समखुरी गणातील बोव्हिडी कुलाच्या बोव्हिनी उपकुलातील एक सस्तन प्राणी. मादीला म्हैस तर नराला रेडा म्हणतात. भारतीय रेड्यांचा वापर पाणी वाहून नेण्यासाठी अनेक वर्षे होत असल्याने ब्रिटिशांनी भारतातील म्हशींना ‘वॉटर बफेलो’ असे सामान्य नाव दिले आहे. म्हशींच्या उत्पत्तीचा इतिहास तेवढासा स्पष्ट नाही. उत्तर भारतातील शिवालिक टेकड्यांमध्ये सापडलेल्या जीवाश्मांनुसार भारतीय वन्य म्हैस (ब्यूबॅलस आरनी), टॅमॅरो (ब्यूबॅलस मिंडोरेन्सीस; मिंडोरो बेट, फिलिपीन्स) आणि ॲनोआ (ब्यूबॅलस डिप्रेसीकॉर्निस; सूलावेसी बेट, इंडोनेशिया) या तीन जातींची उत्पत्ती भारताच्या ईशान्य भागामध्ये (आसाम-चीन) असलेल्या वन्य म्हशींपासून झाली असावी, असे मानतात. वर उल्लेख केलेल्या म्हशींपैकी केवळ भारतीय वन्य म्हैस माणसाळली गेली. भारतीय पाळीव म्हशीचे शास्त्रीय नाव ब्यूबॅलस ब्यूबॅलिस आहे. तिच्यापासून म्हशींचे अनेक प्रकार अस्तित्वात आले असून जगातील सर्व पाळीव म्हशींमध्ये भारतीय पाळीव म्हशीची वैशिष्ट्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसून येतात. आफ्रिकन म्हैशीचे नाव सिन्सेरस काफेर आहे. आफ्रिकन म्हैस ही भारतीय म्हशीपेक्षा वेगळी असून तिचा समावेश बोव्हिनी उपकुलाच्या सिन्सेरस या वेगळ्या प्रजातीत केला जातो.
शरीराचा आकार, आकारमान, शिंगे आणि अधिवासातील परिस्थितीनुसार पाळीव म्हशींच्या दोन जाती पुढीलप्रमाणे आहेत : नदी म्हैस (रिव्हर बफेलो, ब्यूबॅलस ब्यूबॅलिस) आणि दलदल म्हैस (स्वॅम्प बफेलो, ब्यूबॅलस कॅरॅबॅनेसिस). भारतात या दोन्ही जाती आढळून येतात. सर्वसाधारणपणे नदी म्हैस ही भारत, पाकिस्तान, हंगेरी, बल्गेरिया, टर्की, इटली, ईजिप्त, ब्राझील इ. देशांत दिसून येते, तर दलदल म्हैस भारतात फक्त आसाममध्ये आणि म्यानमार, थायलंड, व्हिएटनाम, कंबोडिया, चीन इ. देशांत दिसून येते. दलदल म्हशीचा रंग जन्माच्या वेळी राखाडी असतो; परंतु पुढे तो पाटीच्या दगडासारखा काळा होतो आणि नदी म्हशीचा रंग काळा असतो. दलदल म्हशीच्या अंगावर ढोपराच्या खाली, जबड्याखाली आणि मानेखाली पांढऱ्या केसांचे पुंजके असतात; नदी म्हशीमध्ये हे पुंजके कपाळावर, चेहऱ्यावर आणि शेपटीच्या गोंड्यात असतात. दलदल म्हशीची शिंगे बाजूने उगवलेली असून नंतर ती अर्धवर्तुळाकार वळण घेतात; नदी म्हशीची शिंगे उगवताच खाली आणि मागे वळलेली असतात आणि वयाप्रमाणे ती शरीराशी आडव्या समांतर रेषेत वाढतात. दलदल म्हशी माजावर आल्या की दुसऱ्या म्हशींवर चढतात, तर नदी म्हशी शांत राहतात. त्यामुळे माजावर आलेली नदी म्हैस ओळखणे कठीण असते. दलदल म्हशी शेतीसाठी व अन्य कामांसाठी वापरतात आणि त्यांच्या कामाचा वेग कमी असतो. त्यांच्यापासून दुधाचे उत्पादन कमी होते. नदी म्हशी मुख्यत: दुधासाठी पाळल्या जातात.
भारतात आढळणाऱ्या दोन्ही प्रकारच्या म्हशींची शरीरयष्टी (गायीच्या तुलनेत) मोठी असते. शरीर जाडजूड, अवजड व आखूड असून पोट मोठे असते. शिंगांचा आकार तलवारीप्रमाणे किंवा विळ्याप्रमाणे असून जातींप्रमाणे त्यांच्या लांबीत फरक असतो. शिंगे चपटी, जाड आणि वजनदार असतात. वशिंड गायीच्या वशिंडाप्रमाणे स्पष्ट व उठावदार नसते. म्हशीचे दंतसूत्र गायीप्रमाणे (पटाशीचे ०/३, सुळे ०/१, उपदाढा ३/३, दाढा ३/३) असून एकूण ३२ दात असतात. नराची खांद्याजवळ उंची १२९–१३३ सेंमी., तर मादीची १२०–१२७ सेंमी. असते. तिचे वजन ३००–५५० किग्रॅ. असते; परंतु सु. १,००० किग्रॅ. वजनाची म्हैसही आढळली आहे. म्हशीचा आयु:काल सु. ३० वर्षे असतो.
दलदल म्हशींना चिखलात लोळायला, तर नदी म्हशींना पाण्यात डुंबायला आवडते. दोन्ही म्हशी उष्ण व दमट वातावरणाला सरावलेल्या असून उष्ण वातावरणात त्यांना पाण्याची निकड अधिक भासते. दिवसा वाढलेल्या तापमानात शरीर थंड ठेवायला त्या पाण्यात डुंबतात, तर रात्री कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी त्या पाण्यात शिरतात. जेथे म्हशींना डुंबायला पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या जास्त वेळ सावलीत काढतात आणि उन्हाची वेळ टाळून उतरत्या उन्हात चरतात. पाणवनस्पतींवर त्या चांगल्या पोसतात. पुरातदेखील पोहताना पाण्यात डोके वर करून त्या स्वत:चा बचाव करतात. म्हशी एकमेकींशी गंधाने संवाद साधतात आणि गंधावरून एकमेकींना ओळखतात.
म्हैस तिच्या वाणानुसार एक-तीन वर्षांत प्रजननक्षम होते, तर रेडा तीन-साडेतीन वर्षांत प्रजननक्षम होतो. सामान्यपणे नर व मादी वेगळे वावरतात. समागमाच्या काळात ते एकत्र येतात. माजावर आलेल्या मादीला नर गंधाने ओळखतो. समागम होण्यापूर्वी नर व मादी २-३ दिवस एकत्र राहतात. मादी गाभण राहण्याच्या काळात नर मादीसोबत राहतो. या काळात तो दुसऱ्या नराला मादीजवळ फिरकू देत नाही. गर्भावधी २८१–३२० (सरासरी ३१०) दिवस असतो. म्हैस एकदा व्यायल्यानंतर २६०–२९५ दिवस दूध देते. तिला पेंड, सरकी, हिरवा चारा, गवत व वैरण दिल्यास दुधात वाढ होते. म्हशीच्या दुधात मेद सु. ७% आणि प्रथिने सु. ४% असतात. दहाव्या प्रसूतीनंतर तिचा दूध देण्याचा कालावधी कमी होत जातो. म्हशीला टोणगा (नर वासरू) झाल्यास ती दोघे २-३ वर्षे सोबत वावरतात आणि त्यानंतर टोणगा स्वतंत्र वावरू लागतो. म्हशीला पारडी (मादी वासरू) झाल्यास त्या दोघी आयुष्यभर सोबत राहतात.
नदी म्हशीमध्ये ५० गुणसूत्रे, तर दलदल म्हशीमध्ये ४८ गुणसूत्रे असतात. हरयाणातील हिस्सार येथे केंद्रीय म्हैस संशोधन या संस्थेमध्ये म्हशीसंबंधी संशोधन केले जाते. दलदल आणि नदी म्हशींमध्ये आंतरफलन घडून येत नाही, असा एक समज होता. मात्र, मागील काही वर्षांत नदी म्हैस आणि दलदल म्हैस यांच्यात संयोग घडवून आणून फलनक्षम जाती निर्माण करण्यात आली आहे. या संकरित जातीमध्ये ४९ गुणसूत्रे असतात. ही संकरित जाती दूध व मांस यांच्या निर्मितीसाठी उपयुक्त असून तिचा शेतीच्या कामासाठी वापर करता येतो.
भारतात मुरा, निली रावी, जाफराबादी, पंढरपुरी, नागपुरी, चिलिका, बानी, तरई, म्हैसाणा, जिरंगी, कलाहंडी, कुजंग इ. म्हशींचे वाण पाळले जातात. २०१४-१५ मध्ये भारतात सु. १४ कोटी ६३ लाख टन दुधाचे उत्पादन झाले आहे. २०१३-१४ सालच्या प्राणिगणनेनुसार भारतात म्हशींची संख्या सु. १० कोटी ५० लाख एवढी आढळून आली आहे. भारताकडून दुधाप्रमाणे म्हशीचे मांस निर्यात केले जाते. हे मांस व्हिएटनाम, मलेशिया, ईजिप्त, संयुक्त अरब अमीर राज्ये, थायलंड इ. देशांमध्ये निर्यात होते.
बोव्हिनी या उपकुलात ब्यूबॅलस (वन्य आणि पाळीव म्हशी), बॉस (गाय, याक, गवा, गयाळ, बानटिंग), बायसन (अमेरिकेतील तसेच यूरोपातील बायसन), स्यूडोरिक्स (साओला-व्हिएटनाम आणि लाओसमधील म्हशीसारखा वन्य प्राणी) आणि सिन्सेरस (आफ्रिकन म्हैस) इ. प्रजातींचा समावेश होतो. काही वेळा अमेरिकेत आढळणाऱ्या बायसनला बफेलो ही संज्ञा वापरतात; परंतु ती म्हैस नाही.