एक जलीय प्राणी. मोती-कालवाचा समावेश मृदुकाय संघाच्या शिंपाधारी (बायव्हाल्व्हिया) वर्गात केला जातो. त्याचे कवच दोन शिंपांचे आणि जवळपास द्विपार्श्वसममित असते. मोती-कालवांच्या वसाहती समुद्रात मर्यादित ठिकाणी असतात. ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, अमेरिकेची संयुक्त संस्थाने तसेच भारत या देशांच्या किनाऱ्‍यालगतच्या उथळ समुद्रात त्यांच्या जाती आढळतात. भारतात कन्याकुमारी ते किलाकराई अशा विस्तृत क्षेत्रात, विशेषेकरून तुतिकोरिनजवळील समुद्रात, मोती-कालव मोठ्या प्रमाणावर मिळतात. तसेच मानारचे आखात, पाल्क सामुद्रधुनी व पश्‍चिम किनाऱ्‍यावरील कच्छचे आखात या ठिकाणीही काही प्रमाणात मोती-कालवे आढळतात. भारतात समद्रकिनाऱ्‍यापासून सु. २० किमी. अंतरावरील साधे खडक आणि प्रवाळ खडक यांवर १८–१२ मी. खोलीवर मोती-कालव आढळतात. भारतात आढळणाऱ्‍या मोती-कालवाचे शास्त्रीय नाव पिंक्टाडा पिंक्टाडा आहे. याशिवाय भारतात पिंक्टाडा फुकाटापिंक्टाडा व्हल्गॅरीस या जातींचीही मोती-कालवे आढळतात.

मोती-कालवामध्ये (पिंक्टाडा पिंक्टाडा) तयार झालेला मोती (वरील बाजूस)

पिंक्टाडा पिंक्टाडा या जातीचे मोती-कालव ८–११ सेंमी. लांब असून आकाराने साधारण वाटोळे असतात. दोन शिंपा एकमेकांना ज्या काठाशी जुळतात तो काठ सरळ असतो. शिंपांचा उजवा आणि डावा असा उल्लेख केला जात असून डावी शिंपा खडकांना कायमची चिकटलेली असते. शिंपांच्या आत मोती-कालवाचे मऊ शरीर असते. शीर्ष, पाय, आंतरांगे आणि प्रावार (त्वचेसारखे आवरण) असे त्याच्या शरीराचे भाग असतात. त्यांपैकी शीर्ष आणि पाय ठळक नसतात. मोती-कालवाला हालचाल करता येत नाही. पायापासून सूत्रगुच्छाच्या धाग्यांचा पुंजका निघालेला असून त्यायोगे कालव खडकाला घट्ट चिकटलेले असते. शिंपांची उघड-झाप एका अभिवर्ती स्नायूंनी होते. प्रावाराने शरीरातील आंतरांगे झाकलेली असतात. पचनसंस्थेत मुख अग्रभागी व गुदद्वार पश्‍चभागी असते. मुखपोकळीत जबडे व दंतपट्टिका नसतात. श्वसनासाठी कल्ले असतात. मोती-कालव सामान्यपणे एकलिंगी असतात.

मोती-कालवाच्या शिंपल्यात एकूण तीन स्तर असतात. बाहेरचा स्तर म्हणजे परिकवच किंवा परिस्तर (पेरिऑस्ट्रॅकम लेयर). हा काँकिओलीन या जैव पदार्थापासून बनलेला असतो. मधला स्तर म्हणजे लोलक स्तर (प्रिझमॅटिक लेयर) असून तो स्फटिकमय कॅल्शियम कार्बोनेटाचा असतो. आतील स्तर म्हणजे मुक्ताद्रव्य स्तर (नॅक्रीयस लेयर) असून या स्तरात कॅल्शियम कार्बोनेट आणि काँकिओलीन यांचे स्फटिक आलटून पालटून असतात. या स्तरातील कॅल्शियम कार्बोनेट, काँकिओलीन आणि पाणी यांच्या मिश्रणाला मुक्ताद्रव्य किंवा मोतीद्रव्य म्हणतात.

मोती-कालवाच्या दोन्ही शिंपांच्या आत चिकटून प्रावार असते. प्रावार स्तंभाकार पेशींचे बनलेले असून उद्दीपन होताच त्यांच्यापासून मुक्ताद्रव्य स्रवले जाते. मोती-कालव पाण्याचा प्रवाह शरीरात खेचून पाण्यातील अन्नकण ग्रहण करतात, तसेच ऑक्सिजन श्‍वसनासाठी वापरतात. जेव्हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखादा बाहेरचा कणमय पदार्थ, (उदा., वाळूचा कण, सूक्ष्म परजीवी किंवा अंडे) प्रावार पोकळीत शिरतो आणि मोती -कालवाला चिकटतो किंवा शिंपला व प्रावार यांच्या दरम्यान अडकतो, तेव्हा असा कण मोती-कालवाला टोचू लागतो. मात्र त्याला हा टोचणारा कण बाहेर टाकता येत नाही. त्यामुळे टोचणी कमी करण्यासाठी प्रावार पेशी मुक्ताद्रव्य स्रवू लागतात. या स्रावाची पुटे त्या कणाभोवती समकेंद्री थर तयार करतात. असे अनेक थर एकावर एक तयार होत जाऊन त्यापासून मोती तयार होतो. अशा प्रकारे तयार झालेल्या मोत्यांना नैसर्गिक मोती म्हणतात.

सध्याच्या काळात मोती-कालवांना लोखंडी तारांच्या पिंजऱ्‍यात अथवा दोरखंडाला चिकटवून त्यांचे संवर्धन करण्यात येते आणि मोती तयार केले जातात. या पद्धतीत लहान आकाराचे मोती-कालव (२-३ सेंमी.) गोळा करतात, त्यांना भूल देतात आणि प्रत्येक मोती-कालवाचा शिंपला उघडून त्याच्या शरीरात बाहेरील कण ठेवून शिंपला पुन्हा बंद करतात. काही काळानंतर तेथे मोती तयार होतो. अशा प्रकारे तयार केलेल्या मोत्याला संवर्धित मोती  म्हणतात. काही वेळा काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या मण्यांवर माशांच्या खवल्यांपासून तयार केलेल्या पदार्थाचा किंवा मोती-कालवातील मुक्ताद्रव्याचा पातळ थर देतात आणि हुबेहूब मोत्यासारखे दिसणारे कृत्रिम मोती तयार करतात.

विविध प्रकारचे अलंकार बनविण्यासाठी मोती वापरतात. पांढरा, काळा, फिकट गुलाबी (मोतीया), निळा, राखी व हिरवट अशा अनेक रंगछटांचे मोती असतात. नैसर्गिक मोत्यांपासून मौक्तिक चूर्ण व मौक्तिक भस्म बनवितात. ते आयुर्वेदिक तसेच युनानी औषधांमध्ये वापरतात. मोती काढून घेतल्यानंतर शिंपांपासून कॅल्शियम कार्बोनेटाची भुकटी बनवितात. कॅल्शियमअभावी होणाऱ्‍या विकारांवर जी कॅल्शियमयुक्त औषधे (गोळ्या, द्रावणे) दिली जातात, ती तयार करण्यासाठी या भुकटीचा वापर केला जातो. तसेच या भुकटीपासून बटणे व सुऱ्यांच्या मुठी तयार करतात. मोती काढून घेतल्यावर कालवाचा उपयोग खाण्यासाठी करतात.

समुद्राप्रमाणे गोड्या पाण्यातही मोती-कालव आढळतात. गोड्या पाण्यातील मोती-कालवाचे शास्त्रीय नाव लॅमेलिडन कोरीॲनस आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर ॲक्वाकल्चर या संस्थेत गोड्या पाण्यातील कालवांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा