रॉबर्ट ए. मुंडेल : (२४ ऑक्टोंबर १९३२). कॅनेडियन अर्थशास्त्रज्ञ, युरोचे जनक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. मुंडेल यांना चलनविषयक गतिक, पर्याप्त चलन व आंतरराष्ट्रीय विनिमय दर यांसंदर्भातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल १९९९ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार मिळाला. पायाभूत व प्रवेशक अशा कार्याने युरो या युरोपियन समूह देशांच्या नवीन चलनाचा जन्म घातल्याने त्यांना युरोचे जनक मानले जाते. त्यांच्या ‘Mundell-Fleming Modelʼ व ‘Mundell-Tobin Iffectʼ या विचारप्रणालींना व्यापक प्रसिद्धी मिळाली.

मुंडेल यांचा जन्म कॅनडामधील किंस्टन (ओंतारिओ) येथे झाला. १९५३ मध्ये ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, व्हॅनकोयुव्हेर येथून त्यांनी अर्थशास्त्रातील बी. ए. पदवी आणि १९५४ मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठ, सिऍटलमधून एम. ए. पदवी मिळविली. त्यानंतर १९५६ मध्ये Massachusetts Institute Of Technology (M. I. T.)मधून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. २००६ मध्ये त्यांना कॅनडामधील वॉटरलू विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज पदवीने सन्मानित केले गेले. १९५६-५७ मध्ये शिकागो विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्राचे डॉक्टरेतर अधिछात्र (Fellow) म्हणून त्यांनी काम केले. पुढे १९६६ ते १९७१ या काळात त्याच विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. १९७४ मध्ये न्यूयॉर्क सिटीमधील कोलंबिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात त्यांची नियुक्ती झाली. २००१ मध्ये त्यांना तेथेच विद्यापीठ प्राध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व चीनमधील हाँगकाँग विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाचे अभ्यागत प्राध्यापक महणूनही त्यांनी काम केले.

१९६०च्या पूर्वाधात आंतरराष्ट्रीय चलन निधी (International Currency Fund)च्या संशोधन विभागात कार्यरत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय विनिमय दर व त्याचे चलनविषयक धोरणावर होणारे परिणाम या स्थूल अर्थशास्त्रीय घटकाच्या अभ्यासावर भर दिला. १९६१ मध्ये त्यांनी ज्या आर्थिक प्रदेशात किंवा विशिष्ट चलन विभागात मुक्त व्यापार असून कर्मचारी मुक्तपणे कोठेही नोकरी स्वीकारू शकतात, त्या प्रदेशासाठी एकच चलन असणे व्यवहार्य आहे, असा विचार मांडला. विनिमय दराचे नियंत्रण सरकारने करण्यापेक्षा बाजारपेठांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांवर व बदलत्या परिस्थितीनुसार बदलते (तरते) असावेत, अशी भूमिका अग्रहाने मांडणारे ते पहिलाच अर्थतज्ज्ञ होत. पूर्वीच्या बंदिस्त अर्थव्यवस्था प्रणाली संकल्पनेला छेद देत मुंडेल यांनी मुक्त व्यापार व भांडवल चलनवलन यांचे महत्त्व प्रस्तावित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडवल चलनवलनामुळे अनेक देशांच्या आर्थिक धोरणांमध्ये स्थैर्य येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या मते, देशातील जनतेचा चलनावरील विश्वास व ते जवळ बाळगण्याची तयारी व इच्छा यांनुसार भांडवल बाजारामधील विनिमय दर कमी-जास्त होतो. राष्ट्राचे आर्थिक भवितव्य चलनवाढ व चलनविषयक धोरणे यासंदर्भात नागरिकांच्या ज्या जाणीवा असतात, त्यांचे प्रतिबिंब विनिमय दरात पडते. मुंडेल यांच्या यासंदर्भातील नाविन्यपूर्ण सिद्धांतामुळे युरोपियन समाजातील पंधरापैकी अकरा देशांनी युरो चलन (Euro Currency) या एकाच व समान चलनास मान्यता दिली. चलनपुरवठा नियंत्रित करून चलनवाढ रोखता येईल तसेच करकपातीमुळे आर्थिक विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळेल, हे त्यांनी १९७०च्या सुमारास आग्रहपूर्वक मांडले. त्यांच्या या प्रस्तावांचा स्वीकार १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान रोनाल्ड विल्सन रेगन (Ronald Wilson Reagan) व नंतर १९८५ मध्ये अमेरिकन काँग्रेसने केला. श्रमिकांची गततिशीलता या विषयावरील संशोधनाद्वारे त्यांनी असे दाखवून दिले की, श्रम व भांडवल गतिशील असल्याने देशांच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या जातील. जरी देशांत मुक्त व्यापारावर निर्बंध असले, तरीही वस्तूंच्या किंमतींची पातळी समान राखून गतिशीलता व व्यापरवृद्धी होण्यास मदतच होईल.

मुंडेल यांचे नावाजलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : मॅन ॲण्ड इकॉनॉमिक्स (१९६८), इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (१९६८), मॉनेटरी थिअरी, इंटरेस्ट, इन्फ्लेशन ॲण्ड ग्रोथ ऑफ दि वर्ड इकॉनॉमी (१९७१), दि युरो ॲज ए स्टबिलायझर इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टिम (२०००). शिवाय त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले.

मुंडेल यांला नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर त्यांच्या संशोधन व अध्यापन कार्यासाठी अनेक सन्मान लाभले. गुगेनहेम फेलोशीप (१९७१), फेलो-अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस (१९९८), कंपॉनियन ऑफ आर्डर ऑफ कॅनडा (२००२), ग्लोबल इकॉनॉमिक प्राइझ-जर्मनी (२००५). त्यांच्या सन्मानार्थ चीनमधील शिक्षणसंस्थेचे मुंडेल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अंत्रप्रेन्यूअरशीप असे नामकरण केलेले आहे.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा