचे कार्य : मुख्यत्वेकरून योग्य शारीरिक वाढ, पुनरुत्पादन आणि दृष्टी याकरिता अ जीवनसत्त्व आवश्यक असते. डोळ्यांच्या कार्यप्रणालीमधील वाल्ड दृष्टी चक्र (Wald Visual Cycle) किंवा ऱ्होडॉप्सीन (Rhodopsin) चक्र या प्रक्रियेसाठी अ जीवनसत्त्व मुख्य भूमिका बजावते. दृष्टीपटलामध्ये (Retina) दंड आणि शंकू पेशी (Rods and cones) अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. या पेशींच्या नेहमीच्या कार्यामध्ये अ जीवनसत्त्व अत्यावश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रखर प्रकाशापासून अंधुक प्रकाशाकडे जाते तेव्हा काही मिनिटांत दृष्टी कमी होते. अशावेळी ऱ्होडॉप्सीन समृद्ध (Resynthesized) होते आणि दृष्टी सुधारली जाते.
इतर जैवरासायनिक कार्यांमध्ये उदा., अस्थी आणि दात तयार होणे, त्वचा आणि श्लेष्मल त्वचेच्या अभिस्तर ऊती तयार होणे तसेच चयापचय क्रिया यांमध्ये अ जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा वाटा आहे.
अ जीवनसत्त्व कमतरता (Vitamin A Deficiency) : अ जीवसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. यकृतामध्ये अ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात साठवलेले असते. त्यामुळे आहारात दीर्घकाळ अ जीवनसत्त्व नसेल तरच त्याची कमतरता जाणवते.
अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दृष्टिदोष निर्माण होऊन रातांधळेपणा व रंगांधळेपणा निर्माण होतो. रात्रीच्या अंधारात तसेच अंधुक प्रकाशात स्पष्ट दिसत नाही. अ जीवनसत्त्वाची दीर्घकालीन कमतरता दृष्टीपटलातील पेशींचे नुकसान करते. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होतो. पारपटल (Cornea) शुष्क होते (Xerophthalmia). पारपटलावर व्रण पडून त्याचा ऱ्हास होतो व नंतर पूर्ण अंधत्व येते.
अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी बनून तिला खाज सुटते. तसेच यकृत आणि मूत्रपिंडाचे रोग बळावतात. मूत्रमार्ग व श्वसनमार्गाच्या अभिस्तराचे शृंगीभवन (Keratinisation) होते. अशा मृत ऊती साठल्याने जीवाणू संसर्गात वाढ होते.
अ जीवनसत्त्व आधिक्य : अ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात सेवन केल्याने मेद विद्राव्य जीवनसत्त्वांच्या चयापचयामध्ये बदल होणे, अस्थी सूज किंवा अस्थी वेदना, यकृत आकार वृद्धी, केस गळणे, चिडचिड इत्यादी लक्षणे दिसतात. तसेच विषबाधेचीही लक्षणे उद्भवतात. वनस्पतीतील पूर्व अ जीवनसत्त्व (Pro vitamin A) आहारातून अधिक गेल्याने शरीरावर परिणाम होत नाही. परंतु, प्राण्यांचे यकृत उदा., मासे व सील यांसारख्या सस्तन प्राण्यांच्या यकृताचे अधिक सेवन केल्यास विषबाधा होऊ शकते. याचे वेळीच निदान झाल्यास आहारातून असे पदार्थ टाळल्यास कालांतराने विषबाधा कमी होते.
पहा : जीवनसत्त्वे, जीवनसत्त्व अ (पूर्वप्रकाशित), रातांधळेपणा (पूर्वप्रकाशित).
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Vitamin_A
- https://www.webmd.com/a-to-z-guides/supplement-guide-vitamin-a#1
- https://www.healthline.com/nutrition/vitamin-a-deficiency-symptoms
- https://www.healthline.com/health/hypervitaminosis-a
समीक्षक : वंदना शिराळकर