उशी लाव्हा, मरडीहळ्ळी

ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी जमिनीवर येणारा तप्त लाव्हारस ज्या वेळी पाण्याच्या संपर्कात येतो, त्या वेळी त्यांचा पृष्ठभाग अतिशय जलद गतीने थंड झाल्याने थिजलेल्या आणि आकुंचित कडांसहित त्याचे गोलाकार किंवा अंडाकृती आकारांचे फुगलेल्या उशीसारखे तुकडे होऊन ते मूळ लाव्हाप्रवाहापासून ढीग किंवा राशीसारखे त्याच ठिकाणी वेगळे होतात. त्या तुकड्यांचा अंतर्भाग हा नंतर सावकाश थंड होतो. त्यांच्यात पुटके/कुहरी आणि भेगा (Vesicles and cracks) दिसून येतात.

मरडीहळ्ळी (चित्रदुर्ग; कर्नाटक) गावात असणारे उशी लाव्हा हे धारवाड (अधि) महासंघातील (Dharwad Supergroup) चित्रदुर्ग सुभाजा पट्यात (Chitradurga Schist belt) स्थित असून जगातील अशा प्रकारातील एक उत्तम नमुना म्हणून नावाजलेले आहे. अशा तऱ्हेने तयार झालेल्या उशी लाव्हाचे थरांच्या राशी महासागरे आणि समुद्रातील ज्वालामुखींच्या पट्ट्यात (Mid oceanic volcanic belt) महासागर तळांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र आढळून येतात. बहुतांशी प्रमाणात हे बेसाल्ट आणि अति अल्पसिलिक/अति मॅफिक (Ultrabasic – Ultramafic) घटकांचे खडक असतात. साधारणपणे उशी लाव्हा हे लहान आकारात व १ मी. व्यासापर्यंत आढळतात. एखाद्या ठिकाणी उशी लाव्हा आढळणे म्हणजे त्या काळात त्या ठिकाणी पाण्याचे ठिकाण होते हे सांगता येते. मरडीहळ्ळी या राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारकातील उशी लाव्हाचे वय सु. २५०० द.ल. वर्षांपूर्वी (२५० कोटी वर्षे) इतके आहे.

बंगळुरू – पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील बंगळुरूपासून १८० किमी. अंतरावर असलेल्या अयामंगला या गावापासून ४ किमी. उत्तरेला असलेले मरडीहळ्ळी हे चित्रदुर्ग शहराच्या आग्नेयेला १६ किमी. अंतरावर आहे. उशी लाव्हा याला उपधानी लाव्हा/शिरोधान लाव्हा (Ellipsoidal Lava) असेही म्हणतात.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी