चेन्नई शहराच्या दक्षिण भागात असलेल्या पल्लवरम् उपनगरातील सेंट टॉमस मौंट (St. Thomas Mount) या ६० मी. उंचीच्या टेकडीवर चार्नोकाइट खडकांचे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय शिलास्मारक आहे. सर टॉमस हेन्री हॉलंड यांनी १८९३ साली कलकत्त्याचे संस्थापक जाब चार्नक यांच्या बहुमानार्थ या खडकाला चार्नोकाइट नाव दिले. कोलकाता येथील त्याची कबर ही याच खडकांची आहे.
चार्नोकाइट हा प्रादेशिक रूपांतरण (Regional Metamorphism) प्रकारातील अति उच्च दाब व उष्णता यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या खोल अंतर्भागात पुनः स्फटित (Recrystallised) झालेला ग्रॅन्युलाइट समजक (Granulite facies) गटातील खडक आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात प्रामुख्याने असलेले हायपर्स्थीन (Hypersthene) हे ऑर्थोपायरोक्सीन खनिज (Orthopyroxene Mineral). इतर महत्त्वाची खनिजे म्हणजे क्वॉर्ट्झ आणि फेल्स्पार. काही वेळेला इतर मॅफिक, पायरोक्सीन्स, ऑलिव्हीन आणि गार्नेट (Mafic, Pyroxenes, Olivine and Garnet) खनिजेही असतात. रूपांतरण प्रक्रियेदरम्यान यांच्या मूळ खडकांच्या रासायनिक घटकांमध्ये जसे बदल होतात, त्याप्रमाणे विविध कणीय आकारांचे, रंगाचे आणि पोतांचे (Grain size, Colour and Texture), तसेच अधिसिलिक ते अवसिलिक (Acidic to Undersaturated) प्रकारातील अनेकविध चार्नोकाइट खडकांचे श्रेणीप्रकार आढळतात. म्हणून भूवैज्ञानिक याला एक खडक असे न म्हणता चार्नोकाइट खडकांचा गट असे संबोधतात.
येथील चार्नोकाइट खडकांत रूपांतरणाच्या दोन भिन्न परिस्थितीत तयार झालेले पायरोक्सीन समजक आढळतात. या ठिकाणातील चार्नोकाइट खडक हे अतिप्राचीन कालखंड (Precambrian Era; सु. २५०० द.ल. वर्षांपूर्वी) दर्शवित असल्याने, तसेच हे खडक रूपांतरण प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यातील ग्रॅन्युलाइट आणि पातालीय अग्निजन्य (Plutonic Igneous) खडकांशी गुणधर्म साधर्म्य दाखवित असल्यामुळे याचा संबंध भूशास्त्रीय कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात अनेक वेळा स्थापित आणि प्रस्थापित होऊन विदिर्ण – विघटित (Disintegrated) झालेल्या आदिम भूकवचातील/मूलगामी (Primordial Crust) आधारभूत शैल संरचनेबरोबर (Basement rock structure) जोडण्याचा भूवैज्ञानिक संशोधकांचा प्रयत्न आहे.
संदर्भ :
- https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी