इरॅस्मस, डेसिडेरिअस : ( २८ ऑक्टोबर १४६६—१२ जुलै १५३६ ). प्रबोधनकाळातील एक डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक. त्यांचा जन्म रॉटरडॅम (नेदर्लंड्स) येथे आणि शिक्षण गौडा, डेव्हेंटर व सेटॉखेन्बॉस येथे झाले. १४९२ मध्ये स्टेन येथे रोमन कॅथलिक चर्चचे धर्मोपदेशक म्हणून त्यांची नेमणूक झाली, नंतर पॅरिस विद्यापीठात कँब्रेच्या बिशपांचे खासगी चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथे त्यांनी दोन वर्षे अभ्यास करून धर्मशास्त्रात पदवी मिळविली. १५०० पासूनच त्यांच्या लेखनाचा व विचारांचा प्रभाव यूरोपात पडू लागला होता. इंग्लंडमधील त्यांच्या मित्रांच्या निमंत्रणावरून ते तेथे गेले. त्यांच्या समकालीन विद्वज्जनांशी त्यांचा चांगला परिचय होता व त्यांचे मित्रमंडळही मोठे होते.
पॅरिस येथील आपल्या विद्या्र्थ्यांच्या मदतीने त्यांनी प्राचीन काळच्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या तात्त्विक विचारांचे संग्रह तयार करून ते प्रसिद्ध केले. बायबलमधील ‘नव्या करारा’चे त्यांनी मूळ ग्रीक हस्तलिखितांवरून लॅटिनमध्ये सटीप भाषांतर केले (१५०५). त्यांचे लेखन त्या काळी अत्यंत लोकप्रिय होते आणि तत्कालीन विद्वानांत त्यांना मानाचे स्थानही होते. १५१६ मध्ये त्यांनी ‘नव्या करारा’ची एक नवी ग्रीक आवृत्ती काढली. त्यांच्या ह्या ग्रीक आवृत्तीमुळे ‘नव्या करारा’च्या टीकात्मक अभ्यासास जोराची चालना मिळाली. त्या काळातच मार्टिन ल्यूथर (१४८३‒१५४६) यांचा लोकांवर प्रभाव पडू लागला होता. इरॅस्मस यांची मते ल्यूथरहून भिन्न होती. त्यांना धर्मसुधारणा हवी होती; पण ती क्रांतीच्या मार्गाने नव्हे. त्यांची विचारसरणी बुद्धिवादी होती. धर्मातील भ्रामक समजुती व दांभिकता यांवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. कॅथलिक धर्माच्या अवनतीच्या काळात त्यांनी कॅथलिक धर्मास मार्गदर्शन केले व प्रॉटेस्टंट पंथाकडे वळणाऱ्या लोकांचा ओघ थांबविण्यास हातभार लावला. आयुष्याच्या अखेरीस त्यांना ‘प्रॉटेस्टंट’ व ‘कॅथलिक’ ह्या दोन्हीही पंथांच्या टीकेस तोंड द्यावे लागून मनस्ताप सहन करावा लागला. शेवटीशेवटी स्वित्झर्लंडमधील बाझेल येथे जोहान्न फ्रोबेन प्रेसमध्ये ते भाषांतर-संपादनाचे काम करीत होते. तेथेच त्यांचे निधन झाले.
इरॅस्मस यांचे बहुतांश लेखन लॅटिनमध्ये असून ते टीकात्मक व उपरोधिक स्वरूपाचे आहे. त्यांच्या ग्रंथांतून त्यांची प्रगाढ विद्वत्ता दिसून येते. त्यांची शैली वेधक व काहीशी विनोदी आहे. त्यांच्या मूळ लॅटिन ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे झालेली आहेत. त्यांचे महत्त्वाचे लॅटिन ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : Adagia (१५००), Enchiridion Mulitis Christiani (१५०३), Moriae Encomium (१५०९), Institutio Principis Christiani (१५१५) व Colloquia (१५१६). एफ. एम. निकल्झ यांनी त्यांच्या लॅटिन पत्रांचा संग्रह संपादित करून इंग्रजीत भाषांतरित केला आहे (१९०४−१८). त्यांचा पत्रसंग्रह विशेष महत्त्वाचा मानला जातो.
संदर्भ :
- Allen, P. S. The Age of Erasmus, Oxford, 1914.
- Smith, P. Erasmus : A Study of His Life, Ideals and Place in History, New York, 1923.